श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “गडद मरण-स्वर (अनुवादित – The Last Post!)” ☆ भावानुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆
गडद काळोखामुळे दोन्ही बाजूंनी लढाई थांबबावी लागली आहे. उद्याच्या पहिल्या किरणांसोबत पुन्हा मृत्यू नाचू लागेल रणांगणावर आणि घेईल घास कुणाचाही. मृत्यूला कुठे शत्रू आणि मित्र सैन्यातला फरक समजतो? कुणीही मेला तरी त्याच्याच मुखात जाणार म्हणून तो हसतमुखाने वावरत असतो….वाट बघत थंड पडत जाणा-या श्वासांची.
मित्रसैन्य अलीकडच्या आणि शत्रूसैन्य पलीकडच्या भागात लपून बसले आहे अंधाराच्या पडद्याआड. गोळ्या झाडायच्या तरी कुणावर? दिसले तर पाहिजे या काळोखात. म्हणून परस्पर बाजूंना थोडीशी जरी हालचाल झाल्याची जाणिव झाली की अंदाजे बार टाकायच्या त्या दिशेला. यावेळी मात्र दोन्ही बाजू शांत होत्या. एका सैन्य तुकडीचा नायक आपल्या खंदकात भिंतीला टेकून बसला आहे. रातकिडे युद्धभूमीतल्या दिवसभरातल्या घडामोडींची जणू चर्चा करताहेत. झाडावरचं एखादं वटवाघुळ मधूनच दचकून उठल्यासारखं उडून जातंय आणि पुन्हा त्याच जागी येऊन चिकटून जातंय एखाद्या फांदीला. त्यांना रात्रीच दिसतं म्हणे !
एवढ्यात सैन्य तुकडी-नायकाच्या तीक्ष्ण कानांनी रणभूमीवरचा कण्हण्याचा क्षीण आवाज टिपला. कुणी तरी सैनिक बिचारा शेवटच्या घटका लवकर उलटून जाव्यात, एकदाचं सुटून जावं परलोकीच्या अज्ञात मुलखात यासाठी देवाला साकडं घालतोय. आपण आता हे जग पुन्हा पाहू शकणार नाही, याची त्याला पूर्ण खात्री वाटते आहे. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई, बहिण, भाऊ, मित्र उभे आहेत..आणि उभे आहेत बाबा ! त्यांचा निरोप घेऊन तो मागील वर्षीच पलीकडच्या राज्यात गेला होता संगीत शिकायला. आणि आता ही दोन्ही राज्ये एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. बाबांना न कळवताच तो त्या राज्याच्या सैन्यात भरती झालाय…संगीत वाद्यांच्या जागी आता त्याच्या नाजूक हातांत जीवघेणी हत्यारं आहेत.
विव्हळण्याचा तो आवाज सैन्य-तुकडी नायकाला शांत बसू देईना. कोण जाणे…तो आपल्याकडचाच सैनिक असला तर? त्याचा जीव वाचवू शकतो आपण ! नायकाच्या डोक्यात विचार सुरू होता. वरिष्ठांना विचारायला वेळ नव्हता आणि तशी परवानगीही कुणी त्याला दिली नसती. खुल्या मैदानातल्या युद्धभूमीत जाणं मोठ्या जोखमीचं होतं. तरीही नायक सरपटत सरपट्त निघाला त्या वेदनेच्या आवाजाच्या रोखाने. हालचाल टिपली गेली दूरवरच्या अंधारातून आणि गोळीबार होऊ लागला. तशाही स्थितीत नायकाने त्या जवानाला खेचून आणलेच आपल्या खंदकात. पण मघाशी आर्त स्वराच्या साथीने सुरू असलेले त्याचे श्वास मात्र आता थांबले होते. नायकाने खंदकातील कंदील त्या जवानाच्या चेह-यावर प्रकाशाची तिरीप पडेल असा धरला आणि त्याचा श्वास थबकला….बेटा ! त्याने अस्फुट किंकाळी फोडली. मोठ्याने रडणं त्याला शोभलं नसतं. त्याने कंदीलाची वात आणखी मोठी केली. आपल्या लेकाच्या चेह-यावरचं रक्त आपल्या हातांनी पुसलं आणि त्याच्या कपाळाचं दीर्घ चुंबन घेतलं. माणसा-माणसांतील रक्तरंजित संघर्षाने एका मुलाला आपल्या बापापासून कायमचं दूर केलं होतं.
रात्रभर नायक आसवं ढाळत राहिला. शत्रूकडून अधून मधून होत असलेल्या गोळीबारास उत्तर देण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. उलट तिकडूनच एखादी गोळी यावी आणि काळीज फाडून निघून जावी आरपार असं त्याला मनोमन वाटत होतं. तेवढीच भरपाई होईल एका जीवाची. आमच्या गोळ्यांनी हा संपला आणि त्यांच्या गोळ्यांनी मी संपून जावं…एवढा साधा हिशेब होता !
वरिष्ठांपर्यंत सकाळी बातमी गेलीच. सैन्य तुकडी-नायक आता फक्त एक बाप होता..अभागी ! त्याने विनंती केली…माझ्या लेकाला सैनिकी मानवंदना देऊन, बिगुलच्या, ड्रम्सच्या गजरात त्याला त्याच्या शेवटच्या प्रवासाला पाठवू द्यात…माझा लेक सैनिक होण्यासाठी नव्हता जन्माला आला. त्याला संगीतकार व्हायचं होतं ! व्यवस्थेकडून नकार आला…कारण कितीही केला तरी तो शत्रू सैनिक. फार तर एक सैनिक देऊ बिगुल वाजवू शकणारा..त्याच्या थडग्यावर ! अगतिक बापाने हे मान्य केलं. लेकाच्या कोटाच्या खिशात त्याला एक गाणं सापडलं..कागदावर लिहिलेलं…रक्ताने माखलेल्या. गाण्याच्या शब्दांसोबत गाण्याच्या वाद्य-सुरावटीही वळणदार आकारात कोरून ठेवल्या होत्या कागदावर आणि खाली सही होती दिमाखदार….संगीतकार…..कुमार…………!
बापानं त्याच्या त्या गतप्राण झालेल्या मुलाचं शव खड्ड्यात हळूहळू उतरवलं….जगातली सारी आसवं त्याच्याच डोळ्यांत अवतरली होती जणू…..त्या आसवांनी खड्ड्याच्या वरची माती भिजू लागली…त्यातलीच एक मूठ माती त्याने खड्ड्यात शांतपणे चिरनिद्रेत गेलेल्या त्या देहावर टाकली. बापाच्या कुशीत मूल झोपतं तसा त्याचा चेहरा दिसत होता.
बिगुल वाजवणा-या सैनिकासमोर बापानं ती सुरावट धरली….जीव ओतून..प्राण फुंकून वाजव…माझ्या मुलाचे शेवटचे स्वर ! त्यानेही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही…..छातीतली सर्व हवा त्याने बिगुलात फुंकण्यास प्रारंभ केला. युद्धभूमी डोळ्यांत प्राण आणून या मरणसोहळ्यातील स्वरांची उधळण पाहू लागली..कानात प्राण आणून शब्दांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू लागली…..
सैनिका…दिवस कडेला गेलाय आता….सूर्य तळ्याच्या, डोंगरांच्या आणि आभाळाच्याही पल्याड गेलाय.
सगळं ठीक आहे आता…नीज शांतपणे…दमला असशील ! देव इथंच जवळपास आहे !
अंधार डोळ्यांना काही पाहू देत नाहीये….पण आकाशातला एक तारा लकाकू लागलाय !
दुरून कुठून तरी रात्र येऊ लागलीय चोरपावलांनी !
देवाचे आभार मानावेत आज दिवसभरातल्या श्वासांसाठी !
ह्या विशाल गगनाखाली, ह्या सूर्याखाली, या ता-यांखाली
आपण आहोत आणि आपल्यावर त्याची दृष्टी आहे….
नीज बेटा ! देव इथंच जवळपासच आहे ! ……
….. बिगुल वाजवणारा सैनिक प्राणपणानं ही सुरावट वाजवून आता थकलाय…त्याच्या बिगुलातून निघणारे सूर आता मंद मंद होत जाताहेत ! ते संपताच बाप त्याच्याकडे वळून म्हणाला….आता ही लास्ट पोस्ट सुरावट थांबव…. शिबिरातल्या सैनिकांना झोपेतून उठवणारी सुरावट..रिवाली वाजव…मित्रा ! हा माझा फौजी पोरगा आता उठेल…अंगावर सैनिकी वर्दी चढवेल आणि निघेल युद्धभूमीवर…वन्स अ सोल्जर…always अ सोल्जर !
(सैनिकांना अंतिम विदाई देताना बिगुलवर दी लास्ट पोस्ट सुरावट वाजवली जाते. त्या सुरावटीचा इतिहास अभ्यासताना ही एक काहीशी दंतकथा वाटणारी किंवा असणारी हृदयद्रावक कथा हाती लागली. ती आपल्यासाठी मराठीत लिहिली…माझ्या पद्धतीने आणि आकलनाच्या आवाक्याने.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈