कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 178 – विजय साहित्य
☆ वटपौर्णिमेचा सण… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
वटपौर्णिमेचा सण
दृढ करतो विश्वास
सहजीवनात दोघे
एक सूत्र ,एक ध्यास. . . . . ! १
वटवृक्षाच्या पारंब्या
संसाराची वंशवेल.
वटपौर्णिमेचा सण
सुखी संसाराचा मेळ.. . . . ! २
पौर्णिमेला चंद्रकांती
पूर्ण होई विकसित
वटपौर्णिमेचा सण
होई कांता प्रफुल्लित. . . . ! ३
कांत आणि कांता यांचे
नाते नाही लवचिक
वटपौर्णिमेचा सण
एक धागा प्रासंगिक. . . . ! ४
भावजीवनाचे नाते
वटवृक्षाचा रे घेर
वटपौर्णिमेचा सण
घाली अंतराला फेर. . . . . ! ५
सालंकृत होऊनीया
वटवृक्ष पूजा करू
सणवार परंपरा
मतीतार्थ ध्यानी धरू…..! ६
पती आहे प्राणनाथ
यम आहे प्राणहारी
वटपौर्णिमेचा सण
सौभाग्याची आहे वारी. . . . ! ७
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈