श्री दीपक तांबोळी
अल्प परिचय —
प्रकाशित साहित्य:-
कथासंग्रह
कथा माणुसकीच्या, हा खेळ भावनांचा, रंग हळव्या मनाचे, गिफ्ट आणि अशी माणसं अशा गोष्टी
पुरस्कार-
विविध मान्यवर साहित्य मंडळांचे 16 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत
जीवनरंग
☆ पीळ… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
डाँक्टरांनी श्यामलाबाईंच्या छातीवर स्टेथास्कोप ठेवून थोडा वेळ तपासणी केली. मग वैभवकडे पहात ते म्हणाले,
” साँरी शी इज नो मोअर “
ते ऐकताच वैभवने “आईsss”असा जोरात हंबरडा फोडत आईच्या पार्थिवाला मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडू लागला. जरा सावरल्यावर त्याने बाजूला पाहिलं. त्याचे वडील-जयंतराव खुर्चीवर बसून रडत होते. गेली पाचसहा वर्ष श्यामलाबाईंच्या आजारपणामुळे जे हाल बापलेकांचे झाले होते त्यांचं स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसत होतं. पाचसहा वर्षं प्रचंड प्रयत्न करुन आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही हाती शुन्य लागलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न बघायची श्यामलाबाईंची खुप इच्छा होती पण तीही अपूर्ण राहिली होती.
त्याच्या खांद्यावर हात पडला तसं वैभवने वळून पाहिलं. शेजारपाजारचे बरेच जण जमा झाले होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या पाटील काकांनी त्याला नजरेने इशारा केला तसा तो उठून त्यांच्यासोबत बाहेर आला.
” वैभव कुणाला फोन करुन कळवायचं असेल तर मला नंबर दे मी फोन करतो “
‘ मामा, मावशीला सोडून सगळ्यांना कळवून टाक वैभव ” अचानक जयंतराव मागून येत म्हणाले,
” असं कसं म्हणता बाबा?त्यांची सख्खी बहिण होती आई “
” असू दे. मला नकोत ती दोघं इथं “
” कमाल करता जयंतदादा तुम्ही!अहो तुमची काहिही भांडणं असोत. सख्ख्या भाऊबहिणीला कळवणं आवश्यकच आहे. ” पाटील काका आश्चर्य वाटून म्हणाले.
” बरोबर म्हणताय पाटील काका तुम्ही. अहो भाऊबहिण आले नाही तर बाईंच्या पिंडाला कावळा तरी शिवेल का? काही काय सांगताय जयंतदादा?”
घोळक्यात बसलेली एक म्हातारी रागावून म्हणाली तसे जयंतराव चुप बसले. वैभवने त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत मोबाईल काढला आणि पहिला फोन संजूमामाला लावला. ‘मामा , अरे आई गेली. ‘ संजू रडत रडत बोलला.
” “काय्य्यsss?कधी आणि कशी?”मामा ओरडला आणि रडू लागला.
” आताच गेली आणि तुला तर माहितीच आहे की ती पाचसहा वर्षापासून आजारीच होती. तिला काय झालंय हे डाँक्टरांना शेवटपर्यंत कळलं नाही. मागच्या आठवड्यात तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या म्हणून आयसीयूत अँडमीट केलं होतं. काल डाँक्टरांनी ट्रिटमेंटचा काही उपयोग होत नाहिये हे पाहून तिला घरी घेऊन जायला सांगितलं होतं. म्हणून काल घरी घेऊन आलो होतो. कालपासून ती मला मामाला बोलव असं म्हणत होती “
“अरे मग कळवलं का नाही मला?मी ताबडतोब आलो असतो “
वैभव बाहेर अंगणात आला. आसपास जयंतराव नाहीत हे पाहून हळूच म्हणाला,
” बाबांनी मला तुला कळवायला मनाई केली होती”
एक क्षण शांतता पसरली मग मामा जोरात ओरडून म्हणाला,
“हलकट आहे तुझा बाप. मरतांना सुद्धा त्याने माझ्या बहिणीची इच्छा पुर्ण केली नाही “
आता मामा जोरजोरात रडू लागला. ते ऐकून वैभवही रडू लागला.
थोड्या वेळाने भावना ओसरल्यावर मामा म्हणाला,
“मी निघतो लगेच. विद्या मावशीला तू कळवलंय का?”
“नाही. बाबांनी मना केलं होतं “
” खरंच एक नंबरचा नीच माणूस आहे. पण आता त्याच्यावर बोलण्याची ही वेळ नाही. मी कळवतो विद्याला आणि मी लगेच निघतो. तरी मला तीन तास तरी लागतील पोहचायला, तोपर्यंत थांबवून ठेव तुझ्या बापाला. नाहितर आमची शेवटची सुध्दा भेट होऊ नये म्हणून मुद्दाम घाई करायचा “
” नाही मामा. मावशी आणि तू आल्याशिवाय मी बाबांना निघू देणार नाही. खुप झाली त्यांची नाटकं. आता मी त्यांचं ऐकून घेणार नाही “
” गुड. बरं तुला पैशांची मदत हवीये का?”
वैभवला गहिवरून आलं. बाबा मामाशी किती वाईट वागले पण मामाने आपला चांगूलपणा सोडला नव्हता.
“नको. सध्यातरी आहेत. अडचण आलीच तर तसं तुला सांगतो. “
” बरं. ठेवतो फोन “
मामाने फोन ठेवला आणि वैभवला मागच्या गोष्टी आठवू लागल्या. संजूमामा आणि जयंतराव यांचं भांडण अगदी जयंतरावांच्या लग्नापासून होतं आणि त्यात चूक जयंतरावांच्या वडिलांचीच होती. लग्नाला “आमची फक्त पन्नास माणसं असतील” असं अगोदर सांगून जयंतरावांचे वडील दोनशे माणसं घेऊन गेले होते. बरं वाढलेल्या माणसांची आगावू कल्पनाही त्यांनी मुलीकडच्या लोकांना दिली नाही. अचानक दिडशे माणसं जास्त आल्यामुळे संजूमामा गांगरला. त्यावेळी कँटरर्सना जेवणाचे काँट्रॅक्ट देण्याची पध्दत नव्हती. अर्थातच ऐनवेळी किराणा आणून जेवण तयार करण्यात साहजिकच उशीर झाला. जेवण्याच्या पंगतीला उशीर झाला, वराकडच्या मंडळींना ताटकळत बसावं लागलं म्हणून जयंतरावांच्या वडिलांनी आरडाओरड केली. आतापर्यंत शांततेने सगळं निभावून नेणाऱ्या संजूमामाचा संयम सुटला आणि त्याने सगळ्या लोकांसमोर जयंतरावांच्या वडिलांची चांगलीच कान उघाडणी केली. नवरामुलगा म्हणून जयंतराव त्यावेळी काही बोलले नाहीत पण वडिलांचा अपमान केला म्हणून त्यांनी संजूमामाशी कायमचा अबोला धरला. मात्र संधी मिळाली की ते चारचौघात संजूमामाचा पाण उतारा करत. त्याला वाटेल ते बोलत. इतर नातेवाईंकांमध्येही त्याची बदनामी करत, पण आपल्या बहिणीचा संसार व्यवस्थित रहावा म्हणून संजू सगळं सहन करत होता. सात आठ वर्षांपूर्वी संजूचा जुना वडिलोपार्जित वाडा विकला गेला. त्यावेळी वैभवच्या आईने जयंतरावांना न सांगताच एक रुपयाही हिस्सा न घेता हक्कसोड पत्रावर सह्या केल्या होत्या. तिचंही साहजिकच होतं. ज्या माणसाने आयुष्यभर आपल्या भावाचा अपमान केला त्याला आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीतला एक रुपयाही द्यायची त्या माऊलीची इच्छा नव्हती. एक वर्षाच्या आतच जयंतरावांना ही गोष्ट कुठूनतरी कळली आणि त्यांनी एकच आकांडतांडव केलं. श्यामलाबाईंना आणि संजूला खुप शिव्या दिल्या. संजूशी आधीच संबंध खराब होते ते आता कायमचेच तोडून टाकले. तीन महिने ते श्यामला बाईंशी बोलले नाहीत. त्या दिवसांनंतर त्यांनी आपल्या सासरी पाऊलही टाकलं नाही. संजूने मात्र आपलं कर्तव्य सोडलं नाही. दर दिवाळीला तो आपल्या बहिण, मेव्हण्याला न चुकता निमंत्रण द्यायचा पण जयंतराव त्याच्याशी बोलायचे नाहीत शिवाय श्यामला बाईंनाही माहेरी पाठवायचे नाहीत. श्यामलाबाईंच्या शेवटच्या दिवसात त्यांची भावाला भेटायची इच्छाही त्यांनी पुर्ण होऊ दिली नव्हती.
बरोबर तीन तासांनी संजू आला. आल्याआल्या आपल्या मेव्हण्याला भेटायला गेला. आपल्यापरीने त्याने जयंतरावांना सांत्वन करायचा प्रयत्न केला. पण जयंतराव त्याच्याशी एक शब्दानेही बोलले नाहीत. सुंभ जळाला पण पीळ मात्र तसाच होता. थोड्या वेळाने विद्या आली. तिने मात्र काळवेळ न बघता बहिणीच्या तब्येतीबद्दल काहीही न कळविल्याबद्दल जयंतरावांची चांगलीच खरडपट्टी काढली. तिच्याशीही जयंतराव एक शब्दानेही बोलले नाहीत.
अंत्यविधी पार पडला. सगळे घरी परतले. जयंतराव वैभवला घेऊन मागच्या खोलीत आले.
“वैभव कार्य पार पडलं. मामा मावशीला घरी जायला सांग “
वैभव एक क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिला. मग संतापून म्हणाला.
” कमाल करता बाबा तुम्ही!आईला जाऊन आताशी पाचसहा तासच झालेत आणि तिच्या सख्ख्या भावाबहिणीला मी घरी जायला सांगू?”
” मला ते डोळ्यासमोर सुध्दा नको आहेत “
आता मात्र वैभवची नस तडकली. वेळ कोणती आहे आणि हा माणूस आपलं जुनं वैर कुरवाळत बसला होता. तो जवळजवळ ओरडतच म्हणाला, ” मी नाही सांगणार. तुम्हांला सांगायचं असेल तर तुम्हीच सांगा. अशीही या दु:खाच्या प्रसंगी मला मामा मावशीची खुप गरज आहे”तो तिथून निघून बाहेर आला. बाहेरच्या खोलीत विद्या मावशी संजू मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. तिला तसं रडतांना पाहून वैभवला ही भडभडून आलं आणि तो मावशीला मिठी मारुन रडू लागला. मामा त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला,
” वैभव काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत ना!तुझ्या वडिलांमुळे आम्हांला मनात असुनही तुम्हांला मदत करता आली नाही. पण तू मात्र बिनधास्त आमच्याशी बोलत रहा. काही गरज लागली तर नि:संकोचपण सांग “
कित्येक वर्षात असं कुणी वैभवशी प्रेमाने बोललंच नव्हतं. ” खरंच आईच्या आजारपणात मामाचा आधार असता तर किती बरं वाटलं असतं. काय सांगावं कदाचित आई बरी सुद्धा झाली असती “वैभवच्या मनात विचार येऊन गेला.
” चल आम्ही निघतो. तिसऱ्या दिवशी परत येतो “मामा म्हणाला,
“का?थांबा ना. मी इथे एकटा पडेन. तुम्ही दोघं थांबलात तर बरं वाटेल “
” मला कल्पना आहे. पण नको. तुझा बाप आम्ही कधी जातो याकडे डोळे लावून बसला असेल. ते आमच्याशी बोलत नसतांना आम्हालाही घरात कोंडल्यासारखं होईल “
मामा बरोबरच म्हणत होता त्यामुळे वैभवचा नाईलाज झाला. मामामावशी गेले तसा वैभव उदास झाला. त्याला लहानपणीचे दिवस आठवले. खुप मजा यायची मामाकडे रहायला. दिवाळी आणि उन्हाळ्यातल्या सुट्यांची तो आतुरतेने वाट बघत असायचा. केव्हा एकदा सुट्या लागतात आणि मामाकडे जातो असं त्याला होऊन जायचं. वैभवला सख्खे भाऊबहिण नव्हते. त्यातून वडिलांचा स्वभाव असा शिघ्रकोपी. त्यामुळे स्वतःच्या घरी असंही त्याला करमायचं नाही. मामाकडे मात्र मोकळेपणा असायचा. तिथे गेल्यावर मामाची मुलं, विद्या मावशीची मुलं आणि तो स्वतः खुप धिंगाणा घालायचे. गंमत म्हणजे त्यावेळीही मोबाईल होते पण मामा मुलांना मोबाईलला हात लावू द्यायचा नाही. त्यामुळे ही मुलं दिवसभर खेळत असायची. प्रेमळ आजी जितके लाड करायची त्यांच्या दुप्पट लाड मामा करायचा. तेव्हा मामाची आर्थिक स्थिती जेमतेमच होती तरीही मामा खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेत नसे. खाण्यापिण्याची तर खुप रेलचेल असायची. रात्री गच्चीवर झोपता झोपता मामा आकाशातल्या ग्रह ताऱ्यांची माहिती द्यायचा. मामाकडे सुटीचे दिवस कधी संपायचे तेही कळत नसायचं.
” गेले ते आनंदाचे दिवस “वैभव मनातल्या मनात बोलला. त्याला आठवलं तो मोठा झाला, इंजिनीयर झाला तरीही मामाच्या घरी जायची त्याची ओढ कधीही कमी झाली नाही. सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते.
क्रमश: भाग १ –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈