सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुठलाही महत्त्वाचा प्रसंग आयोजित करतांना माणूस आजकाल एखाद्या महत्वाच्या,वैशिष्ट्यपूर्ण वा खास दिवसाचे औचित्य साधायचा प्रयत्न करतो.त्यायोगे तो खास दिवस अजूनच खास होऊन कायमचा चांगल्या आठवणींनी स्मरणात राहायला मदतच होते.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर टप्प्याटप्प्याने गेलेल्या काळाचा विचार केला तर आपल्याला आपल्या भारताची झालेली लक्षणीय प्रगती लक्षात येईल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली भारताची वेगवेगळी प्रगती झालेली दिसून येईल.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये तसेच विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे ह्यात कुठलीच शंका नाही. हे युगच यंत्रांच युग आहे.पण फक्त मनात मात्र एक भिती दडून बसलीयं की हे  प्रगत यंत्रयुग चालत्याबोलत्या माणसाला यंत्र तर बनवीत नाही नां ? अर्थातच ही भिती काही अगदीच अनाठायी नाही बरं का,ब-याच अनुभवाने जाणवलेली ही भिती आहे. तरीही नाण्याला दोन्ही बाजू असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाबाबत उजव्या विचारसरणीचं पारडं नक्कीच जड आहे हे विसरून चालणार नाही.  11 मे  हा  “तंत्रज्ञान दिन “!

विज्ञानामुळे नवनवीन क्रांती उदयास येते  आणि हीच क्रांती आपली उत्तरोत्तर प्रगती घडवून आणते.हल्ली काळ खूप बदललायं. परंतु पूर्वीच्या काळी ह्या विज्ञानाच्या अद्भूत कामगिरीमुळे निर्माण झालेले चमत्कार आणि त्या चमत्कारांमुळे तयार झालेले अविष्कार जनमानसाकडुन पचविल्या जाणं ही खूपच अवघड गोष्ट होती.

विज्ञानाचे अविष्कार येतांनाच दोन रुप घेऊन येतं.त्याच्या योग्य वापरामुळे झालेली  प्रगती, विकास आणि उत्कर्ष हे एक रुप आणि त्याच्या अतिरेकी ,चुकीच्या वापरामुळं झालेली अधोगती,पिछेहाट हे दुसरं रुपं.

पूर्वी माणसं ही नोकीयाच्या जाहीराती प्रमाणे ” कनेक्ट दी पीपल ” ह्यावर विश्वास ठेवणारी होती. माणसाचं माणसावाचून अडायचं असा हा “अच्छे दिन” असलेला काळ होता. ह्या यंत्रयुगामुळे माणसाला माणसाची गरज नसल्याची परिस्थिती निर्माण होऊ घातलीयं आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे.

पूर्वी एकमेकांची मदत घेणं ह्यात प्रेम,आपुलकी हक्क दडलेला होता आणि तोच एकमेकांतील दरी मिटवून त्यांना जोडण्याचं दुव्याचं काम करायचा. आता ह्या यंत्रयुगांने एकमेकांची मदत घेतांना एकप्रकारची “हिचकीच”आलीयं.मुळात मदत घेणं हे कमीपणाचं लक्षण हा अत्यंत चुकीचा विचार मनात ठसवतं पिढी उत्तरोत्तर पुढे जातेयं.साधं उदाहरणं पूर्वी एकमेकांना पत्ते विचारतांना,ते शोधतांना खूप मजा यायची. पत्ता विचारणारा, शोधणारा थोडा काळजीत विचारायचा आणि समजावून सांगणारा अगदी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवूंन दिलासा द्यायचा. आता मुळात पत्ता शोधणेच जवळपास बंद झालयं कारण एकमेकांकडे जाणीयेणीच मुळात कमी झालीयं आणि अगदीच नाईलाजाने जावं लागलं तर कमीपणा न वाटू देणारं “जीपीएस”वरील कोरडी बाई तुम्हाला पोहोचवते इप्सित स्थळी.

आता अत्याधुनिक बँकींग चे बदलते रुपं बघतांना तर हा अनुभव पावलोपावली येतोयं. अर्थातच ह्या नवीन तंत्रज्ञानाने सगळं खूप सहज,सोप्प झालयं हे ही खरचं किंवा ही काळाची गरज म्हणू हवतरं.मध्ये एक आजोबा आणि नातू बँकेत आले होते. ते दोघेही त्या  आजोबांना घरबसल्या बँकींग करता यावे म्हणून अँप डाऊनलोडींगसाठी बँकेत आले होते. अर्थातच आजोबांची सोय बघणं हा निरपेक्ष प्रामाणिक उद्देश नातवाचा होता पण आजोबा ह्यातून काय मिळवतात आहेत हे बघण्याच्या नादात आजोबा खूप काही गमावतात आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. आजोबा गमावतं होते त्यांचा वेळ घालवणं, आजोबा गमावत होते संवाद साधणं,आजोबा गमावत होते तो पासबुकातील आकडे बघतं राहण्याचा,मनाशी हिशोब करण्याचा आनंद, ते गमावतं होते मित्रमंडळी,समवयस्क परिचीत लोकांना एकत्र भेटण्याचा,वैचारिक देवाणघेवाणीचा आनंद,ते गमावतं होते अतिशय काटकसरीतून जमा केलेल्या पुंजीतुन केलेले फिक्स डिपाँझीट परतपरत वाचण्याचा, हाताळण्याचा आनंद.हे त्या नातवाला कळतच नव्हते वा जाणवतही नव्हते. असो कालाय तस्मै नमः हेच खरे.दोघही योग्यच होते फरक फक्त पिढीचा होता.”कुछ पाने के लिये कुछ तो खोना पडता है”ह्यावर परत एकदा विश्वास बसला.

11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरण मध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरण मधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम केलेच कसे ह्या विचारानेच जगाला धक्का बसला. 

भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती.  १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.

तंत्रज्ञानाचा विषय निघाला तेव्हा अजून लक्षात आलं अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली. ह्या व्यतिरिक्त भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.

आजचा हा तंत्रज्ञान दिन आपल्यासाठी एखादा सोहळा,समारंभ ह्या  सारखाच महत्त्वाचा आहे हे नक्की. आजच्या ह्या तंत्रज्ञान दिनी ह्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments