सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ साठी… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(चाल… रूणझुण त्या पाखरा)
आली आली आता साठी,
नको कपाळाला आठी,
खोलू कवाडे मनाची,
जरा बदलूया दृष्टी.
आली आली आता साठी..||१||
लोकं काय म्हणतील?
नकोच हा बागुलबुवा,
फालतू बंधनांना आता,
देऊन टाकूया ना रजा.
आली आली आता साठी.. ||२||
अनुभव जालीम दवा,
शहाणपणा शिकविला,
आपल्यांना ओळखताना,
आता होणार ना चुका.
आली आली आता साठी..||३||
काय हवे आहे मला,
शोध मीच घ्यावयाचा,
आनंदाने जगण्याचा,
मनी जपायचा वसा.
आली आली आता साठी..||४||
आयुष्याच्या प्रवासाचा,
हा तर स्वल्पविराम,
उमेदीने आता नव्या,
लिहू पुढचा अध्याय.
आली आली आता साठी..||५||
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈