🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-1 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…) 

माणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती झाली. पुढे माणूस स्थिर स्थावर झाल्यावर नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अशा रीतीने गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा झाली. त्याला वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार या संज्ञा प्राप्त झाल्या.

प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकारते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.

वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात. महाराष्ट्रातील वतनदारांचा दर्जा आणि त्यांना करावी लागणारी कर्तव्ये पुढीलप्रमाणे-

पाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. 

१) पोलिस पाटील 

२) मुलकी पाटील. 

गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले… उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा. 

चौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत (गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा.

गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती – त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे याला पण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकर्ण्यांच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले.

–क्रमशः भाग पहिला. 

© प्रा. डॉ. सतीश कदम

इतिहास संशोधक,व्याख्याते

मो.क्र.9422650044 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments