सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

कविश्रेष्ठ इंदिरा संत

विदुषी दुर्गाबाई भागवत

अभिजात संगीत आणि काव्याच्या अभ्यासात मला नेहमीच प्रोत्साहन देणार्‍या पितृतुल्य, गुरूतुल्य अशा नाशिकच्या बाबा दातार आणि परिवाराने माझ्या पहिल्यावहिल्या स्वतंत्र ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटची आणि नंतर ‘रंग बावरा श्रावण’ अशा अनेक कॅसेट्सची निर्मिती केली. स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ असलेल्या दुर्गाबाईंच्या पवित्र हस्ते या कॅसेटचं उद्घाटन झालं. योगायोग म्हणजे आणीबाणीच्या काळी, नाशिकमधले माझे ‘निमंत्रक’ म्हणून बाईंनी, दातार परिवाराचा उल्लेख केला. गंमत म्हणजे दिलखुलासपणे बोलताना त्या एवढ्या रंगून गेल्या की, त्यांनी दीक्षित मास्तरांनी शिकवलेल्या ‘ सुखवी बहु केदार जनमन…’ या केदार रागातल्या बंदिशीत, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद एकमेकांवर रेललेले असताना किती सुंदर सुरावट होते, ती गाऊनही दाखवली. 

आदरणीय कुसुमाग्रजांच्या सांगण्यावरून, दातार कुटुंबियांनी, इंदिराबाईंच्या बेळगांवी, ‘रंग बावरा श्रावण’ – निवड कुसुमाग्रजांची– भाग १ या कॅसेट – सीडीचा सोहळा प्रचंड उत्साहाने, इंदिराबाईंच्याच शब्दांत ‘कुबेरालाही लाजवेल’ अशा थाटात संपन्न केला. त्यादिवशी अक्कांच्या वक्तव्याची सुरुवात ‘आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस…’ अशी अत्यानंदाने झाली. या कार्यक्रमासाठी मुंबईहून बेळगांवला निघताना, अक्कांच्या सख्ख्या मैत्रिणीने, दुर्गाबाईंनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या… 

… “ लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आहे आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा, कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले तरी मनाने त्यात आहे बरं का !” अक्कांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाच्या तरी करंटेपणाने हुकले असले तरी, धीर देताना दुर्गाबाईंचे हे शब्द, थोरल्या बहिणीने पाठीवरून मायेचा हात फिरवल्यासारखे वाटतात आणि डोळ्यांत पाणी तरळते. मी बेळगांवहून परतताना माझ्या हाती दुर्गाबाईंसाठी पत्रोत्तर पाठवताना अक्का म्हणतात, “ मी पद्मजाला म्हटले, खरे म्हणजे साहित्यसृष्टीत दुर्गाबाईच माझा आधार आहेत. तो आधार त्यांच्या साहित्यावर आहे. तो नकळत मला कित्येक गोष्टी देतो. सूर्याचा प्रकाश किरणांतून आला तरी, तो जसा सर्व बाजूला एकदम फाकतो – तेजाळतो तसे तुमच्या बुद्धीचे आहे. तुमच्या प्रत्येक लेखनात हे दिसून येते.”

— अशाप्रकारे या ‘गार्गी – मैत्रेयी’च्या पत्रांचे पोस्टमन होण्याचे भाग्य मला लाभले !  

दुर्गा आणि इंदिरा ही देवीची दोन रूपंच ! एका दुर्गेने आणीबाणीच्या वेळी जो प्रखर दुर्गावतार धारण केला, त्याला तोड नाही. एकटं असूनही तिला कुणाचंही भय वाटत नसे. कुणालाही हार जाणे, शरण जाणे हे तिच्या स्वभावात नव्हतेच. शरीर जर्जर झाले, तरी अगदी मृत्यूलाही  त्यांच्या  ‘देहोपनिषदात’ त्या  ठणकावून सांगतात… 

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे..।।

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे… ।।

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज

पायघडी देहाची ही घालूनी मी पाही वाट…

सुखवेडी  मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले…।।’

…. बाई गेल्यानंतरही त्यांच्या शांत, तेजस्वी चेहर्‍यावर ‘ देहोपनिषद सिद्ध झाले ’ हाच भाव होता.

इंदिराबाईंनी पती निधनानंतर अपार हाल सोसले, दुःख भोगलं. एकटेपणा जगतानाही, दैवाला दोष न देता, रडत न बसता, त्या ‘प्रारब्धाला’ही ठणकावून सांगतात….  

‘प्रारब्धा रे तुझे माझे, नाते अटीचे तटीचे,

हार जीत तोलण्याचे, पारध्याचे – सावजाचे.

जिद्द माझीही अशीच, नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, तुझे झेलते मी दान,

काळोखते भोवताली, जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही तुला शरण शरण….’

मला तर वाटतं, इंदिरा अक्कांची सात्त्विक, सोज्वळ कविता हा माझा ‘प्राण’ आहे, तर मला वेळोवेळी साहित्यतुषारात चिंब भिजवणाऱ्या आणि ‘देहोपनिषद’सारखा अपूर्व अभंग देऊन प्रथमच मला ‘संगीतकार’ म्हणून घडवणार्‍या दुर्गाबाईंचे दृढनिश्चयी, ओजस्वी विचार हा माझा ‘कणा’! दोघीही माझ्या जीवनातील  मोठे आधारस्तंभ ! त्यांची आठवण जरी झाली तरी त्याचा सुगंध, चंदनी अगरबत्तीसारखा कितीतरी वेळ माझ्या मनात दरवळत राहतो. दोघींच्या नितांत सुंदर लेखनाने, माझ्या आयुष्याला सुंदर वळण दिलं. गर्भरेशमी कवितेचा ‘ध्यास’ आणि ‘नाद’ दिला. सृजनाचा उत्कट आनंद घ्यायला आणि आयुष्य कसं जगावं, यातलं ‘अध्यात्म’ अनुभवायला शिकवलं… 

‘आत आपुल्या झरा झुळझुळे

निळा निळा स्वच्छंद,

जगणे म्हणजे उधळीत जाणे

हृदयातील आनंद !…’

— समाप्त —

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments