सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-9… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
की गोडीनेच आपुली गोडी
अनुभवावी घेऊनि तोंडी?
तैसी आपुली एकमेका आवडी
इंद्रियातीत परमात्मस्वरूप गोडी॥४१॥
आतुर मी घेण्या तुझी भेट
आत्मतत्त्वाचे परि साटंलोटं
केवळ उपाधी, देह देहाच्या भेटी
आत्मतत्वांच्या भेटी, हो सिद्धभेटी
भयभीत मी, न बिघडो सिद्धी
भेटीची, देहभेटीच्या उपाधी॥४२॥
तव भेटीचा मी विचार करिता
तुझे मन मायावी नेते द्वैता
मनास येवो अवस्था उन्मनी
तरीच होशील आत्मज्ञानी
दोन आत्म्यांची न होता भेट
तव दर्शन कैसे होई सुघट॥४३॥
तुझी कल्पना, वागणे, बोलणे;
चांगले असणे अथवा नसणे
न स्पर्शी ते स्वरूपा तटस्थ
कर्माकर्म केवळ इंद्रियस्थ॥४४॥
चांगया तुजसाठी करणे वा
न करणे, हा विकल्प नसावा
देहेंद्रियांनी व्यवहार करावा
तो आत्मस्वरूपी न घडावा
आत्मतत्वाचा मी उपदेश करावा
तो मीपण माझे जाई लयत्वा॥४५॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈