श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ पांडुरंगा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(व्योमगंगा)
पंढरीला वैष्णवांची मांदियाळी पांडुरंगा
चंद्रभागा देवतांचे पाय क्षाळी पांडुरंगा
भक्त आले संत आले लाभ घेती दर्शनाचा
आत्मरंगी रंगले ते देत टाळी पांडुरंगा
मोक्षप्राप्ती मागताना एकवेडी आस आहे
काळजाच्या अंतरंगी मूर्त काळी पांडुरंगा
जीवनाची बाग आहे तू दिलेले दान येथे
फुलव तू ती काळजीने होत माळी पांडुरंगा
तूच दाता तूच त्राता देह माझा चंदनाचा
घातली मी माळ कंठी गंध भाळी पांडुरंगा
दान आता मागतो मी जगवण्याला सत्व माझे
नाचताना वाळवंटी देत हाळी पांडुरंगा
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈