श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 166 ☆ संत चांगदेव…☆ श्री सुजित कदम ☆
योग सामर्थ्य प्रचुर
चांगदेव महाराज
चांगा वटेश्वर स्वामी
तपश्चर्या शोभे साज…! १
तापी पुर्णा नदीतीरी
केली तपश्चर्या घोर
चौदा सहस्त्र वर्षाचे
योगी चांगदेव थोर…! २
प्रस्तावना काय लिहू
चांगदेव संभ्रमात
आत्मज्ञान गुरू कृपा
ज्ञाना निवृत्ती शब्दात…! ३
संत ज्ञानेश्वर कीर्ती
ऐकुनीया घेई भेट
पत्र कोरेच धाडले
अहंकारी भाव थेट….! ४
भेटण्यासी आला योगी
वाघारूढ होऊनीया
दाखविला चमत्कार
बोधामृत देऊनीया…! ५
चांगदेव पासष्टीने
दिलें पत्रास उत्तर
मुक्ताईस केले गुरू
सेवा कार्य लोकोत्तर…! ६
गुरू शिष्य प्रवासात
चांगदेवा उपदेश
मेळवावा अंतरंगी
मानव्याचा परमेश…! ७
स्फुट काव्य अभंगात
चांगदेव विवेचन
आयुष्याचे कथासार
योग साधना मंथन…! ८
सांप्रदायी साहित्याला
दिली योगशक्ती जोड
मन निर्मळ पावन
घेई हरीनाम गोड…! ९
चौदा सहस्त्र वर्षाचा
योगी राही कोरा कसा
मुक्ता करी प्रश्न साधा
दिला भक्ती मार्ग वसा…! १०
आत्म स्वरुपाचे ज्ञान
लोक कल्याणाचा वसा
ज्ञाना निवृत्ती मुक्ताई
चांगदेव शब्द पसा…! ११
अंतरंगी तेजोमयी
होते ईश्वराचे रूप
गर्व अहंकार नाश
प्रकाशले निजरूप….! १२
ज्ञानदेव गाथेतील
केले अभंग लेखन
तत्वसार ओवी ग्रंथ
चांगदेव सुलेखन…! १३
दर शंभर वर्षांनी
बदलले निजधाम
योग साधना प्रबळ
तप साधना निष्काम…! १४
चौदा सहस्त्र वर्षाचा
संत योगी चांगदेव
तपश्चर्या भक्ती भाव
दैवी अध्यात्मिक ठेव…! १५
पुणतांबा पुण्यक्षेत्री
आहे समाधी मंदिर
संजीवन समाधीत
ध्यानमग्न गोदातीर…! १६
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈