श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “दोन हजारांची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
आज रविवार…… रोज घडाळ्याच्या काट्यानुसार होणारी कामे दर रविवारी जरा हळू हळू होतात. पण आजचा रविवार वेगळाच होता.
खूप घाईने नसली तरी सकाळपासूनच घरात आवराआवर सुरू झाल्याचे लक्षात आले. प्लास्टिक बरण्यांमध्ये भरलेले कडधान्य, दाणे, तिखट, मीठ हे बरणी उलट सुलट करून बारकाईने बघितले जात होते. डाळ, तांदूळ, रवा इत्यादी वस्तुंच्या डब्यात हात खोलवर घालून हात व्यवस्थित फिरवून पाहिले जात होते. गव्हाच्या छोट्या कोठीत कापडात गुंडाळून टाकलेल्या पाऱ्याच्या गोळ्या चाचपून बघितल्या जात होत्या. शंका आल्यास ती कापडी पुरचुंडी उघडून बघितली जात होती.
कशातही आपल्याला हवे ते सापडते का? यांची चेहऱ्यावर असणारी उत्सुकता, काहीच मिळाले नाही तर नाराजीचा सूर निघत बदलत होती. रॅक मध्ये डब्यांच्या खाली घातलेले पेपर देखील काढून पाहिले जात होते. त्या पेपरच्या घडीत चुकून नाही ना याची खात्री केली जात होती.
कशाला हवी दर रविवारी अशी आवराआवर…….. असा कधी कधी निघणारा नाराजीचा सूर अजिबात निघाला नाही. दोघींचे सुर आज चांगलेच जमले होते. तसे जमतेच. पण आज एकदमच छान जमले होते. सुरसंगम…….
पुर्वी घरात पोत्यांमध्ये धान्य असायचे. आता धान्य पाच सात किलोच्या डब्यात आणि पोत्यांमध्ये जास्तीची (केव्हातरी लागतील म्हणून घेतलेली) भांडी आढळतात. स्वयंपाक घरात अपेक्षित असे हाताला फारसे काही लागले नाही. फक्त डब्यात हात घालतांना जरा घाई झाल्यामुळे हाताला थोडेसे लागले इतकेच. हाताला लागणे याचे दोन्ही अर्थ मला चांगले समजले. पण ज्या अर्थासाठी (पैशांसाठी) ही आवराआवर सुरू होती ते व्यर्थ ठरले होते.
आता मोर्चा कपड्यांच्या कपाटाकडे वळणार होता. त्यांच्या मोर्चात मला सामील करून घेतले. (मोर्चा असल्याने तुम आगे बढ़ो…. हम तुम्हारे साथ है| अशा घोषणा मी दबक्या आवाजात दिल्या.) कपाटातील खालचे कपडे वर, वरचे खाली. मागचे पुढे, पुढचे मागे. असे सगळे करुन झाले.
काही साड्यांच्या घड्या त्या साड्या घेतल्यापासून मोडल्या नव्हत्या. (हे त्यांच्या बोलण्यावरुनच समजलं) या निमित्ताने त्या साड्यांच्या घड्या (जागेवरच बसल्या बसल्या) मोडून तर झाल्याच. पण साड्या झटकून देखील झाल्या. त्यातही अपेक्षित असे काही मिळाले नाही. फक्त चार पाच डांबरच्या गोळ्या तेवढ्या घरंगळत बाहेर पडल्या…. माझे सगळे शर्ट, पॅन्ट झटकून तर झालेच. पण त्यांचे खिसे देखील तपासून झाले. (नोटा मिळाल्या नाहीत, पण दुसरेही आक्षेपार्ह असे काही मिळाले नाही. यावर दोघांचा समाधानाचा सुस्कारा तेवढा एकाचवेळी बाहेर पडला.) घेतलेले, मिळालेले शर्टपीस, पॅंटपीस, जास्तीचे टाॅवेल हे देखील मोकळे करून झाले.
घरात असणाऱ्या सात आठ प्रकारच्या वेगवेगळ्या पर्स, पर्स मध्ये ठेवलेल्या पर्स यांच्या प्रत्येक कप्यांची कसून तपासणी झाली. त्यात एक दोन टाकल्याची पाकिटे, दोन चार चॉकलेट, सोन्याचे दागिने घेतांना त्या माणसाने केलेले आकडेमोडीचे चार पाच छोटे कागद, काही चिल्लर, पाच सहा औषधांच्या गोळ्या सोडल्या, तर हव्या त्या नोटा औषधालाही सापडल्या नाहीत.
दिवाणावरील गाद्यांची उलथापालथ झाली. येवढीच उलथापालथ पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर देखील झाली होती. चादरी सरळ होत्या त्या विस्कटून झाल्या. दोन चार किरकोळ बिलं, लाईट बिल, कधीतरी काढलेल्या (जास्तीच्या) आधार कार्डच्या झेराॅक्स काॅपीज, एक दोन पुस्तके, बॅंकेचे चेकबुक, पासबुक या शिवाय गादीखाली काहीच पसारा नव्हता. घर आवरण्याऐवजी पसाराच जास्त झाल्याचे लक्षात आले.
शेवटी आपल्याकडे दोन हजारांची नोट नाही आणि त्यामुळे ती बदलण्याची गरज नाही यावर शिक्कामोर्तब झाले. आणि आता थोडी विश्रांती घ्यावी म्हणून गादीवर पडणार तोच…
अय्या… खरंच… अहो ते देवघरातील पोथ्यांमध्ये तीन चार नोटा ठेवल्याचे मला चांगले आठवतेय…… असे म्हणत दोघींचा (गृहमंत्री आणि राष्ट्रपती, बायको आणि आई) मोर्चा पोथी ठेवलेल्या जागेवर गेला…….
दोघापैकी पैकी एकीचा आवाज… ‘ कुठेतरी ठेवल्यासारखे मला सारखे आठवत होते…’ दुसरा आवाज .. ‘ कुठेतरी नाही…… कुठेतरीच ठेवल्या होत्या. ही काही जागा आहे का ठेवायची…’. (घरापरत्वे हे आवाज आपसात बदलू शकतात.) हाताला लागणे याचे वेगळे अर्थ मला समजले, तसे कुठेतरी याचेही वेगळे अर्थ समजले.
अशा रीतीने आवराआवर झाल्यावर दोन चार दोन हजारांच्या नोटा मिळाल्या. सुवर्ण पदक मिळाल्यावर विजेता जसे त्या पदकाला निरखून पाहतो आणि कपाळाला लावतो तसेच या नोटांच्या बाबतीत देखील झाले.
आता उद्या बॅंकेत जाणे आलेच…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈