सुश्री संगीता कुलकर्णी
विविधा
☆ प्रेम… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे — खरंच किती भावार्थ लपला आहे नाही या गाण्यात…प्रेम ही ईश्वरी देणगी आहे.. प्रेम हे ठरवून कधीच होत नाही.. प्रत्येक व्यक्ती कधीना कधी कोणावर ना कोणावर प्रेम करतेच नाही का..
कुणीतरी आपल्यासाठी आपल्याला आवडतं म्हणून काही करणं म्हणजे प्रेम असतं. प्रेम हे केवळ व्यक्तीवर असतं ? तर नाही.. ते भावनेवर असतं त्याच्या/ तिच्या अस्तित्वावर असतं.. त्याच्या / तिच्या सहवासात असतं… प्रेम हे दिसण्यात असतं ? तर ते नजरेत असतं. जगायला लावणाऱ्या उमेदीत असतं. प्रेम निर्बंध असतं..त्याला वय , विचारांचं बंधन कधीच नसतं. जेंव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा अख्खं जग सुंदर दिसू लागतं…त्याचे संदर्भ मनातल्या मंजुषेशी जुळलेले असतात…ते एक अनामिक नातं भावनांच्या मनस्वी लाटा वाहवणार असतं…एक हुरहूर,ओढ आणि तेवढीच धडधड वाढविणारही असतं. कांहीही नसताना खूप कांही जपणार आणि जोपासणार असतं. अश्या अनामिक नात्याची उत्कटता शब्दांत व्यक्त करताचं येत नाही…
प्रेम सहवासाने वाढते.. ते कृतीतून स्पर्शातून व्यक्त होते.. प्रेमामुळे तर आपुलकी स्नेह निर्माण होतो.
सर्वोच्च प्रेमाची परिणीती म्हणजे त्याग…
आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करणे हे ही एक प्रकारचे प्रेमच असते. नाही का..! शेकडो मैल केलेला प्रवास म्हणजे प्रेमाची परिसीमाच नाही काय?.. प्रेम ही एक सर्वोच्च शक्ती आहे. प्रेमामुळेच विविध महाकाव्यांची निर्मित झाली..
प्रेम हे पहाटेच्या धुक्यात असते… रातराणीच्या सुगंधात असते..खळखळ वाहणाऱ्या निर्झरात असते.. तर प्रेम पहाटेच्या मंद झुळकीत ही असते बरे.. इतकं नाही तर दूरदूर जाणाऱ्या रस्त्यात सुद्धा प्रेम असते… प्रेम गालावरच्या खळीत असते…झुकलेल्या नजरेत असते…ओथंबलेल्या अश्रूत ही असते.. शीतल चांदण्यात, आठवणींच्या गाण्यात, चिंचेच्या बनात, निळ्याशार तळ्यात..दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं..घट्ट घट्ट मिठीत सुद्धा असते.
गुणगुणाऱ्या भुंग्याला पाहून लाजणाऱ्या फुलात ही प्रेम असते.
सृष्टीच्या प्रत्येक रचनेत चराचरात … निसर्गात प्रेम असते आणि आहे…
विरह हा प्रेमाचा खरा साक्षीदार …वाट पाहण्यातील आतुरता, हुरहुर, ती ओढ, ती न संपणारी प्रतीक्षा.. वेळ किती हळूहळू जातोय असं वाटणारी ती जीवघेणी अवस्था. …तो किंवा ती कधी येईल ? ही वाटण्यातील अधीरता, तो किंवा ती आपल्याला फसवणार तर नाही ना ? अशी मनात येणारी दृष्ट शंका. ..किती किती भावना नाही का?
मी तिच्यावर /त्याच्यावर प्रेम करावे. त्याला /तिला अजिबात जाणीव नसू नये. .मी निष्ठापूर्वक प्रेम करावे त्याची उपेक्षा व्हावी. ..त्यामुळे झालेले दुःख मला प्राणापेक्षा प्रिय आहे. ही कधी संपत नाही अशी गोष्ट आहे नि न संपणारी रात्र आहे. .फक्त आणि फक्तच ज्योत बनून तेवत रहाणे हेच तर खऱ्या प्रेमाचे भाग्यदेय आहे नाही का? ….
पण खेदाची बाब ही आहे की प्रेम या सर्वोच्च भावनेचा, त्याच्या पवित्रतेचा अर्थच लोकांना अद्याप समजलेला नाही.. नसावा त्यामुळे तर विकृती कडे पाऊले उचलली जात आहेत प्रेमात वासनेला मुळीच स्थान नसते तर तिथे हळूवार नाजूक स्पर्श हवा असतो. दोन जीवांच्या अत्युच्च प्रेमामुळेच तर सृष्टीची निर्मिती झाली आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रेमात असते नुसते मनच नाही तर जगही प्रेमामुळे जिंकता येते.
प्रेम म्हणजे स्वतः जगणं आणि दुसऱ्याला जगवण आहे… प्रेमाचा परिसस्पर्श ज्याला होतो त्याचे सारे आयुष्य उजळून निघते..म्हणूनच याला देवाघरचे लेणे असे संबोधले आहे…
प्रेम हृदयातील एक भावना.. कुणाला कळलेली.. कुणाला कळून न कळलेली.. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली.. तर कुणी आयुष्यभर लपवलेली… कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. तर कुणाची गंमत झालेली.. कुणाचे आयुष्य उभारणारी.. तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी….. . फक्त एक भावना…!!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈