सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 187
☆ जन्म मृत्यू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
झाले असेल स्वागत
जन्मा आले तेव्हा खास
मोठ्या मुला नंतरची
लेक आनंदाची रास
जन्मगाव आजोळच
आजी मायेचाच ठेवा
भाग्य माझे फार थोर
कसे घडविले देवा
असे चांदण्यांचा गाव
खेळायला, फिरायला
सुशेगात होई सारे
आरामात जगायला
सुखासिन आयुष्यात
घडे भले बुरे कधी
लपंडाव नियतीचा
कधी गवसली संधी
सुखकर हे जगणे
कधी पडले ना कष्ट
दिस आले दिस गेले
लागो कुणाची न दृष्ट
अशी संतुष्टी लाभली
नसे कशाचीच हाव
माझी कविताच आहे
सा-या आयुष्याची ठेव
आता निरोप घेताना
आहे एवढीच आस
मिळो सुखांत जिवाला
तृप्त शेवटचा श्वास
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈