श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

 

☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी  

मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो ! अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले ! 

“ संस्कृत दासबोध ! “ अरे बापरे ! प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद ! कसं शक्य आहे?

हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा ! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला ! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला !

आता आली का पंचाईत ! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा? समर्थांची प्रार्थना केली मनोमन…अणि दिवस पुढे सरले… पण नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे “ .. …रामशास्त्री…असो. समर्थेच्छा !

वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल ! त्यात संघाची चड्डी घातलेली, त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…

म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला !

एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला ! “कोण रे तू? इथं कुठं वाट चुकलास?”

मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला…” जा पळ घरी…इथं काय मिळणार तुला?

जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊ देत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे. इथं काय ठेवलंय..  दगडं आणि माती ! “ 

मी म्हणालो, “ इथंच तर खर सुख आहे बाबा ! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?” 

बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला ! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, “ अस्सं !!! बर मग जा आत ! “

मी दर्शन घेऊन परत आलो ! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती !

मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय?”

“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात !” 

“वेळापुरे? श्याम?” .. “अरे श्याम नाही राम !”

आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! अरे बापरे ! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, “ ते संस्कृत दासबोध कर्ते? “ 

“तिथं तिथं…” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, ” तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते ! मी साधा मास्तरडा रे ! मला काय दगड कळतंय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक…त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही !”

मती सुन्न झाली ! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?

नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे ! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय ! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहून अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे !

बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले– “ घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा ! तरच कार्य सिद्धीस जाईल ! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला ! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून ! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत ! काय चमत्कार आहे हा ! वाचून पहा ग्रंथ ! खरोखरीच अप्रतिम झाला आहे !

मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध.कॉम वर आला !

ते म्हणाले, “अरे माझी मूर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे ! त्यांना विचार आणि दे टाकून ! माझे काय आहे त्यात !”…. 

डोळ्यात पाणी आले…पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले– “अरे अरे अरे ! सांभाळ ! डोक्याला शेण लागेल तुझ्या !”

मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, ” मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या  आणि खो खो खो हसू लागले !

— त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले !

अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे !

हा संस्कृत दासबोध dasbodh.com वर नक्की वाचा ! आवडॆल तुम्हाला !

॥ www.dasbodh.com ॥

लेखक : अज्ञात. 

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments