विविधा
☆ “सहज सुचल म्हणून…” ☆ प्रा.भारती जोगी ☆
सहज सुचलं म्हणून…….
काही दिवसांपूर्वी श्रीरंग खटावकर याची जन्म वारी या नाटका बद्दल ची पोस्ट वाचनात आली. शीर्षक होतं
आपण ठरवायचे आपण चाळ बनायचे की टाळ……
मनात विचारांची आवर्तनं सुरू झाली.
चाळ आणि टाळ…… दोन्ही नाद ब्रह्मा ची आविष्कृत रूपं! ताल अधिक लय यांची नाद लहरीं ची निर्मिती! दोघांच ही काम लयीत वाजणं, ठेक्यावर झंकारणं!!! पण चाळ बहुधा इतरांच्या मनोरंजना करीता… तर टाळ स्व रंजना करीता… आत्मानंदा साठी!!
चाळ… प्रपंचा साठी पायी बांधण्याचा केलेला प्रपंच! तर टाळ.. परमार्था साठी केलेला प्रपंच!
प्रश्न आहे तो आपण चाळ बनायचे की टाळ???
तसं पाहिलं तर ही दोन्ही भक्ती ची साधने! एक कलेच्या भक्ती चं…. तर एक परमेश्वराच्या भक्ती चं! भक्ती म्हटली की… येते ती.. तल्लीनता, तद्रूपता!! आणि मग बघा ना..
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग!! म्हणजे… चाळ न बांधता ही तन्मय होऊन नाचणं आलंच ना?
मीरा बाई चं कृष्ण भक्ती चं मधुरा भक्ती चं रूप बघा …
पग घुंगरू बांध मीरा नाची रे!!
तिनं तिची भक्ती व्यक्त करण्यासाठी,
कृष्णा प्रती चं समर्पण चाळ बनून च तर सिद्ध केले.
एका गाण्याच्या ओळी आठवल्या,
कांटों से खिंचके ये आंचल
तोड के बंधन बांधी पायल
आता बघा…. एक बंधन तोडलयं… सोडवलंयं त्यातून… पण… परत दुसरं बंधन चाळ बांधले च की पायी!!
मग प्रश्न पडतो की… बंधनातून मुक्ती नंतर परत बंधन?? तर हो… चाळ बांधणं हे ब्रह्मानंदी टाळी लागून.. मुक्ती प्राप्त करून देणारी अवस्था आहे. त्या तली तल्लीनता.,. मोक्षप्राप्ती ची वाट मोकळी च करते जणू! सांसारिक बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराच्या भक्ती त.. नामस्मरणाशी स्वत:ला बांधून घ्यायचं.. दंग होऊन जायचं.. रंगून जायचं.. एकरंग.. एकरूप व्हायचं.
टाळ हाती घेऊन ही तीच फलप्राप्ती!! कारण टाळ हाती घेऊन
देहभान विसरून नाचणं च तर असतं ना?? नृत्य ही मनातल्या भाव-विभाव-अनुभाव यांचं प्रकटीकरण! आत्म्याची परमात्म्याच्या भेटीला आतुर पावलांनी… पदन्यासातून धरलेली वाटच तर असते ना! आणि टाळ हाती घेऊन झाले ले पदन्यासाचे प्रकटीकरण ही… पंढरीच्या वाटेवरचे रिंगण असो की
किर्तनाचे रंगी नाचे असो….
टाळ बना की चाळ…. …
ही जन्म वारी सुफळ, संपूर्ण व्हावी आणि विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला!!! इतकं सामर्थ्य हवं आपल्या टाळ आणि चाळ दोन्ही च्या नाद लहरीं चं!! यां दोन्ही पैकी कुठलंही रूप हे ईश्वरा शी एकरूपत्व साधणारे नादमय नामस्मरण च आहे!
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈