वाचताना वेचलेले
☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
श्री लिहायला घरात आता
हिशोबाची वहीच नाही
ऑनलाइन पेमेंटच्या नव्या युगात
तांदूळ साखरेच्या डब्यात
लपवायलाच काही नाही
फाटलेले कपडे शिवून
पुन्हा वापरायची पद्धत नाही
सुई दोरा घेऊन शिवायला
मुळात कोणाकडे वेळच नाही
युज अँड थ्रो चा जमाना आहे
माळे उगीच भरायचे नाही
जुन्या गोष्टींमध्ये उगीच
मन असे गुंतवायचे नाही
मॉलच्या राशी तर आहेतच
आमिषाना भुलायचं नाही
असं म्हटलं तरीही
प्रत्यक्षात तसं होतच नाही
आता तर रेलचेल ऑनलाइन ची
ॲमेझॉन ची गळ मोडवत नाही
परस्पर होतो हिशोब सारा
पुन्हा, मी तर कुठे जातच नाही
जुनी हिशोबाची वही वाचताना
डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही
तेव्हा बावळट का आता शहाणे
या वादात मला पडायचं नाही
जुन्या आठवणी घेऊनच
पुढे पुढे जायचं असतं
काळाबरोबर आनंदाने
आपणही बदलायचं असतं
कवयित्री :सौ. सुजाता साठे
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈