श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.) इथून पुढे — 

“डॉक्टर साहेब, या प्लेटलेट्स गोळा कशा केल्या जातात ? प्लेटलेट्स देण्यासाठी दात्याचे काही निकष असतात का आणि प्लेटलेट्सचेही रक्तगट असतात का हो ?” – रजत.

— जरा शास्त्रीय आणि तर्कशुद्ध महत्त्वाचे प्रश्न ऐकून डॉक्टरसाहेबांची कळी खुलली आणि ते समजावून सांगू लागले.—- 

“रक्तदानापेक्षा प्लेटलेट डोनेशनचे निकष कांकणभर जास्तच काटेकोर असतात. दाता वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा लागतोच, शिवाय डोनेशनच्या किमान ४८ तास आधीपासून दारू पिणे, तंबाखू सेवन हे सगळंच कटाक्षाने बंद ठेवावे लागते. हिमोग्लोबीन १२.५ पेक्षा अधिक असावं लागतं आणि प्लेटलेट संख्या प्रति मिलीलिटर २,६५,००० पेक्षा जास्त असावी लागते.– दात्याच्या शरीरातून रक्त काढणे सुरू करतात, यंत्राद्वारे त्या रक्तातून प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि उरलेले रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडलं जातं.  (डायलिसिस करताना कसं शरीरातील रक्त काढलं जातं, शुद्ध केलं जातं आणि ते शुद्ध रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं, तसंच.) साधारण एक दीड तास ही प्रक्रिया चालू राहते. तसेच ही प्रक्रिया करणाऱ्या यंत्राचा संच हा फक्त एकदाच वापरला जातो. व त्या वापरानंतर तो मोडीत काढला जातो (only one time use, disposed after single use). त्यामुळे दात्याला संसर्ग होण्याची तिळमात्रही शक्यता नसते. रक्तदानात तुमच्या शरीरातून रक्त काढून घेतले जाते, म्हणून तुम्हाला recovery साठी तीन महिन्यांपर्यंत परत रक्तदान करता येत नाही. प्लेटलेट डोनेशन मात्र दर पंधरा दिवसांनी करता येते. आणि तसं ते करावंही, आज प्रचंड गरज आहे. आणि हो, प्लेटलेट्सना रक्तगटाचं बंधन नसतं, बरं का ! कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स कोणत्याही रक्तगटाच्या पेशंटना चालतात. करोना काळात पेशंटची मोठी गैरसोय होत होती, अशा वेळी व जेव्हा कधी तातडीची गरज असेल, तर दाता सुदृढ असेल तर डबल डोनेशनही घेतले जाते. आणि हो, आपण दिलेल्या प्लेटलेट्स कोणाला दिल्या गेल्या हे दात्याला कधीच सांगितले जात नाही. आजवर फक्त एकदाच हा रिवाज मोडला गेला. ज्यांच्या सांगण्यावरून मी त्या दिवशी डोनेशनला गेलो होतो त्या बालविभागाच्या प्रमुखांनी दुसऱ्या दिवशी ज्या लहानग्याला माझ्या प्लेटलेट्स दिल्या होत्या, त्याच्या पालकांचा आलेला आभाराचा मेसेज मला forward केला होता. दानाच्या प्रक्रियेसाठी इतका वेळ देणं, त्या मोठ्या सुईच्या वेदना सहन करणे, आणि पुन्हा पंधरा दिवसांनी हीच प्रोसेस रिपीट करणं – तुम्हाला अनाकलनीय वाटेल कदाचित, पण आपली ही कसरत कोणाचा तरी जीव वाचवत आहे, ही भावना, ही जाणीव आपल्याला प्रेरणा देत रहाते. दान केलेले रक्त तीन आठवड्यांपर्यंत साठवता येते, पण प्लेटलेट्स फक्त पाचच दिवस टिकू शकतात, त्यामुळे आणखीन दाते पुढे येण्याची नितांत गरज आहे.”

— डॉक्टर सुयोग भरभरुन सांगत होते.

घरी परतताना, चक्क बंड्याही शांत होता, रजत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता, आणि एकदम तो उद्गारला, “बंडूशेठ, तू म्हणतोस तेच खरं. तो ब्राझीलचा चिकिन्हो स्कार्पा आणि हे डॉक्टर सुयोग दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. — त्या चिकिन्होने गाडी जमिनीत गाडायचा गाजावाजा केला, एवढंच तुला आठवलं. पण त्याने पुढे काय म्हटलं, ठाऊक आहे का तुला ?”

बंड्यांनं नकारार्थी मान हलवली. 

” तो म्हणाला, ही गाडी माझ्या मृत्यूनंतर मला उपयोगी पडेल म्हणून मी गाडायचे ठरवले, तर तुम्ही माझी हुर्यो उडवलीत, मला नावं ठेवलीत, माझी अक्कल काढलीत. मग तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अनमोल अवयव तुम्ही जेव्हा जमिनीत गाडता, तेव्हा तुमची ही बुद्धी कुठे जाते ? त्यापेक्षा अवयव दान करा, अन्य गरजूंना मदत करा.”

“ अरे Organ donation ला प्रसिद्धी देत होता तो. तसंच या डॉक्टरांना स्वतःच्या कौतुकाची, मानमरातबाची हौस नाहीये. पण असं हे आचरट title पाहिलं, असं heading पाहिलं, असा मथळा पाहिला, की कोण आहे हा टिकोजीराव ? या उत्सुकतेने तरी लोकं ही बातमी वाचतील आणि प्लेटलेट डोनेशनला प्रेरित होतील – उद्युक्त होतील, म्हणून त्यांचा हा खटाटोप. – तुला माहित आहे का, डॉक्टरांनी आत्तापर्यंत तब्बल ७५ वेळा प्लेटलेट डोनेशन केले आहे ?”

— रजत विचारत होता, आणि बंड्या प्लेटलेट डोनेशन करण्यासाठी कोणाला संपर्क करायचा हे विचारणारा मेसेज सुयोग सरांना पाठवत होता.

— समाप्त —

 (डॉ. सुयोग कुळकर्णी MD आयुर्वेद आणि त्यांनी ७५ वेळा केलेले प्लेटलेट डोनेशन ही १००% सत्य घटना आहे. प्लेटलेट डोनेशन या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉ. सुयोग यांना ९८२०२५९५६९ या क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments