? विविधा ?

☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

आपण एखाद्या परिचित किंवा अपरिचित घरात पाय टाकला तर कोणता अनुभव यायला हवा? त्या घरातील माणसांनी किमान “या”  असं म्हणावं!पेलाभर पाणी द्यावं.अपरिचित असू तर कोण? कुठले? अशी साधी चौकशी करावी.बरं घर म्हंटल्यावर त्या घरातील माणसांच्या बोलण्याचा, हसण्याचा, मुलांच्या ओरडण्याचा, भांडणाचा आवाज तरी कानावर पडायला नको का? पण हल्ली घरात आवाज असतो तो दूरदर्शन चा. घरं कशी अबोल झाल्यासारखी वाटतात.घरात माणसं असून ही एक वेगळीच शांतता जाणवते.या शांततेला कुठला चेहरा आहे हेही अनाकलनीय असतं.मंदीराच्या गाभा-यात जाणवणारी शांतता, ध्यान विपश्यना अशा साधनेत अनुभवायला मिळणारी शांतता,प्रचंड दडपणाखाली निर्माण झालेली शांतता किंवा एखाद्या वनराईतून संथपणे वाहणा-या नदीकाठ ची शांतता या प्रत्येक प्रसंगात, क्षणात जाणवणा-या शांततेला तिचा स्वतःचा एक चेहरा आहे, हे आवर्जून जाणवतं. पण घरात माणसं असून ही निर्माण झालेली शांतता अनुभवतांना तिचा चेहरा एकदम अनोळखी वाटायला लागतो.

आठवणीतल्या घरातलं लहानपण आठवलं की एक गोष्ट लक्षात येते की     पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती…त्यामुळेच घर कसं भरलेलं वाटायचं.मुलांची भांडणं झाली की आजी आजोबांचं कोर्ट! हट्ट पुरविणारे ही तेच! संध्याकाळी ” शुभं करोती ” म्हणजे मुलांच्या हजेरीची वेळ!संस्कृत मधील अनेक श्लोक, स्तोत्र पाठ करवून घ्यायची जबाबदारी आजोबांकडे.आणि गोष्ट सांगून मनोरंजन आजीकडे.सतत पाहुणे आणि येणा-या जाणा-यांचा राबता!त्यामुळे घरात माणसं असल्याचं जाणवायचं. घर चैतन्याचं आवार वाटायचं.आता अशी घरं आठवणीत गेलीत. पूर्वी घरात ‘आम्ही’ होतो, आता घरात ‘मी’  वास्तव्य करतांना दिसतो.’मी’  ‘मी’ मध्ये संवाद कसा होणार? गप्पा कशा रंगणार?

या ‘मी’ मुळे हल्ली शेजारधर्म ही उरला नाही. फ्लॅट पद्धतीत आपल्या आजूबाजूला, वर खाली घरं असली तरी त्या घरांचा आपल्या घराशी संपर्क नसतो. माणसांची सलगी नसते. नावही माहीत नसतात.फक्त जाता येता ओळख असल्याचं दाखवायचं… बळजबरीनं हसायचं. शेजारधर्म हा एकोपा वाढवणारा, सहकार्याची भावना जागवणारा असतो. नात्याची वीण घट्ट करणारा असतो. पण सा-याच घरात ‘मी’. मग दोष कुणाला द्यायचा?’मी ‘ आणि ‘मी’ चं मैत्र झालंयं का कधी?  ‘मी’ ला ‘आपण’ मध्ये विरघळून जायला हवं तेव्हाच मैत्र निर्माण होतं.  घर केवढं आहे याला महत्व नाही.फक्त त्यात माणसं असावीत.माणसा-माणसात आत्मीयता जिव्हाळा असावा. घरातून बाहेर गेलेल्याला घराची ओढ वाटावी.इतरांच्या सुखासाठी स्वतःतला ‘मी’ विरघळविण्याची सवय असावी. अशी माणसाला माणसांची ओढ, माणसाला घराची ओढ, घरांना घराची ओढ निर्माण झाली की ” हे विश्वचि माझे घर” म्हणणारा, ज्ञानोबा एखाद्या घरातून विश्वकल्याणाचं स्वप्न घेऊन बाहेर पडेल.कुणी सांगावं?

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments