श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 191
☆ खडावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
एकेक शब्द माझा भक्तीरसात न्हावा
हृदयात नांदतो रे कान्हा तुझाच पावा
☆
वारीत चालताना म्हणतात पाउले ही
देहात विठ्ठलाचा संचार साठवावा
☆
रामास भरत म्हणतो सत्ता नकोय मजला
तू फक्त दे मला रे पायातल्या खडावा
☆
पंडीत ज्या शिळेला पाषाण म्हणुन पाही
पाथरवटास त्यातच ईश्वर उभा दिसावा
☆
काळ्याच चादरीवर आकाश पांघरोनी
झाडात भर दुपारी घेतोय कृष विसावा
☆
ब्रह्मास्त्र काल होते अणुबॉम्ब आज आहे
युद्धामधील जहरी संहार थांबवावा
☆
चातुर्य वापरावे उद्धारण्यास जीवन
भोंदूपणास कुठल्या थारा इथे नसावा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈