? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणाचे नियम…” – लेखिका :सौ. मुक्ता पुणतांबेकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

‘घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच,’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो.

आमच्याकडे व्यसनाधीनतेच्या काउंसेलिंगसाठी मुख्यतः फोन येतात. पण काही वेगळ्या कारणांसाठीही येत आहेत. ‘घरातली भांडणं’ हा देखील महत्वाचा विषय झाला आहे.

परवाच पत्नीबरोबरच्या सततच्या  भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले “तुम्ही काउंसेलर आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा”.

मी त्यांना म्हटलं, “भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले, तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल”.

‘भांडणाचे नियम’ हे माझे शब्द ऐकताच त्यांना आश्चर्य वाटलं. पण हे नियम समजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.

म्हणून मी त्यांना विचारलं, “नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा”.

ते म्हणाले, “कालच हिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी चिडचिड झाली. मी तिला बोललो. ती ही बोलली आणि आमचं मोठं भांडण झालं.”

हे ऐकताच मी त्यांना म्हटलं, “भांडणाचा पहिला नियम आहे भांडणाचा विषय बदलायचा नाही. ज्या विषयावर भांडण सुरू होतं, त्याच विषयावर भांडायचं. म्हणजे भांडण पराकोटीला जात नाही.”

त्यांना हे फारच पटलं. ते म्हणाले, ” भाजी वरून भांडण सुरू झालं. मग ती चिडली. माझ्या घरचे लोक, आईने मला कसं लाडावून ठेवलं वगैरे बोलायला लागली. मग मीही तिच्या घरच्या पद्धतींवर बोलायला लागलो. लग्नात जेवायचा मेनू त्यांनी चांगला ठरवला नव्हता. ती आठवण करून दिली. मूळ विषयापासून आम्ही फारच भरकटलो. पण आता मात्र आम्ही तुमचा हा भांडणाचा नियम पाळणार”.

त्या गृहस्थांची बोलल्यावर मला हे नियम सगळ्यांनाच सांगावेसे वाटायला लागले. आपण सगळ्यांनी हे नियम पाळले तर भांडणं झाली तरी नातेसंबंध बिघडणार नाहीत.

१) भांडणाचा विषय बदलू नका. ज्या विषयावर भांडण सुरू झाले, त्याच विषयावर भांडा. विशेषतः पती-पत्नींनी भांडतांना ‘सासर- माहेर’ मुळीच मध्ये आणू नका.

२) भांडणाला टाईम लिमिट ठेवा. काही घरांमध्ये भांडण झालं की  २-३ दिवस ते सुरू रहातं. नंतर अबोला असतोच. सर्वांनी मिळून एक वेळेची मर्यादा ठरवता येईल. अर्धा तासाची ठरवली तर अर्धा तास झाल्यावर स्टॉप म्हणून लगेच सर्वांनी गप्प बसायचं. (खरंतर पहिला नियम पाळून विषय बदलला नाही. तर जास्त वेळ भांडता येतच नाही. एकाच विषयावर काय काय बोलणार !)

३) तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडू नका. दोघंच असताना भांडा. तिसरी व्यक्ती समोर असेल तर अपमान वाटतो. मनं दुखावतात. मुलांसमोर तर भांडण अजिबात नको. त्यांना असुरक्षित वाटतं.

४) एक व्यक्ती चिडली असेल तर दुसऱ्याने गप्प बसा. दोघंही एकदम चिडले तर भांडण विकोपाला जाऊ शकतं. त्यामुळे आपली जवळची व्यक्ती चिडली असेल तर तिला समजून घ्यायला हरकत नाही.

५) स्वतःच्या भावना ओळखा. शांतपणे व्यक्त करा. थकवा, भूक, टेन्शन अशी रागाची वेगवेगळी कारणं असतात. चिडचिड होत असेल तर ती कशामुळे हे शोधून काढून, लोकांवर चिडण्यापेक्षा त्यांना आपण कारण सांगू शकतो. आमच्या घरात ज्याची चिडचिड होत असेल,तो सांगतो की मला थोडा वेळ माझी स्पेस हवी आहे आणि आतल्या खोलीत जाऊन बसतो. अशावेळी त्याच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही त्याच्या स्पेसचा आदर राखतो.

६) टोमणे मारु नका. टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे हे नातेसंबंधावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्याच बर्‍या.

७) भडकू नका. काही वेळा मुद्दाम आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चिडावं, असा त्या व्यक्तीचा उद्देश असतो. तो सफल होऊ देऊ नका. शांत रहा. आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला भडकवू शकत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असेल तर हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. आपण बिचारे म्हणून गप्प बसणार नाही. तर आपण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत म्हणून गप्प बसणार आहोत. कारण बोलण्यापेक्षा गप्प बसायला जास्त शक्ती लागते.

८) मध्यस्थाची मदत घ्या. भांडणं कमी होतच नसतील तर जवळच्या मित्र-मैत्रिणी किंवा काउंसेलरची मदत घेता येईल.

मला आठवतील तेवढे नियम मी लिहिले. तुम्ही यात भर घालू शकता.

चला तर मग…

भांडा सौख्यभरे!

लेखिका :सौ.मुक्ता पुणतांबेकर

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments