श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “फोन स्टोरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

फोनवर बोलणाऱ्यांचे किती प्रकार सांगता येतील. काहींना निरोप सांगितला, किंवा मिळाला, की फोन ठेवण्याची घाई असते. काही फक्त हं……. बरे……. ठिक आहे……. बघतो……. चालेल….. नक्की असे म्हणत फोन ठेवतात. आपल्याला अजूनही काही सांगायचे असते‌…… पण त्याने फोन ठेवल्याने आपण फक्त फोनकडे बघतो…. कारण फोन ठेवणारा आपल्या समोर नसतो. (मग आपण सवडीने त्याला बघतो.)

पण बायकांचे फोनचे तंत्र वेगळेच असते. ज्या कारणासाठी फोन केला आहे तो विषय सोडून इतर विषयांवर देखील थोडक्यात विस्तृत चर्चा करण्याचे कसब यांच्याकडे असते.

हे समजण्याचे कारण आज सकाळी झालेले फोन. विषय साधाच होता. केरला स्टोरी सिनेमा बघायला जायचे का? किती वाजता? सह जायचे की आपले आपण…..

पहिला फोन झाला….. जायचे की नाही या चर्चेत काय सुरू आहे?….. अशी सुरुवात झाली……स्वयंपाक…….  पलीकडून उत्तर……. मग आज काय करते आहेस? यावर भाजी पोळी पासून आमरसापर्यंत सगळा स्वयंपाक फोनवर सांगून झाला…… आता त्यांच्याकडची भाजी आम्हाला नवीन होती…… झालं….. केरला स्टोरी थोडी बाजूला राहिली, आणि भाजीची स्टोरी (डायरेक्शन सह) अगोदर संपली…….

मग दुसरा फोन…… (पहिला फोन संपेपर्यंत माझा चहा गरम करून, पिऊन देखील संपला होता.) परत सुरुवात काय करतेस? केरला स्टोरी ला जायचे का?….. हो जाऊ……. पण आत्ता साडी खरेदी करायला जाणार आहे……. मग काय? कुठे? कोण? काय विशेष? यावर माहिती असणाऱ्या सगळ्या साड्यांच्या प्रकाराची आणि काय घ्यायचे यांची स्टोरी फोनवरच सुरू झाली……. (तो पर्यंत दुध वर येते आहे का ते बघणे, आणि कुकरच्या तीन शिट्या झाल्या की गॅस बंद करायची जबाबदारी माझ्यावर होती ती देखील संपली. कदाचित प्रेशर देखील उतरले असावे…….. यांच्या लांबलेल्या फोनमुळे कुकरने देखील रागारागातच शिट्या दिल्या असाव्यात असे वाटले.) पण फोन सुरुच……. केरला स्टोरी अगोदर साडी स्टोरी झाली…..

कपड्यांच्या बाबतीत मला यांचे कळत नाही……. (हे त्यांनी पदोपदी खरेतर पदरोपदरी मला ऐकवले आहे……) म्हणजे यांनी नवीन कपडे घेतल्यामुळे यांचे आधीचे कपडे जुने होतात. का कपडे जुने झाल्यामुळे हे नवीन कपडे घेतात. (आधी कोंबडी की आधी अंड इतकाच हा कठीण प्रश्न आहे.)

अजुनही फोन करायचे होतेच. मग तिसरा फोन…….. तो पर्यंत माझे मोबाईलवर कोणत्या ठिकाणी किती वाजता

शो आहेत याचा अभ्यास सुरू झाला होता. यांची परत फोन लाऊन विचारणा सुरू झाली. केरला स्टोरी…….. बास येवढेच म्हटले असेल…….. तो पर्यंत पलिकडून हो…. नक्की……. मी पण तेच विचारणार होते……… मागचा एक कार्यक्रम माझा मिस झाला…….. मग तो मिस झालेला कार्यक्रम कोणता होता……. तो कसा मिस झाला……. यावर त्यांची (मिसींग) स्टोरी….. आणि त्याच कार्यक्रमात किती मजा आली……. कोण कोण आले होते…….. यावर यांची स्टोरी…….. असा स्टोरी टेलींगचा कार्यक्रम सुरू झाला…… यांच्या स्टोरी संपेपर्यंत माझा जवळपास सगळा पेपर वाचून झाला होता…….

शेवटी एकदाचे किती जणांनी आणि कोणत्या शो ला जायचे हे ठरले आणि मी तिकिटे बुक करायला फोन हातात घेतला.

आता जेवणानंतर कोण कसे येणार…. आपण कोणाला कुठून बरोबर घ्यायचे की आपण कोणाबरोबर जायचे यासाठी परत फोन होतीलच. तेव्हा अजुनही काही वेगळ्या स्टोरी ऐकायला येतीलच……

अशी ही केरला स्टोरी ची तिकीटे काढायची स्टोरी……

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments