श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ हा औरंग मज प्यारा !… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
अबुल मुजफ्फर मुहउद्दीन मुहमद हे नाव वाचून फार बोध होणार नाही कदाचित. पण औरंगजेब हे नाव हा देश आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र कसा विसरू शकेल? औरंगजेब म्हणजे सिंहासनरत्न. आणि यालाच आलमगीर अशी उपाधी होती… म्हणजे जगज्जेता! छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूरायांच्या महाराष्ट्राच्या मातीतच या औरंगजेबाला मूठमाती द्यावी लागली. पण आपल्या स्मरणात हा धर्मांध,पाषाणहृदयी आणि सत्तापिपासु औरंगजेबही ठाण मांडून बसला आहे.
पण हेच नाव धारण करणारा आणखी एक भारतीय आपण पुन्हा आठवला पाहिजे… आणि स्मरणातही ठेवला पाहिजे… औरंगजेब महम्म्द खान असे या वीराचे नाव…रायफलमॅन औरंगजेब खान… भारतीय सेना !
रायफलमॅन औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ भारतीय लष्करात जम्मू अॅन्ड कश्मीर लाईट इन्फंट्री मध्ये सैनिकी सेवा करून निवृत्त झाले आहेत. एक भाऊ आधीच सैन्यात आहे. रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या एका काकांनी दहशतवादी विरोधी कारवाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. यांचे आणखी दोन भाऊ मोहम्मद तारीख आणि मोहम्मद शब्बीर प्रादेशिक सेनेत भरती होऊन देशसेवा करत आहेत.
हे औरंगजेब खान जम्मू-कश्मीरच्या ४४व्या राष्ट्रीय रायफल्स जम्मू अॅन्ड कश्मिर लाईट इन्फंट्रीमधील वीर शिपाईगडी…तरणेबांड,नीडर नौजवान..२०१२ मध्ये भरती झालेले. सैनिकी संस्कार रक्तात भिनलेले औरंगजेब सैनिक सोडून दुसरे काहीही होण्यासाठी जन्मालाच आलेले नव्हतेच मुळात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून औरंगजेब यांनी फौजी वर्दी अंगावर चढवली. भारतात घुसलेले परकीय दहशतवादी आणि देशाशी बेईमान असलेले स्थानिक माथेफिरू यांच्याविरुद्ध भारतीय सेनेच्या सुरू असलेल्या अनेक कारवायांमध्ये रायफलमॅन औरंगजेब खान आघाडीवर होते.
२०१८ हे वर्ष भारतीय सैन्य आणि अतिरेकी यांच्या संघर्षात भारताच्या बाजूने झुकते माप टाकणारे सिद्ध झाले होते. ४४,राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटने या वर्षी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल १९ अतिरेक्यांना त्यांच्या ‘आखरी अंजाम तक’ जाण्यात मोठी मदतच केली होती. ह्या युनिटच्या प्रवेशद्वाराबाहेर एक वाक्य लिहिलेला फलक आहे…त्यावर लिहिलेलं आहे…’ आज कॉन्टॅक्ट होगा ! म्हणजे आज आपली आणि अतिरेक्यांची समोरासमोर भेट होणारच आहे…तयारीत रहा गड्यांनो ! ….. ‘
अतिरेकीविरोधी कारवाई धडाक्यात सुरू होती…अनेक अतिरेकी मारले जात होते…त्यात एक मोठे नाव होते… समीर अहमद भट उर्फ टायगर ! हा हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर होता. यानेच मेजर मोहित शुक्ल यांना ‘मला मारून दाखव’ असे आव्हान विडीओद्वारे दिले होते. मेजर शुक्लसाहेबांनी त्याला त्याची विडीओ-धमकी चोवीस तास जुनी व्हायच्या आतच यमसदनी धाडला !
स्थानिक भागाची, इथल्या तरुणांच्या मानसिकतेची, त्यांच्या शक्ती आणि मर्मस्थळांची उत्तम माहिती असलेले औरंगजेब म्हणजे भारतीय सेनेच्या हातात असलेले अमोघ अस्त्रच बनले होते. अनेक धाडसी कारवायांमध्ये औरंगजेब सहभागी होते. अशाच एका कारवाईत बारामुल्ला मध्ये औरंगजेब यांनी एका जखमी सैनिकाचे प्राण वाचवताना तीन अतिरेक्याना ठार केले होते.
ईद जवळ आली होती. रायफलमॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी निघाले होते. सैनिकांना सुट्टीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जाण्याची अनुमती नसते. म्हणून औरंगजेब नि:शस्त्र होते. आपल्या युनिटच्या जवळूनच त्यांनी एका खाजगी कार चालकाकडे बसस्टॅन्डपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट घेतली. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हालाचालींवर शत्रूची नजर होती. कुणी तरी फितुरही झाले असावे बहुदा ! कार युनिटपासून दूर गेल्यावर लगेच त्यांच्यावर हल्ला केला गेला. कारमधून ओढून घेऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. दूर जंगलात नेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. काश्मीर खो-यातील जे तरुण देशाच्या बाजूने उभे आहेत, त्यांना धाक दाखवण्यासाठी, मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्या अतिरेक्यांनी औरंगजेब यांचा विडीओ बनवून प्रसारित करण्याचा घाट घातला होता. त्यांना वाटले असावे…हा गडी घाबरेल..प्राणांची भीक मागेल ! पण यातले काहीही झाले नाही. रायफलमॅन औरंगजेब यांनी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितले…” फौजी हूं….मौत से कैसा डर? मै अपना फर्ज निभा रहा हूं….तुम्हे जो करना है कर सकते हो !” आणि हे सांगताना औरंगजेब यांच्या चेह-यावर भीती नावाच्या भावनेचा लवलेशही नव्हता. आणि अर्थातच याचा त्या अतिरेक्यांना प्रचंड संताप आला असावा….त्यांनी तब्बल दहा दिवस त्यांना अमानुषपणे छळले आणि दहाव्या दिवशी रायफलच्या गोळ्यांनी छिन्न विछीन्न झालेला औरंगजेब यांचा देह रस्त्यावर टाकून ते अतिरेकी जंगलात पळून गेले ! दिवस होता १४ जून २०१८.
रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या अंत्ययात्रेस हजारोंचा जनसमुदाय लोटला होता… अतिरेक्यांच्या अंत्ययात्रांना जमतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ! भारतीय सैन्याने पूर्ण सैनिकी सन्मानाने त्यांना अंतिम निरोप दिला. या अलौकिक त्यागाची दखल घेत भारतीय सेनेने औरंगजेब यांना १४ ऑगस्ट २०१८ या दिवशी मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या जन्मगावातील काही तरुण गल्फ देशांमध्ये नोकरीस होते. त्यांनी भारतीय लष्करी दलांत सामील होऊन औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या नोक-या सोडून भारतात परतण्याचा निर्णय जाहीर केला… या बलिदानाच्या काहीच महिन्यानंतर औरंगजेब यांना मारण्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या सैन्याने ठार केला. दुस-या वर्षीच औरंगजेब यांचे दोन धाकटे भाऊ प्रादेशिक सेनेत भरती झाले ! एका बलिदानाने देशाला आणखी काही सैनिक मिळवून दिले होते…ही बलिदानाची किमया… हुतात्म्यांच्या रक्ताच्या एक-एका थेंबातून एक एक सैनिक तयार होऊ शकतो… म्हणून बलिदाने सातत्याने तरुणांच्या नजरेसमोर असायला पाहिजेत !
१० मे २०२३ रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी एका विशेष समारंभात या शूर हुतात्मा सैनिकाच्या माता-पित्याकडे, महमद हनीफ आणि राजबेगम यांच्याकडे त्यांच्या बहादूर मुलाने मिळवलेले शौर्यचक्र सुपूर्द केले ! या कार्यक्रमात मेजर आदित्य कुमार (10,गढवाल रायफल्स) मुदस्सीर अहमद शेख (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर शौर्य चक्र, कॉन्स्टेबल रोहित कुमार (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांने अत्यंत दु:खद अंत:करणाने हे पुरस्कार स्विकारले. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी शिष्टाचार बाजूला सारत वीरपत्नी आणि वीरमातांना स्वत: पुढे होऊन आलिंगन दिले… त्यांचे अश्रू पुसले… आणि सारा भारत देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… असा संदेश दिला.
या भावपूर्ण समारंभात महामहिम राष्ट्रपती महोदयांनी विविध संरक्षण सेवांमधील शूरांना एकूण आठ कीर्ती चक्र (यात पाच मरणोत्तर), एकोणतीस शौर्य चक्र (यातील पाच मरणोत्तर) प्रदान केली. डिफेन्स इनव्हेस्टीचर नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण समारंभ वर्षातून एकदा आयोजित केला जातो. याचे चित्रण दूरचित्रवाणी बातम्यांमध्ये दाखवले जाते. असे समारंभ खरे तर राष्ट्रीय महत्त्वाचे ठरावेत, शाळांतून-महाविद्यालयांतून याची माहिती दिली गेली पाहिजे.
या लेखातील सर्व छायाचित्रे नीट पहावीत, अशी विनंती आहे. हुतात्मा औरंगजेब यांना अखेरची सलामी दिली जात आहे आणि त्याच छायाचित्रात अतिरेक्यांच्या मगरमिठीत असतानाही नीडर राहिलेले औरंगजेब, त्यांच्या आई-वडीलांनी शौर्यचक्र स्विकारल्यानंतर मा.राष्ट्रपती महोदयांनी त्यांना हात जोडून केलेले अभिवादन, औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ सैन्यात सामील झाले तेंव्हा त्यांच्या आईच्या चेह-यावरील अभिमान,मा.राष्ट्रपती महोदयांनी वीरमातेला दिलेले सांत्वन-आलिंगन ! हर तस्वीर कुछ कहना चाहती है ! यह देश कब सुनेगा उनकी बाते? सत्ता-संघर्ष, ख-या ख-या पैशांची क्रिकेट-सर्कस, राजकीय-सामाजिक आंदोलनं, मौज-मज्जा यांच्या गदारोळात हे असे महान समारंभ एका बाजूला राहतात….हे खेदजनक आहे, हे कुणीही मान्यच करेल !
… कोण जाणे, हे वाचून कुणी औरंगजेब सेनेची वर्दी शरीरावर परिधान करून देशरक्षणार्थ पुढे सरसावेलही ! जयहिंद !!!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈