श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 163 ☆ संत पुरंदर दास…☆ श्री सुजित कदम ☆
कर्नाटक पितामह
संत पुरंदर दास
व्यासराये गोरविले
हाची खरा हरीदास..! १
शास्त्र शुद्ध संगीताचे
अवगत केले ज्ञान
आदिगुरू पितामह
प्राप्त केला बहुमान…! २
श्रीनिवास नायक हे
मुळ नाव या संतांचे
सराफीचा व्यवसाय
बडे व्यापारी मोत्यांचे…! ३
धनवान असे जरी
वृत्ती कंजूष तयाची
आला पांडुरंग दारी
घेण्या परीक्षा दासाची…! ४
आला पांडुरंग दारी
नथ पत्नीची घेऊन
ब्राह्मणाच्या रूपांमध्ये
गेला परीक्षा घेऊन…! ५
दान देई ब्राम्हणाला
दास पत्नी सरस्वती
दान वस्तू विकूनीया
शिकविली जगरीती…! ६
केला दासां उपदेश
सोडी हव्यास धनाचा
दान केले धन सारे
मार्ग वैष्णव धर्माचा…! ७
आला विजय नगरी
पांडुरंग दुष्टांताने
पंथ वैष्णव माधव
वाटचाल संगीताने…! ८
ग्रंथ विठ्ठल विजय
कथा जीवनाची सारी
आत्मा चरीत्र सुरस
सुख दुःख घडे वारी..! ९
उगाभोग नी सुळादी
काव्य प्रकार दासाचे
माया मालव गौळ हे
राग दैवी संगीताचे…! १०
भक्ती रचना विपुल
पदे कानडी भाषेत
भजनाचे अनुवाद
झाले विविध भाषेत…! ११
स्वरसाज अभंगाला
केले अभंग गायन
सुर ताल संगीताने
मुग्ध होती प्रजाजन…! १२
राजा कृष्ण देवराय
भक्त झाला या संतांचा
केले कार्य सामाजिक
कळवळा गरीबांचा….! १३
दास मंडप प्रसिद्ध
तिरूपती मंदिरात
देई मंडप बांधून
कृष्णदेव उत्साहात…! १४
कर्नाटक प्रांतांमध्ये
केला प्रचार प्रसार
संत पुरंदर दास
संकीर्तन सेवाधार….! १५
पुरंदर विठ्ठल ही
नाममुद्रा अभंगात
हंपी गावी कार्य थोर
ईश भक्ती अंतरात…! १६
आहे टपाल तिकीट
गौरवार्थ हा सन्मान
पुण्यतिथी या दासाची
हंपी गावी सेवा दान…! १७
आहे जीवन संगीत
संत पुरंदर दास
संत साहित्य विश्वात
मोती अनमोल खास…! १८
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈