श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ पीळ… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मागील भागात आपण पाहिले – सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते. आता इथून पुढे )
जयंतराव संजूचा रागराग करण्याचं अजून एक कारण होतं. जयंतरावांच्या लग्नाच्या वेळी आणि पुढची दहाबारा वर्षं संजूची परिस्थिती जवळजवळ गरीबीचीच होती. पण पुढे संजूने बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्याचं नशीब फळफळलं. गरीब संजू म्हणता म्हणता धनाढ्य शेठ होऊन गेला. सात आठ वर्षांपूर्वी त्याने मोठा बंगला बांधला. घरी दोन दोन चारचाकी आल्या. . गावांतल्या मोठमोठ्या लोकांशी, राजकीय पुढाऱ्यांशी त्याची चांगली घसट वाढली. . जयंतरावांचा एक नातेवाईक संजूच्या घराजवळच रहात होता. त्याच्याकडून त्यांना संजूच्या प्रगतीबद्दल कळायचं आणि मग त्यांचा जास्तच जळफळाट व्हायचा.
तिसऱ्या दिवशी संजू आणि विद्या परत आले. निमंत्रण नसतांना ते आल्याचं पाहून जयंतराव खवळले. वैभवला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं.
” वैभव तुझ्या मामा, मावशीला कोणी बोलावलं होतं?”त्यांनी रागाने विचारलं,
“मी बोलावलं होतं. का?”वैभव त्यांच्या नजरेला नजर भिडवत धिटाईने बोलला. जयंतराव क्षणभर चुप झाले. मग उसळून म्हणाले,
“आता पुढच्या विधींसाठी तरी त्यांना बोलावू नकोस. त्यांची बहिण गेली संपले त्यांचे संबंध “
” विधी संपेपर्यंत तरी त्यांचे संबंध रहातील बाबा आणि तोपर्यंत तरी मी त्यांना बोलावणारच. मग पुढचं पुढे पाहू “वैभव जोरातच बोलला पण मग त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. आजपर्यंत तो वडिलांशी अशा भाषेत बोलला नव्हता. का कुणास ठाऊक पण आता त्याला वडिलांची भिती वाटेनाशी झाली होती.
दशक्रिया विधी झाला पण पिंडाला कावळा शिवेना. कावळे घिरट्या घालत होते पण पिंडाला शिवत नव्हते. श्यामलाबाईंची शेवटची इच्छा काय होती हेच कुणाला कळत नव्हतं. सगळे उपाय थकले. वैभव रडू लागला. जयंतरावांचेही डोळे भरुन आले होते. अचानक संजूमामाला काय वाटलं कुणास ठाऊक. तो पुढे आला आणि वैभवला जवळ घेऊन म्हणाला,
” ताई काही काळजी करु नकोस. आम्ही मरेपर्यंत तुझ्या मुलाला अंतर देणार नाही. त्याचं लग्न, संसार सगळं व्यवस्थित करुन देऊ. “
तो तसं म्हणायचा अवकाश, कावळ्यांची फौज पिंडावर तुटून पडली. वैभव मामाला घट्ट मिठी मारुन रडू लागला. जयंतरावांना मात्र अपमान झाल्यासारखं वाटलं. याचा अर्थ स्पष्टच होता की मेल्यानंतरही बायकोचा त्यांच्यावर विश्वास नव्हता.
तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यावर मामा वैभवजवळ आला.
“वैभव आम्ही आता निघतो. आता यापुढे तुझ्या घरी आमचं येणं होईल की नाही ते सांगता येत नाही. पण तू आमच्याकडे नि:संकोच येत जा. काही मदत लागली तर आम्हांला सांगायला संकोचू नको. तुझ्या लग्नाचंही आम्ही बघायला तयार आहोत पण तुझ्या वडिलांना ते चालेल का? हे विचारुन घे. तुझ्या आईला तुझी काळजी घ्यायचं मी वचन दिलंय ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. अडचणीच्या वेळी रात्रीबेरात्री केव्हाही काँल कर, मी मदतीला हजर असेन. बरं. ताईच्या आजारपणात तुझा खर्च खुप झाला असेल म्हणून मी तुझ्या खात्यात दोन लाख ट्रान्सफर केले आहेत. पाहून घे. आणि हो. परत करायचा वेडेपणा करु नकोस. माझ्या बहिणीच्या कार्यासाठी मी खर्च केलेत असं समज “
वैभवला भडभडून आलं. त्याने मामाला मिठी मारली. रडतारडता तो म्हणाला,
” मी खुप एकटा पडलोय रे मामा. हे बाबा असे तिरसट स्वभावाचे. कसं होईल माझं ?”
“काही काळजी करु नकोस. आता बायको गेल्यामुळे तरी त्यांच्या स्वभावात फरक पडेल असं वाटतंय. “
वैभव काही बोलला नाही पण मामाचं बोलणं कितपत खरं होईल याचीच त्याला शंका वाटत होती.
सगळे पाहुणे गेल्यावर दोनतीन दिवसांनी वैभव वडिलांना म्हणाला,
“तुम्ही त्या मामाचा नेहमी रागराग करता पण बघा, शेवटी तोच मदतीला धावून आला. आईच्या अंत्यविधीसाठी त्यानेच मदत केली. शेवटी जातांनाही मला दोन लाख रुपये देऊन गेला. तुमच्या एकातरी नातेवाईकाने एक रुपया तरी काढून दिला का?”
एक क्षण जयंतराव चुप बसले मग उसळून म्हणाले,
“काही उपकार नाही केले तुझ्या मामाने!वडिलोपार्जित वाडा ८० लाखाला विकला. तेव्हा तुझ्या आईच्या हिश्शाचे ८ लाख त्याने स्वतःच खाऊन टाकले. एक रुपया तरी दिला का त्याने?”” चुकीचं म्हणताय तुम्ही. आई आणि मावशीनेच विनामुल्य हक्क सोडपत्र करुन दिलं होतं. मामा तर त्यांचा हिस्सा द्यायला तयार होता असं आईनेच मला तसं सांगितलं होतं. “
” खोटं आहे ते!गोडगोड बोलून त्याने त्यांच्याकडून सह्या करुन घेतल्या आणि नंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी पाठवलं. महाहलकट आहे तुझा मामा. “
आता मात्र वैभव खवळला.
“बस करा बाबा. आख्खं आयुष्य तुम्ही मामाला शिव्या देण्यात घालवलं. आता आई गेली. संपले तुमचे संबंध. आणि मला तर कधीच मामा वाईट दिसला नाही. तुम्ही किती त्याच्याशी वाईट वागता. त्याला हिडिसफिडीस करता. पण तो नेहमीच तुमच्याशी आदराने बोलतो. फक्त तुम्हांलाच तो वाईट दिसतो. विद्यामावशीच्या नवऱ्याचं तर त्याच्याशिवाय पान हलत नाही. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते कुठलंही काम करत नाहीत. इतके त्या दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. “
” बस पुरे कर तुझं ते मामा पुराण “जयंतराव ओरडून म्हणाले “मला त्यात आता काडीचाही इंटरेस्ट उरला नाहिये. आणि आता यापुढे मामाचं नावंही या घरात काढायचं नाही. समजलं ” त्यांच्या या अवताराने वैभव वरमला. आपल्या बापाला कसं समजवावं हे त्याला कळेना.
वैभव दिवसभर ड्युटीनिमित्त बाहेर असल्यामुळे जयंतराव घरी एकटेच असायचे. हुकूम गाजवायला आता बायको उरली नसल्याने त्यांना आयुष्यभर कधीही न केलेली कामं करावी लागत होती. घरच्या कामांसाठी बाई होती तरीसुद्धा स्वतःचा चहा करुन घेणं, पाणी भरणं इत्यादी कामं त्यांना करावीच लागायची. त्यामुळे त्यांची खुप चिडचिड व्हायची. स्वयंपाकाला त्यांनी बाई लावून घेतली होती पण बायकोच्या हातच्या चटकदार जेवणाची सवय असणाऱ्या जयंतरावांना तिच्या हातचा स्वयंपाक आवडत नव्हता. तिच्या मानाने वैभव छान भाज्या बनवायचा. म्हणून संध्याकाळी तो घरी आला की ते त्याला भाजी करायला सांगायचे. थकूनभागून आलेला वैभव कधीकधी त्यांच्या आग्रहास्तव करायचा देखील. पण रोजरोज त्याला शक्य होत नव्हतं. त्याने नाही म्हंटलं की दोघांचेही खटके उडायचे.
एक दिवस वैभव संतापून त्यांना म्हणाला,
“एवढंच जर चटकदार जेवण तुम्हांला आवडतं तर आईकडून शिकून का नाही घेतलंत?”
” मला काय माहीत ती इतक्या लवकर जाईल म्हणून!”
“हो. पण कधी तरी आपण स्वयंपाक करुन बायकोला आराम द्यावा असं तुम्हांला वाटलं नाही का?आईच्या आजारपणातही तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावायचात. तिचे हाल पहावत नव्हते म्हणून मीच स्वयंपाक शिकून घेतला पण तुम्हांला कधीही तिची किंव आली नाही ” ” मीच जर स्वयंपाक करायचा तर बायकोची गरजच काय?”
“याचा अर्थ तुम्ही आईला फक्त स्वयंपाक करणारी, घरकाम करणारी बाई असंच समजत होतात ना?माणूस म्हणून तुम्ही तिच्याकडे पाहिलंच नाही ना?”
“चुप बैस. मला शहाणपणा शिकवू नकोस. नसेल करायची तुला भाजी तर राहू दे. मी बाहेर जाऊन जेवून येतो “
“जरा अँडजस्ट करायला शिका बाबा. एवढंही काही वाईट बनवत नाहीत त्या स्वयंपाकवाल्या मावशी “
जयंतरावांनी त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलं मग ते कपडे घालून बाहेर निघून गेले. ते हाँटेलमध्ये जेवायला गेलेत हे उघड होतं.
वैभवला आता कंपनीतून घरी यायचीच इच्छा होत नव्हती. एकतर घरी आल्याआल्या हातात चहाचा कप हातात ठेवणारी, सोबत काहीतरी खायला देणारी आई नव्हती शिवाय घरी आल्याआल्या वडिलांचा चिडका चेहरा बघितला की त्याचा मुड खराब व्हायचा. त्यांच्या तापट स्वभावामुळे वडिलांबद्दल त्याला कधीही प्रेम वाटलं नव्हतं. जयंतरावांनी नोकरीत असतांना कधी घरात काम केलंच नव्हतं पण निव्रुत्तीनंतरही सटरफटर कामं सोडली तर दिवसभर टिव्ही पहाण्याव्यतिरिक्त ते कोणतंही काम करत नव्हते. बायको होती तोपर्यंत हे सगळं ठिक होतं पण ती गेल्यावरही वैभवच्या अंगावर सगळी कामं टाकून ते मोकळे व्हायचे. वैभवची त्याच्यामुळे चिडचिड व्हायची.
एक दिवस त्याने वैतागून मामाला फोन लावला,
” मामा या बाबांचं काय करायचं रे? खुप वैताग आणलाय त्यांनी. आजकाल घरातच थांबावसं वाटत नाही बघ मला “
” हे असं होणार याची कल्पना होतीच मला. तुझ्या वडिलांना मी गेल्या तेहतीस वर्षांपासून ओळखतोय. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. तुझ्या आईलाही खूप त्रास दिलाय त्यांनी. विचार कर कसा संसार केला असेल तिने. पण इतका त्रास सहन करुनही कधीही तिने आम्हांला नवऱ्याबद्दल वाईट सांगितलं नाही. कधी तक्रार केली नाही. ” पदरी पडलं आणि पवित्र झालं “एवढंच ती म्हणायची. तू एकदोन महिन्यातच त्यांना कंटाळून गेला. तिने तेहतीस वर्ष काढली आहेत अशा माणसासोबत. आम्हीही सहन केलंच ना त्यांना. माझा तर कायम दुःस्वास केला त्या माणसांने. कधी आदराने, प्रेमाने बोलला नाही. उलट संधी मिळेल तेव्हा चारचौघात अपमान करायचा. खुप संताप यायचा. कधीकधी तर ठोकून काढायची इच्छा व्हायची. पण बहिणीकडे बघून आम्ही शांत बसायचो. तुही जरा धीर धर. लवकरात लवकर लग्न करुन घे म्हणजे तुलाही एक प्रेमाचं माणूस मिळेल. “
“मी लग्नाला तयार आहे रे पण येणाऱ्या सुनेशी तरी बाबा चांगले वागतील का? की तिलाही आईसारखाच त्रास देतील?”
” हो. तोही प्रश्न आहेच. पण लग्न आज उद्याकडे करावंच लागणार आहे. आता तुही २८ वर्षाचा असशील. मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल. मी असं करतो, मुली बघायला सुरुवात करतो “
क्रमश: भाग २
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈