श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 161 ☆ संत तुलसीदास…☆ श्री सुजित कदम ☆
श्रेयस्कर जीवनाचा
महामार्ग दाखविला
राम चरित मानस
भक्ती ग्रंथ निर्मियला…! १
जन्म उत्तर प्रदेशी
चित्रकूटी राजापूरी
श्रावणात सप्तमीला
जन्मोत्सव घरोघरी…! २
मान्यवर ज्योतिषाचे
घराण्यात जन्मा आले.
राम राम जन्मोच्चार
रामबोला नाम झाले…! ३
जन्मताच गेली माता
केला आजीने सांभाळ
लहानग्या गोस्वामीची
झाली जन्मतः आबाळ…! ४
हनुमान मंदीराच्या
प्रसादात गुजराण
गेली आजी देवाघरी
मातापिता भगवान….! ५
नरहरी दास स्वामी
छोट्या तुलसीचे गुरु
वेद पुराणे दर्शने
झाले ज्ञानार्जन सुरू…! ६
लघुकथा आणि दोहे
गुरूज्ञान प्रसारित
उपदेश प्रवचन
रामभक्ती प्रवाहीत…! ७
भाषा विषयांचे ज्ञान
करी तुलसी अभ्यास
उपनिषदांचे पाठ
नाम संकीर्तन ध्यास…! ८
माया मोह जिंकुनीया
ठेवी इंद्रिये ताब्यात
दिली गोस्वामी उपाधी
वेदशास्त्री महात्म्यास…! ९
वाल्मिकींचे रामायण
केले अवधी भाषेत
ब्रज भाषा साहित्यात
लोक संस्कृती धारेत…! १०
अलौकिक आख्यायिका
प्रभु रामचंद्र भेट
ओघवत्या शैलीतून
ग्रंथ जानकी मंगल…! ११
काव्य सौंदर्याची फुले
बीज तुलसी दासाचे
सर्व तीर्थक्षेत्री यात्रा
भक्तीधाम चैतन्याचे…! १२
सतसई ग्रंथामध्ये
दोहे सातशे लिहिले
रामकृष्ण भक्तीयोग
संकिर्तनी गुंफियले….! १३
हनुमान चालीसा नी
दोहावली गीतांवली
ग्रंथ पार्वती मंगल
काव्य कृष्ण गीतावली…! १४
हनुमान रामचंद्र
झाले प्रत्यक्ष दर्शन
संत तुलसी दासांचे
प्रासादिक संकीर्तन….! १५
गाढे पंडित वैदिक
वेदांतात पारंगत
आदर्शाचा वस्तू पाठ
दिला नैतिक सिद्धांत…! १६
हाल अपेष्टां सोसून
दिले भक्ती सारामृत
संत तुलसी दासांचे
शब्द झाले बोधामृत…! १७
थोर विद्वान विभुती
दीर्घायुषी संतकवी
वर्ष सव्वाशे जगली
प्रज्ञावंत ज्योत नवी…! १८
जीवनाच्या अखेरीला
काशी श्रेत्रात निवास
राम कृष्ण अद्वैताचा
संत तुलसी प्रवास…! १९
गंगा नदीच्या किनारी
शेवटचा रामश्वास
अस्सी घाटावर देह
केला आदर्श प्रवास…! २०
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈