श्री मेघ:श्याम सोनावणे
जीवनरंग
☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆
“काय गं …!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी…???”
ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अत्यंत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापरं भरत बोलली “….. ताय वंजळभरच पायजेती, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठंच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत.” …. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती.
“नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून…” असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. ‘कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का.’ असं एकटीच बडबडत होती
तेवढ्यात तिचा नवरा राघव आला. “काय झालं, कोणाला बडबडतेस ? इथे तर कोणीच दिसत नाही ?”
“अहो गेले आठ दिवस झाले, एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत.”
राघव – “अनघा !!! अगं ती फुलं तर मागतेय. द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी.”
अनघा अभिमानाने म्हणाली – “हो, फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत. अख्ख्या गल्लीत कुणाच्याच बंगल्यात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त माझ्या दारात. आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत. खत, वेळेत कटिंग, पाणी, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत मला.”
राघव – “अगं एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेसं असतं. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच पायाशी. तू वाहिली काय अन् त्या छोट्या मुलीने. देव तर एकच आहे.”
अनघा – “ओ तुमचं लॉजिक तुमच्या जवळ ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे.”
“अनघा – एक सांगू !!!! असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कुणाला आणि काय फुलं तर मागतेय ना .. तिने कुठे तुला जेवण किंवा पैसे मागितले. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं. अनघा !!!! तुला समजवायचं काम केलंय, ऐकायचं का नाही ते तूच ठरव.”
अनघा – “बरं !!! उद्या आली मागायला तर देईन चार फुलं, तेही तुम्ही सांगता म्हणून..”
राघव – “बरं. पण जरा प्रेमाने दे. रागे नको भरू त्या छोट्या मुलीला.”
अनघा – “हं !”
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभीच. राग आलेला, पण राघवसाठी देते. ” ये मुली, थांब तिथंच, देते फुलं.” छोट्या पिशवीत पंधरा वीस फुलं तोडून टाकली. तिच्याजवळ जात म्हटलं ..
” उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला !!!!!”
ती मुलगी — अडखळत अडखळत– ” ताय, ते आठ दिस फुलं पायजेती. देशीला का ? “
अनघा – “आठ दिवस रोज !! कशाला ??”
” ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा, तिथं द्याला मायला पायजे व्हती.” तिची नजर खाली पायाकडं, चेहऱ्यावर निर्विकार भाव. ती बोलली. आवाज खूप लाघवी, हळू. ” माय देवाला बोलली हाय ‘आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन’.”
अनघा – (मनात )- ‘म्हणजे नवस’. तिला जोरात ओरडत… ” देवाला अर्पण करायला मागून फुलं… घे जा ना विकत, देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत.”
मुलीचा चेहरा खाडकन उतरला, “ताय ….ते… पैसं रोज…… एवढं..”
अनघा – ” कळलं !! नाहीयेत ना पैसे. बोलताच कशाला गं मग असं देवाला. आपल्या कुवतीनुसार बोलावं.”
ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.
अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. उद्या येईल का ? नाही येणार बहुतेक. किती बोललो, ते ही फुलांसाठी. आज ताजी असणारी फुलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, मोगराही थोडा नाराजच दिसला. ‘जावू दे, उद्याचं उद्या पाहू’ असं म्हणत ती कामाला लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच. अनघाला मनात हुश्श वाटलं, ‘आली बाई आज परत….’
“ताय…….” तिने हाक मारली.
अनघा – “हो आले, देते फुलं. कुठं राहतेस गं ?”
ती – “गावाच्या बाहेर पडकी साळा हाय, तिथ.”
अनघा- “घरात कोण कोण आहे ??
ती – ” माय, बा, मोठी बहण, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.”
अनघा – “बरं बरं. घे फुलं आणि निघ.”
ती – “जी ताय.”
आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे… अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली. स्वतःशी हसत अनघा म्हणत होती –
‘रोज फुकट फुलं दिली, देवही नकळत आपल्यावर खूष असणारच. मी फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झालाय, नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं ‘ —
एकटीच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला. “काय एकट्याच गालात हसताय .”
अनघा – ” काही नाही रे राघव, ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येतं होती, पण आता ह्या दहा बारा दिवसात कुठे आलीच नाही.”
राघव – “अगं आता कशाला येईल, तिला आठच दिवस फुलं हवी होती ना ! तसंही तुला तिचं फुलं मागणं आवडतं नव्हतं.”
अनघा – “अरे पण एकदा परत येवून आभार तरी मानायचे तिने माझे. लोकं केलेले उपकार असे विसरतात, म्हणून कुणाला काही देवू नये. तू सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज ….”
राघव हसला.
अनघा – “काय झालं ??”
राघव – “काही नाही.”
तेवढ्यात बाहेरून हाक आली– “….ताय व ताय….!”
हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आली तर दारात ती मुलगी उभी.
अनघा – ” काय आज पण फुलं पाहिजेत का ? आधीच सांगते, नाही देणार. आज फुलं थोडी कमीच लागली आहेत. मला देवपूजेला पाहिजेत.”
ती – “…फुलं नको ताय ……ते…. हे….. हे….” हातात मळकट फडकं होतं, आणि त्यात काहीतरी गुंडाळलेले.
अनघा – “काय…. .ते….. हे……”
ती – ” ताय !!!! ते मोठी बहण बाळतपणाला आल्या. ‘ यवस्थित बाळ हु दे ‘ म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला. तुम्ही फुलं दिली, आयचा नवस पुरा झाला. परवा दिशी मुलगा झाला बहयणीला. यवस्थित हाय सगळं. माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो. ताय, बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी. ‘तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार’ –बा बोललाय आसं… अन् माय म्हणली ‘ कुणाचबी काय फुकट घेव नी. आपल्या परीनं परत द्याव.’ म्हणून हे…. घ्या……”
अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव अशी, दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती. किती तेजस्वी, आनंदी, सात्विक आहेत दोन्हीही मूर्ती. अनघा आनंदून गेली.
अनघा – त्या मुलीला म्हणाली, “अगं ऐक !!!”
पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मूर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली ती.
अनघाचे डोळे पाण्याने डबडबले आपण किती खुजे, संकुचित… एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे. सारा गर्व, अभिमान एका झटक्यात गळून पडला…… एखाद्याची कुवत ठरवणारे आपण कोण, का हिने न बोलता आपल्याला आपली कुवत दाखवली……
मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला. आज तो रोजच्यापेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला……
आपण पण अहंकाराला गंगेत अर्पण करावं … मग बघा संसाराचा मोगरा पण कसा बहरतो ते….. !!!
लेखक – अनामिक
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈