श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “तीन हजार शेवटचे निरोप !” — ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(The Last Post story ! – यावर आधारित )
मी ऑर्थर लेन…वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ब्रिटीश सैन्यात मॅंचेस्टर रेजिमेंटमध्ये ड्रम-वादक म्हणून भरती झालो होतो…विविध वाद्ये खुबीने वाजवायचो..त्यात बिगुल वाजवायला मला खूप आवडायचं…! पण आवडीनं पत्करलेलं हे काम मला मनाविरुद्ध करावं लागेल कधीकाळी याची मला पुसटशी शंकाही आली नाही कधी…पण नियतीच्या मनातलं कोणी ओळखू शकलंय का आजवर?
दुस-या जागतिक महायुद्धाचा काळ. आम्हा ब्रिटीश दोस्तसैनिकांचा सामना जपान्यांशी सुरू होता….आणि युद्धभूमी होती सिंगापूर. जपानी अधिक आक्रमक आणि तितकेच क्रूर…त्यात आमच्या वरीष्ठांच्या काही निर्णयांमुळे आमची बाजू पडती होती….अगदीच नाईलाज झाला म्हणून आमच्या सेनापतींनी सपशेल शरणागती पत्करली ! आम्ही आमच्या रायफल्स जमिनीवर ठेवल्या आणि दोन्ही हात उंचावून आमच्या खंदकांतून बाहेर आलो. समोर शत्रूने आमच्यावर त्यांच्या रायफल्स ताणलेल्या. थोडीशी जरी वेडावाकडी हालचाल केली तर एकाच वेळी अनेक रायफल्स धडधडतील हे निश्चित. माझ्या शेकडो साथीदारांसोबत मी ही रांगेत उभा होतो…खाली मान घालून. सैनिकाला खरं तर मृत्यूपेक्षा पराभव जास्त झोंबतो. पण कमांडर साहेबांची आज्ञाच झाली शरणागती पत्करण्याची. कदाचित ‘ बचेंगे तो और लढेंगे ‘ असा विचार असावा त्यांचा.
लालबुंद झालेले डोळे गरागरा फिरवीत शत्रूसैन्याचा एक अधिकारी प्रत्येक रांगेतून फिरत होता. तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कमरेकडे निरखून पाहू लागला तेव्हा कुठे माझ्या ध्यानात आलं की रायफल तर मी टाकून दिली आहे, पण कमरेचा बिगुल तसाच राहिलाय ! आता माझी शंभरी भरली अशी माझी खात्री झाली. खरं तर एक निरूपद्रवी संगीत वाद्य ते. त्यापासून कुणाला मिळाला तर आनंदच मिळणार ! पण शत्रूच्या ते लक्षात तर आले पाहिजे ना? तो अधिकारी जवळ आला…त्याच्यासोबतच्या एकाने माझ्या डोक्याच्या दिशेने आपल्या रायफलची नळी केलेली होतीच. अधिका-याने विचारले,” बिगुल वाजवतोस?” ‘ हो ‘ म्हणण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. रायफल हाती घेण्याआधी मी तारूण्याच्या अगदी उंबरठ्यावर असताना हे बराच दमसास लागणारं वाद्य शिकलो होतो. काय असेल ते असो…मला ही धून वाजवताना एक वेगळीच अनुभूती यायची. पराक्रम गाजवून हे जग सोडून जाणा-या मृत सैनिकाच्या अंतिम प्रवासाची सुरूवात आपल्या सुरांनी होते….हे अंगावर शहारे आणणारे असायचे. खरं तर लास्ट पोस्टची फक्त धून मी वाजवायचो, शब्द मला सुद्धा निश्चित ठाऊक नव्हते. हात अगदी काटकोनात आडवा ठेवून, सावधान स्थितीत उभे राहून, बिगुलच्या माऊथ पीसला ओठ चिकटवून त्यात हवा फुंकून सुरूवात करताना मनावर नेहमीच एक अनामिक तणाव असायचा….सूर नीट लागला पाहिजे. ती दहा वीस सेकंद कधी एकदा संपून जातील असं व्हायचं… आणि कधी एकदा ‘ रिवाली ‘ धून वाजवतोय असं व्हायचं. ‘ रिवाली धून ‘ म्हणजे मृत सैनिकाचा दुस-या दुनियेतील पुनर्जन्म……उठ सैनिका, तुला आता नव्या आयुष्यातल्या नव्या कर्तव्यावर रुजू व्हायचंय..तुझा पुनर्जन्म झालाय मर्दा !
मी सैन्यात रायफल चालवायलाही शिकलो…आणि लढाईत ती वापरायचोही. पण रायफलसोबत मी बिगुलही जवळ बाळगायचो. पण युद्धात कामी आलेल्या सैनिक मित्रांच्या दफन प्रसंगी लास्ट पोस्ट वाजवताना जीव कासावीस व्हायचा…वाटायचं एखादे दिवशी आपल्यासाठीही असंच कुणी बिगुल फुंकेल…दी लास्ट पोस्ट चा !
शरणागतीनंतर शत्रूने आम्हा सर्वांची रवानगी श्रम-शिबिरांमध्ये केली. त्यांना त्यांच्या सोईसाठी रेल्वे लाईन टाकायची होती. कामास नकार म्हणजे मृत्यू. आणि अपुरे अन्न शरीर खंगवत चाललेले होते. डोंगर फोडून जीव मेटाकुटीला यायचा. काम सुरू असताना झालेले अपघात, रोगराई, दगाफटका होईल या संशयातून केलेल्या हत्या, कुपोषण, यामुळे थोडे-थोडके नव्हे ….सुमारे बारा-तेरा हजार युद्धकैदी प्राणांस मुकले या रेल्वेच्या कामादरम्यान. तोडकामाची जुनी हत्यारं, जुनाट यंत्रं वापरावी लागल्याने मजुरांचे मरणहाल झाले ते मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. युद्धकैद्यांचे मृत्यू तर झालेच झाले…आणि सर्वसामान्य मजूर किती मेले म्हणता…..नव्वद हजारांपेक्षा अधिक. असं म्हणतात की जपान्यांनी बर्मा ते थायलंड पर्यंत रेल्वेचे जितके लाकडी स्लीपर्स युद्धकैद्यांकडून आणि मजूरांकडून जबरदस्तीने टाकून घेतले त्या स्लीपर्सच्या संख्येएवढी माणसं मारली गेली या कामात….म्हणूनच हिला ‘ डेथ रेल्वे ‘ म्हणतात ! आणि ह्या स्लीपर्सची संख्या लाखापेक्षा अधिक भरते !
एकाच दिवशी शेकडो अंत्यसंस्कार व्हायचे. मृतदेह जाळण्यासाठीची सर्व तयारी करण्याची जबाबदारी जपान्यांनी युद्धकैद्यांवरच टाकलेली होती. चिता रचण्याचं काम दिवसभर चालायचं…त्यावर कित्येक मृतदेह रचून ती चिता व्यवस्थित पेटेल आणि ते दुर्दैवी देह या जगातून कायमचे नष्ट होतील अशी तजवीज करावीच लागायची. काळ्या धुराने आकाश सतत काळवंडलेले असायचे…युद्ध असेच असते…जीवघेणे ! देश लढतात…सैनिक जळत राहतात !
या अंत्यसंस्कारांच्या वेळी कशी कुणास ठाऊक, जपान्यांनी मृत सैनिकांच्या सन्मानार्थ ‘ दी लास्ट पोस्ट ‘ धून बिगुलवर वाजवण्यास अनुमती प्रदान केली होती. आणि मला बिगुल वाजवता यायचा…..माझी कामं करून हे जादाचं काम करण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता ! पण माझ्या देशवासियांसाठी, माझ्या प्राणप्रिय सैनिक-मित्रांसाठी मला निदान एवढं तरी करायला मिळतं याचं समाधान होतं मला. मी कधीही कंटाळा केला नाही. डोळ्यांत आसवे आणि ओठांत प्राण गोळा करून मी बिगुल फुंकायचो….जा मित्रांनो….जा तुमच्या अंतिम प्रवासाला…तुम्ही तुमच्या मातृभूमीप्रति असलेलं कर्तव्य जिद्दीने पूर्ण केले आहे….जा … स्वर्ग तुमची प्रतिक्षा करतोय…सायंकाळचा सूर्य अस्तास जात असताना शेकडो देह अग्निच्या स्वाधीन होत राहायचे….ज्वाळा आणि धूर….आणि मानवी देहांचा उग्र दर्प आसमंतात भरून रहायचा ! तीन वर्षांत मी दोनशे वेळा दी लास्ट पोस्ट वाजवली ! सैनिकांना दिल्या जाणाऱ्या टॉयलेट पेपरमधील काही तुकडे मी चोरून लपवून ठेवायचो..आणि त्या तुकड्यांवर कोळशानं मी निरोप दिलेल्या सैनिकांची नावे लिहून ठेवायचो…….असे तीन हजार निरोप झाले होते माझे देऊन…शेवटचे निरोप ! आपल्या माणसांपासून दूर, यमयातना सोसत मृत्यूच्या दाढेत गेलेले ते हजारो तरूण देह माझ्या स्वप्नात यायचे पुढे कित्येक वर्षे….माझी सुटका झाल्यानंतरही !
(ऑर्थर लेन तब्बल ९४ वर्षे जगले. कित्येक रात्री त्यांनी दी लास्ट पोस्टच्या आठवणींच्या दु:स्वप्नांच्या भीतीने जागून काढल्या असतील. जपान्यांच्या छळाला बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतींना योग्य तो मानसन्मान मिळावा, यासाठी लेन आग्रही राहिले. ब्रिटीश सैन्याने ह्या ‘मृत्यूच्या संगीतकारा’च्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ खास ‘दी लास्ट पोस्ट ‘ बिगुल धून वाजवली…!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
(इंटरनेटवर विविध लेख, बातम्या, विडीओ पाहून मी हे लिहितो. इंग्रजीत असलेलं हे साहित्य मराठी वाचकांना वाचायला लाभावं अशी साधी सरळ भावना आहे. तपशील, संदर्भ अचूक असतीलच असे नाही…मात्र खरे असण्याची दाट शक्यता असल्याशिवाय मी लिहीत नाही हे मात्र नक्की. )
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈