सौ. ज्योत्स्ना तानवडे
☆ “सात्विक पर्व संपले ” ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
(३०जुलै १९२८—०४जुन २०२३)
४ जून ची संध्याकाळ. मावळत्या सूर्या बरोबर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक तळपतं व्यक्तिमत्व अनंतात विलिन झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रत्येकाच्या मनात आपुलकीची, जिव्हाळ्याची जागा निर्माण करणारे एक सोज्वळ, शांत, हसरं व्यक्तिमत्व हरपलं ते म्हणजे सुलोचनादीदी.
त्यांचं मूळ नाव ‘रंगू’. पण त्यांचे बोलके डोळे बघून भालजी पेंढारकरांनी त्यांचं नाव ठेवलं ‘सुलोचना’. तेच खूप लोकप्रिय झालं. त्या सर्वांच्या ‘दीदी’ झाल्या.
त्यांनी असंख्य मराठी हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या अकृत्रिम अभिनयाने प्रत्येक भूमिका त्या जगल्या आणि आई, वहिनी, बहीण आजी ही त्यांची नाती प्रेक्षकांच्या मनात दृढ झाली. त्यांनी साकारलेली आई म्हणजे साक्षात वात्सल्यमूर्तीच होती. त्यांच्या ऐतिहासिक भूमिका रूबाबदार, भारदस्त, करारी होत्या. त्यांचं शांत, सोज्वळ, प्रसन्न रूप आणि प्रेमाची वत्सल नजर कायम मनात कोरली गेली आहे.
कितीतरी गाणी ऐकली की नजरेसमोर त्यांचे सात्विक रूप तरळून जाते. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, पडला पदर खांदा तुझा दिसतो, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, रे उठ रानराजा झाली भली पहाट ही गाणी त्यांच्या अभिनयाने मनात ठसली आहेत.
प्रत्यक्ष जीवनातही त्यांच्या मायाळू, सात्विक, सौहार्दपूर्ण वागणुकीने सर्वांशी त्यांचे जवळचे नाते जुळले होते. त्यांचे जाणे आज प्रत्येकाला हेलावून गेले. आपल्याच घरातली कुणी जिव्हाळ्याची व्यक्ती गेली अशीच प्रत्येकाची भावना आहे. ज्यांच्या जाण्याने चटका लागतो, एक पोकळी निर्माण होते अशांपैकीच त्या एक होत्या. त्यांच्या जाण्याने एक सात्विक पर्व संपले आहे.
🙏 त्यांना अतिशय विनम्र आदरांजली 🙏
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈