सुश्री दीप्ती कुलकर्णी
विविधा
☆ मन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
… दोनच अक्षरी साधा शब्द ‘ मन ‘ ! पण या शब्दाची व्याप्ती मात्र अमर्याद. त्याचा आकार तरी कसा वर्णावा बरे? तेही अवघड काम —- कधी मन खसखशीएवढंं, तर कधी त्याहून सूक्ष्म अणुरेणूएवढं सुद्धा बनतं. तर कधी अगदी त्या विशालकाय आकाशातही मावणार नाही इतकं प्रचंड रुप धारण करु शकतं.
मन इतकं लहरी असतं की कोणी त्याचा हातच धरु शकणार नाही. कधी मन स्वच्छंदीपणे विहरतं, तर कधी हळवं होतं, कधी विचारी बनतं. कधी हेच मन घमेंडखोर बनतं नि बढायांना गोंजारु लागतं. कधी-कधी हेच मन उत्साही बनतं नि नवनिर्मिती करु पाहतं. कधी ते लाडीक बनतं, प्रेयसीला, सवंगड्यांना हाकारु पाहतं, तर काही वेळा तुसडं बनून सर्वांनाच दूर-दूर लोटू पाहतं. मन स्वप्नाळु बनतं नि दिवास्वप्न रेखाटू पाहतं. तर कधी दु:खी बनून अश्रू साठवीत राहतं.—- .असं हे बहुरंगी भावार्थ साठविणारं मन त्याविषयी बोलावं तेवढं थोडंच. .म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामीसुद्धा करुणाष्टकात म्हणतात _
अचपळ मन माझे नावरे आवरिता
तुजविण शीण होतो,धाव रे धाव आता ||
खरच हे अचपळ मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत, कारण असं म्हणतात की ” मन जिंकी तो जग जिंकी |”
मनावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण लहानपणापासून घरात शुभंकरोती, देवाची स्तोत्रे,परवचा म्हणत असतो. कुठलीही गोष्ट प्रथम मनात आली तरच तिचा विचार होऊन कृती घडते. म्हणूनच आपण जर मनावर सुसंस्कारांचे धडे बिंबवले तरच या समाजात सहृदय, संवेदनशील व्यक्ती निर्माण होतील.
एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगितली जाते—गंगेच्या पाण्याने भरुन आणलेली कावड त्यांनी तहानलेल्या गाढवाच्या मुखी सोडली नि त्याला तृप्त केले. अशा गोष्टी जर बालपणी मुलांना सांगितल्या तर भूतदया कशी दाखवावी हे या उदाहरणावरून चांगल्या प्रकारे लक्षात येतं. त्यामुळे मन चांगल्या संस्कारानी लहानपणीच समृद्ध केलं तर भावी पिढी सुशील,सदवर्तनी नि सेवाभावी बनेल. श्री समर्थ रामदास स्वामींनी
‘मनाचे श्लोक‘ रचले आहेत, त्यामागे मन भक्कम बनविणे हाच मुख्य हेतू आहे. म्हणूनच आपलं मन स्वच्छ,शुद्ध, पारदर्शक ठेवून योग्य विचार मनात आणले तर आपली प्रगती योग्य दिशेने, योग्य प्रकारे होईल यात शंकाच नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही वयात मनावर योग्य नियंत्रण ठेवलं पाहिजे. सकारात्मक विचारातूनच मनाची उत्तम मशागत होते नि योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो.
चला तर, प्रत्येक गोष्ट मनापासून करु या. मग ते चित्र रेखाटन असो, रांगोळी असो की परीक्षेसाठी उत्तम तयारी करणे असो. कोणतही मोठ्ठं अवघड काम सुद्धा आपण मनावर घेतलं तर आपण निश्चितच पुरं करु शकतो.
मनमें है विश्वास, पूरा है विश्वास |
हम होंगे कामयाब एक दिन —
मनात आहे विश्वास … पूर्ण आहे विश्वास
एक दिवस होऊ यशस्वी … आहे पूर्ण विश्वास ||
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
हैदराबाद
मो.नं. ९५५२४४८४६१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈