कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 180 – विजय साहित्य
☆ 🌼 पदोपदी वारी…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आत्मानंदी बोध, आळंदीचे धाम
मुखी हरीनाम, शुभारंभी…! १
जन्म जन्मांतरी, नष्ट होई पाप
पुण्याचा प्रताप, पुण्यशील..! २
पालखी विठोबा , पुणे शहरात
माहेरपणात, रमे वारी…! ३
अष्टांग योगाचा, दिव्य दिवे घाट
भक्ती रस लाट, उचंबळे…! ४
सप्तचक्र ताबा, प्राणायाम ठेवा
सोपानाची सेवा,सासवड…! ५
जिंकतो इंद्रिये, विनासायास
जेजुरी निवास, मोक्षदायी…! ६
जिव्हाळा संपन्न, वाल्ह्याचा मुक्काम
प्रेमळ विश्राम, पालखीचा..! ७
वैष्णवांसी लाभे , आनंदाचा कंद
सज्ज हे लोणंद, स्वागतासी…! ८
तरडगावात, ब्रम्हानंदी सुख
चिंतनी सन्मुख, पांडुरंग…! ९
ब्रम्ह पुर्ण सत्य, फलटणी बोध
जीवनाचा शोध, संकीर्तनी..! १०
द्वंद्वमुक्त होई, बरड निवासी
वारीचा प्रवासी, सुजलाम..! ११
नातेपुते गावी, मुक्त मोहातून
व्यक्त श्वासातून, पांडुरंग…! १२
ज्ञानाची साखळी, माळशिरसात
भक्ती अंतरात, नवविधा…! १३
नको वेळ वाया, सांगे वेळापूर
दिसे अंतपूर, पंढरीचे…! १४
वाखरी मुक्कामी, वाचासिद्ध वाणी
प्रासादिक गाणी, ठायी ठायी..! १५
पांडुरंगमय, होई वारकरी
कृपाछत्र धरी, पांडुरंग…! १६
केला नामोल्लेख,पदोपदी वारी
सुखदुःखे हारी, मुक्कामात..! १७
कविराज चित्ती, प्रतिभेची मात्रा
घडविली यात्रा, प्रासादिक..! १८
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈