सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे
☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆
मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट मध्ये. त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस. आमच्या गॅलरीतून त्यांची विरुद्ध बाजूची गॅलरी व्यवस्थित दिसते. सुंदर सुंदर फुलं बघून मन प्रसन्न होतं नेहमीच. त्यांच्या गॅलरीत सतत कुंडयांची भर पडतांना दिसायची. शेवटी इतक्या कुंड्या झाल्या की त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा कुंड्या गच्चीवर आणून ठेवल्या. आता गच्चीवरचं फिरणं अजूनच प्रसन्न व्हायला लागलं. त्यात त्यांनी दोन मोठ्ठ्या थम्प्स अप च्या बाटल्यांना गोल गोल छिद्र करून त्यात माती भरली अन प्रत्येक छिद्रात ऑफिस टाइम (टेन ओ क्लॉक) ची एक एक काडी लावलेली. सकाळी 10 च्या सुमारास त्या राणी कलरच्या पिटुकल्या फुलांनी भरलेल्या बॉटल्स इतक्या सुंदर दिसायच्या की मलाही मोह आवरला नाही. मी त्यातल्या दोनतीन काड्या तोडल्या अन आमच्या हॉल च्या खिडकीत एका छोट्याश्या बोळक्यात दिल्या टोचून.
पावसाळी हवा असल्याने म्हणा किंवा काय माहिती तीन चार दिवसातच त्या इतक्या छान भराभरा वाढल्या अन त्या दिवशी बघते तर काय! तीन पिटुकली टवटवीत फुलं मस्त डोलताहेत मजेत! सहजच विचार आला मनात की किती पटकन, विनासायास ही रुजली नवीन मातीत, नवीन जागेत. आणि इथेही उधळून देताहेत आनंद सभोवती. जागा बदलली, माती बदलली म्हणून कुठ्ठे कुरकुर नाही, खेद नाही, कुढणं नाही की नाखुषी नाही. गच्चीवर आनंदाची उधळण होतीच त्यांची अन तिथून उचललं तरी बहरणं सुरूच!
आणि ह्याउलट आपण केवढे सवयीचे गुलाम! अगदी सकाळच्या टूथपेस्ट पासून आपल्याला कुठ्ठे, कुठ्ठे म्हणून बदल सहन होत नाही. टूथपेस्ट तीच हवी, चहा तोच अन त्याच चवीचा आवडणार, दूध अमुक एकच, वर्तमानपत्राची सुध्दा सवय झालेली. बदलून बघितला की, “छे बुवा! हयात काही राम दिसत नाही. आपला नेहमीचाच बरा शेवटी” असंच म्हणणार हे पक्के! दिवसभरात कितीतरी गोष्टी असतात आपल्या “अमुकच हवं” वाल्या. अगदी सकाळच्या टूथपेस्टपासून ते थेट झोपायची जागा, उशी आणि पांघरूण पर्यंत सर्व! माणूस शेवटी सवयीचा गुलामच! वाटलं ह्या टेन ओ क्लॉक ला गुरु करून कुठेही पटकन ऍडजस्ट होणं शिकायला हव माणसांनी. किती सोपं होईल सगळ्यांचं आयुष्य!
अर्थातच सगळ्या परिस्थितीत स्वतःला सहज बदलवू शकणारेही बघतोच आपण आजूबाजूला. नक्कीच त्यांचे आयुष्य तुलनेने सहज, सोपे जात असणार ह्यात शंकाच नाही. रुजणं शब्दावरून मग सहजच मनात आले की अगदी जुन्या काळामध्ये मुलामुलींची फार लवकर लग्न व्हायची त्यामुळे बालवयातच सासरी आलेल्या मुलींना त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला रुजवून घेणे तितकेसे कठीण जात नसे नंतर नंतर म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडा बदल झाला. मुलींची लग्न वयाच्या वीस-बावीस च्या वयात व्हायला लागलीत त्यामुळे थोडा त्यांना सासरी जमवून घ्यायला किंचित वेळ लागू लागला पण तरीही लहानपणापासून शेवटी सासर हेच तुझं खरं घर आहे असं मनावर पक्क बिंबवले गेले असल्याने बहुतांश जणीनी हे सहज मान्य केले आणि विनातक्रार रुजल्या. त्यानंतरची पिढी म्हणजे सध्याची तरुण पिढी (आपल्या मुला-मुलींची पिढी) ह्यामध्ये आणखी थोडा बदल झाला आता मुलं किंवा मुली अजून जास्त परिपक्व झाल्यानंतर लग्न व्हायला लागलीत. कदाचित त्यामुळेही असेल पण “थोडं तुझं थोडं माझं” असं म्हणत व्यवस्थित संसार होतांना दिसत आहेत, (अर्थात अपवाद असतातच म्हणा!) आजकालच्या मुलामुलींना हे तेवढं कठीण जात नाही कारण बहुतेक सगळीकडे राजाराणीचे संसार असतात. दोघेही समजदार पणा दाखवत “थोडं तुझं,थोडं माझं” करत एकमेकांशी जुळवून घेत गोडीगुलाबीने, गुण्यागोविंदाने राहतांना दिसतात. त्यात बहुतांश ठिकाणी दोघेही नोकरी करणारेच असतात. त्यामुळे खूप कमी वेळ एकमेकांच्या सहवासात राहतात. अर्थात स्वतंत्र मनोवृत्तीमुळे थोडे फार संघर्ष अटळ असतात पण ते त्यांचे निभावतात. आणि ह्या पिढीमध्ये मुलांच्या विश्वामध्ये, संसारामध्ये आई-वडिलांनीही स्वतःला थोडं बदलवत रुजवून घेतलेलं आहे. यानंतरच्या पिढीमध्ये मात्र काय होईल सांगता येत नाही. मला तरी वाटतं “थोडं तुझं,थोडं माझं” असा सुवर्णमध्य न गाठता “तू तुझं नी मी माझं” ह्या प्रकारात जर सर्व व्यवहार चालणार असतील तर बाकी कठीण आहे! कारण संसार सुरळीत चालण्यासाठी हे एकमेकांच्या विश्वात “रुजणं” दोघांनाही व्यवस्थित जमलं तरच संसार रुपी रोपटे छान सुंदर बहरणार हे नक्की! अगदी टेन ओ क्लॉक सारखे!
तसं पाहिलं तर अगदी शाळेत पहिल्यांदा जाणाऱ्या मुलालाही त्या नव्या वातावरणात रुजावंच लागतं आणि थेट रिटायर्ड झालेल्या आजोबांनाही नव्याने आपल्या स्वतःच्याच घरात पुन्हा रुजावंच लागतं! थोडक्यात काय तर रुजणं म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेता येणं! सध्याच्या आमूलाग्र बदललेल्या युगात सगळं नवीन तंत्रज्ञान नीट माहिती करून घेणं आणि वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य रीतीने वापर करणं म्हणजे तरी काय शेवटी? स्वतःला डिजिटली रुजवण्याचाच एक प्रकार! आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांवर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जितकं सहज स्वतःला रुजवता येतं तितकं तुमचं आयुष्य कमीअधिक सोपं होत जातं हे निश्चित! रुजणं टेन ओ क्लॉक चं असो का तुमचं आमचं! शेवटी तात्पर्य एकच हो!
© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे
मो 9890679540
अकोला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈