श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
“काय????” जोरात किंचाळत अमोघने सईला विचारले.. दचकून आजूबाजूच्या टेबलवरची लोकं पाहू लागली.
“आपण हॉटेल मध्ये आहोत… be calm अमोघ… चील मार…” सई कॉफीचा घोट चवी चवीने पीत म्हणाली.
अमोघ वैतागत म्हणाला, “तुझं हे चील ना मला कधी कधी शेखचिल्लीची आठवण करून देत राहतं… काय करशील तुझा नेम नाहीय.. काहीही वेड्यासारखा विचार करू नकोस.. आई तुला हे सगळं बोलली का?? मला आईशी बोलावं लागेल… नक्की प्रॉब्लेम काय आहे?? काय कमी आहे आत्ता तिला…?”
“हे बघ… मी तुला सांगते आहे… विचारत नाहीय… आईनाही यातलं काहीही माहिती नाहीये .. म्हणजे कल्पना आहे ..आणि हे मनात आले की पटकन मी करून मोकळी होते म्हणून आज तुझी बायको म्हणून बसलेय तुझ्यासमोर… नाहीतर तू दहा वेळा कबड्डी खेळाडूसारखं माझ्यापर्यंत येऊन मागे जात होतास.. रेषेला न शिवता… आठवतं ना…”
अमोघला आठवलं, इंजिनीअरिंगला असतानाच सई त्याला खूप आवडायची. पुढे जाऊन दोघांना नोकरी लागली. हळुवार प्रेम मनात उमलू लागले, पण ते सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. आपल्या घरी आई एकटीच… आपला आणि सईचा तेव्हाचा आर्थिक स्तरही वेगळा…
एके दिवशी रविवारी ही सई सरळ घरी आली होती. आईने केलेले पोहे खाऊन चक्क तिनेच विषय काढला होता. तिला अमोघ आवडतो, तिच्याइतकी आत्ता आर्थिक परिस्थिती नसली तरी त्याच्या हुशारीवर असलेला तिचा विश्वास, त्यालाही ती आवडते असा दाट संशय… सगळे काही बोलून मोकळी…. आपण तर नुसते बघतच बसलेलो होतो. तिने उचललेलं हे पाऊल… पुढे लग्न… तिची साथ… मनासारखं घर… अवनी सारखी गोड मुलगी… आईचे कमी होत गेलेले कष्ट…. सईचं आईला आपलंसं करून घेणं… सगळं काही क्षणार्धात समोर येऊन गेलं….
तडकाफडकी मनात येईल ती बोलत आणि करत असली, तरी त्या मागे तिचे ठाम विचार.. त्या दिशेने कृती.. हे त्याला चांगलेच माहिती होते..
सवाष्ण नाही म्हणून आई लग्नात विधीला बसायला तयार नव्हती. या सईने आग्रह करून सूनमुख आईच आधी पाहणार असा हट्टच केला होता..
जसे आठवत होते तसे आई कधीच आरशासमोर उभी राहिलेली त्याला आठवली नाही. दोन मिनिटं छोट्या आरशात बघून बाजूला व्हायची.
तो तीन वर्षांचा असताना त्याची आजी आणि वडील दोघं एका अपघातात दगावले होते. आजूबाजूच्या लोकांमुळे किंवा काहीही, पण आईने स्वतःला साध्या साड्या, साध्या रुपात गुंतवून घेतलं होतं. किती गोष्टी तिने मागे टाकल्या होत्या याची त्याला आत्ता कल्पना येत होती, स्वतः चा संसार सुरू झाल्यावर.. तरीही ती जे काही बोलत होती ते अजिबातच त्याला मान्य नव्हते… आईचं लग्न….
तो बुरसटलेल्या विचारांचा नक्कीच नव्हता, तरीही हे जे काही चालवलं होत सईने, ते त्याला पचनी पडत नव्हतं… तो एकदम गप्प होऊन गेला होता….
त्याच्या मनातली घालमेल पाहून सईने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला… “मला तुझ्या मनातली उलथापालथ अगदीच समजते आहे. मी खूप वेळ घेतलाय. काही गोष्टी माझ्या लेव्हलवर पास केल्या आहेत, आणि मग तुझ्याशी हे बोलते आहे… तुझ्या इतकंच… कदाचित तुझ्याहीपेक्षा जास्त मी आईंशी जोडले गेले… त्यांच्या शाळेच्या नोकरीत भागणार नाही हे ओळखून आजोबांनी त्यांची शिवणकलेची आवड व्यवसायात बदलण्यासाठी केलेले प्रयत्न, आईंचे कष्ट, सगळी कलात्मकता पणाला लावून नोकरी आणि व्यवसाय यावर तुला मोठं केलं त्यांनी. अवघा तीन वर्षांचा त्यांचा संसार… त्याच्या आठवणीत आजवर आयुष्य काढलं त्यांनी… आजोबांचंही शेवटच्या दिवसात किती केलं ते मी कॉलेजमध्ये असताना पाहिलं आहे. तुला सांगू… लग्नानंतर मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणायचे, ‘तुम्हाला छान सिल्कच्या साडीत.. कानातले.. बांगड्या.. केसात मोगऱ्याचा गजरा.. असं पहायचं आहे. तुम्ही भान विसरून आरशात बघत बसल्या पाहिजेत…’ त्या हसून सोडून द्यायच्या..”
“ बरं…. ‘यासाठी लग्नाचा घाट’ असं तुला वाटतं असेल तर नीट ऐक… त्यांनी इतकी वर्ष एकाकी काढली. आपण आहोतच रे सोबत… पण आपलेही काही ना काही उद्योग सुरूच असतात…
तुला सांगू… म्हणजे हे माझे विचार आहेत.. प्रत्येकाला अगदी कोणत्याही वयात हक्काची सोबत लागतेच की.. ‘मी आहे ना…’ असं सांगणारा एक आवाज… कधी आपले लाड करणारं… वय विसरून लहान करणारं हक्काचं माणूस.. संवाद साधायला… अगदी कधी मनात आलं, तर मी जशी तुझ्याशी भांडते तसं भांडायलाही कुणीतरी हवं… बरं वाटत नाहीये… हे सांगायला अर्ध्या रात्री शेजारी कुणी हवं….”
तिला थांबवत अमोघने विचारले, “मग आता काय तू आईचं नाव वधुवर सूचक केंद्रात घालते आहेस का काय… यातून पुढे काय होईल याचा विचार केला आहेस..? लोकं काय म्हणतील??”
सईने लगेच उत्तर दिले… “किती आले होते रे तुझे नातेवाईक तुम्हाला मदत करायला… आणि जे मी तुला सगळं सांगितलं तसाच एक छान मेसेज बनवून मी सगळ्यांना पाठवणार आहे. कुणाला काही प्रश्न असणार नाहीत त्यांच्या लग्नानंतर… .हे बघ, अवनी एरवी रविवारी अभ्यास करते का? पण परीक्षा असली की आपोआप न सांगता अभ्यासाला बसते… ती मानसिकता रुजलेली असते. तशीच थोडी मानसिकता सगळ्यांमध्ये थोड्या प्रमाणात रुजवते… करते प्रयत्न…”
“आता इतका विचार केलाच आहेस तर लग्न कुणाशी आणि आई कुठे जाणार हेही सांगून टाक…”
“त्रागा करून घेऊ नकोस… काळजीही करू नकोस… गेले सहा महिने मी साठे काकांना पाहतेय… बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले आहेत… परवा नाही का तू होतास तेव्हा मला होममेड कणकेची वडी घेऊन आले होते… ते.. बायको कॅन्सरने गेली… बारा वर्ष झाली.. मुलगी लग्न होऊन ऑस्ट्रेलियात असते… सोसायटीत असलेल्या प्रोग्रॅममुळे आमची घट्ट मैत्री.. उत्साही.. स्वतः ला सकारात्मक कामात गुंतवून घेतलेले काका .. मुलांना किल्ले बनवायला मदत कर.. कामवाल्या मावशींच्या मुलांना शिकव.. गृहिणींसाठी आर्थिक साक्षरतेची कार्यशाळा घे.. असे असले तरी ही क्वचित एक उदासी जाणवली त्यांच्या चेहऱ्यावर…
मी त्यांच्याशी, त्यांच्या लेकीशी बोलून.. त्यांची परवानगी घेऊन… त्यांचं मत विचारात घेऊनच तुझ्याशी बोलतेय… आईना मी नाही, पण काकांनी कल्पना दिली आहे या सगळ्याची… त्या हो म्हणत नाहीत, पण नाही ही म्हणाल्या नाहीत… तू काय म्हणशील हा विचार… लोकांची धास्ती आहेच… त्यांनी स्वतःला मिटवून घेतलं आहे… नवरा नाही.. या एका गोष्टीपायी या पिढीमधल्या सगळ्याच बायकांनी कदाचित असंच स्वतः ला बंद करून घेतलं आहे……
….. आणि इतकं सगळं जुळून येतंय म्हणूनच हे तुला सांगते आहे. आपण बोलू सगळ्यांशी… मार्ग काढू… आणि त्या आपल्या जवळच राहतील.. दोघंही… अवनीला एक छान आजोबा मिळतील.. माझा आग्रह नाही तू त्यांना वडील मानावं असा… पण एक उबदार सोबत तुला नक्की मिळेल ही खात्री करूनच मी पुढे जायचा विचार करते आहे..
मी तर म्हणेन आईना एक दोन वर्ष राहू दे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये… कधी हौसेने त्यांचं माहेरपण झालं नाही, की सणवार… मला त्यांचं माहेरपण करायचं आहे… वर्षभर त्यांचे सगळे सण त्यांना नवीन साडी घेऊन मस्त साजरे करायचे आहेत मला … त्यांना मनापासून तयार होऊन आरशात पाहताना मला बघायचं आहे….. अमोघ.. इतकं सोसून त्याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत आई… खूप शिकले मी त्यांच्याकडून… कधी एका शब्दाने ‘मी इतकं केलं…’ never… मी मनापासून काही ठरवते आहे.. मला तुझी फक्त साथ हवीय.”
अमोघ गप्प होत म्हणाला.. “बाई गं.. येत्या वटपौर्णिमेला मी वडाला फेऱ्या मारतो …ही वेडी मुलगी मला सगळे जन्म बायको म्हणून दे….”
हळूहळू सगळ्यांशी संवाद साधत दोघांनी गोष्टी पुढे नेल्या… सुमतीबाईंना सईने स्वतःच्या हाताने तयार केले होते.. आजवर झुगारून दिलेला मोठा आरसा… हिरवा रंग त्यांना अंगभर भेटायला आला होता.. लाल काठाची हिरवीगार पैठणी… हातात हिरव्या बांगड्या.. हाताला मेंदी… गळ्यात मोजके दागिने… नाकात नथ… केसात सुंदर गजरा…
त्या भान हरपून आरशात पहातच राहिल्या… डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते… तशाच काही भावना चेहऱ्यावर दिसलेले सईचे प्रतिबिंब त्यांना त्यात दिसले… नेहमीसारखे चेहऱ्यावर खट्याळ हसू आणि डोळ्यात पाणी… “बघा आई… मी म्हणाले होते ना… एक दिवस तुम्ही स्वतःला विसरून आरशात बघत राहाल असे काही मी करेन…”
आरशात एक छबी कैद झाली होती…. एकमेकींच्या मिठीत विसावलेल्या त्या दोघींचे चेहरे …statue केल्यासारखे…
लेखिका : सुश्री रेणुका दिक्षित
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈