कवितेचा उत्सव
☆ मायिची कहाणी… ☆ श्री किशोर त्रिंबक भालेराव ☆
तळ्यानं, खळ्यानं, मळ्यानं जपली
तोह्या पावलाची निषाणी
माय तु दिनरात,
कष्टाची वं धनी..
झाडपाला काड्याकुड्याचा
तोह्या डोक्यावर भारा
लुगड्याच्या पदराचा,
घाम पुसाला सहारा.
उन्हातान्हात ऊभी जशी,
येड्याबाभुळीवानी.
माय तु दिनरात
कष्टाची वं धनी…
पायात काटेकुटे, धस्कटाचं कुरुप
रक्ताळलेल्या भेगात चुन्या, गोट्याचं लेपं
मोडलेल्या घराला जुपते,
घाण्याच्या बैलावानी…
माय तु दिनरात
कष्टाची वं धनी…
© श्री किशोर त्रिंबक भालेराव
जालना
9168160528
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈