श्री सुनील देशपांडे
परिचय
शालेय शिक्षण कोयनानगर व महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज कराड
- अनेक वर्षे वास्तव्य नाशिक सध्या वास्तव्य पुणे (बाणेर).
- स्वरचित तीन मराठी कविता संग्रह प्रसिद्ध
- ‘संवाद’ या संस्थेच्या चार स्मरणिकांचे प्रकाशन.
- ‘संवाद’ च्या चार दिवाळी अंकांचा उपसंपादक
- ‘महादान’ या अवयवदाना संबंधीच्या विशेषांकाचे संपादन.
- अवयवदाना विषयी दोन पुस्तिकांचे लेखन व प्रकाशन.
- पंघरा वर्षे रोटरीच्या विविध बुलेटिन्सचे संपादन व प्रकाशन.
- विविध नियतकालिकांमध्ये नैमित्तिक स्फुटलेखन.
- अवयवदाना संबंधी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर.
- फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या राज्यस्तरीय संस्थेचा उपाध्यक्ष.
- ‘अंगदानकी चार लाईना’ – हा हिंदी चारोळ्यांचा ई-बुक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
- स्वत: शब्दांकन केलेली अवयवदान प्रतिज्ञा सरकारमान्य झाली असून ती सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमात अधिकृत प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते.
- माजी अवयवदान विभागीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय रोटरी विभाग क्र ३०३०
- मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक या संस्थेचा संचालक
- महाराष्ट्र शासनाच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागीय प्राधिकरण समितीचा (Divisional Authorisation Committee) सदस्य.
मनमंजुषेतून
☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
लेखनाचा किती मोठा प्रवास आमच्या पिढीने अनुभवला तसा क्वचितच दुसऱ्या कोणत्या पिढीने अनुभवला असेल. लहानपणी मला आठवते चौथीपर्यंत आम्हाला पाटी-पेन्सिल होती. चौथीला पहिल्यांदा वही आणि शिसपेन्सिल आली. पेन नव्हतंच. पण पाचवीपासून सुरू झाली टाक-दौत. दौत हातामध्ये घेऊन जायची. शाळेच्या बाजूला दुकानात जायचं, त्या दुकानातून शाईची पुडी विकत घेऊन यायची. त्या दौत नामक बाटलीमध्ये नळाचे पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये शाईची पुडी टाकायची. हे टाकत असताना हात निळेजांभळे व्हायचे.
बऱ्याच वेळेला कुणाचा तरी पाय लागून कुणाची तरी दौत सांडायची किंवा लाथाडली जायची. या लाथाडलेल्या दौतीचा प्रसाद अनेकांना मिळायचा. त्या वेळेला बाक नव्हतेच. तेव्हा बस्करं तरी असायची, नाहीतर पाट तरी असायचे. त्यावर बसून टाक आणि दौत यांचा वापर करुन वहीत लिहिणे हा एक वेगळाच थ्रिलिंग अनुभव. संध्याकाळी घरी आल्यावर सगळे हात निळेजांभळे झालेले. बऱ्याच जणांचे शर्ट-पॅंट वर निळेजांभळे डाग पडलेले. पायाचे गुडघे निळेजांभळे झालेले. दप्तरं तर सगळ्यांचीच निळ्या जांभळ्या डागांनी भरलेली असायची. आईला अत्यंत त्रासदायक ठरणाऱ्या अशा अवतारात आम्ही घरी पोहोचायचो. बऱ्याच वेळेला बाबांचा मारही खायचो. त्या वेळेला कपडे धुण्यासाठी आईला जो त्रास व्हायचा त्याची आम्हाला तेंव्हा फारशी कल्पना नसायची. त्यावेळेला साबण म्हणजे 501 नावाचा बार. तो सगळ्यात चांगला साबण समजला जायचा. त्या बाराचा एक तुकडा घेऊन कपडे घासायचे आणि शक्यतो ते निळेजांभळे डाग पुसट पुसट करण्याचा प्रयत्न आई करत असे.
सहसा निळ्या जांभळ्या डागांचे हे युनिफॉर्म घातलेला बहुदा प्रत्येक जणच असायचा. शाईच्या डागांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व शर्ट पॅन्टवर वागवत आम्ही पाचवी सहावी सातवी या तीन वर्षांचा प्रवास केला. त्यानंतर आठवीमध्ये दाखल झाल्यावर पहिल्यांदा आमच्या हातात पेन आलं. अर्थात ते पेन म्हणजे शाईचं पेन. त्या पेनमध्ये शाई भरणे हा एक प्रचंड मोठा सोहळा असायचा. अर्थात त्यालाही दौत असायचीच. फक्त टाकाबरोबर सतत बाळगायला लागयची नाही, त्या ऐवजी दिवसातून एकदा कधीतरी त्या पेनमध्ये शाई भरायला लागायची. आणि आमचे हात पुन्हा निळेजांभळे व्हायचेच. अर्थात एकदा पेनमध्ये शाई भरल्यानंतर पुन्हा सतत निळेजांभळे हात करावे लागायचे नाहीत. परंतु कुणीतरी खोडी काढायची म्हणून किंवा कुणीतरी गंमत म्हणून किंवा भांडणाचा सूड उगवायचा म्हणून पाठीवर पेन झटकलेले असायचे. ते पाठीवरचे निळेजांभळे डाग हे घरी आल्यावर आईने धपाटा घातल्यावरच आम्हाला दिसायचे. त्यानंतर अकरावीपर्यंत म्हणजेच एस एस सी पर्यंत शाईची पेनं वापरली.
कॉलेजला आल्यावर मग बॉलपेनं सुरू झाली. सुरुवातीला बॉलपेनसुद्धा अधूनमधून बंद पडणारी, न उठणारी वगैरे असायचीच. मग पुढचं धातूचं टोक दाताने काढून नळीला फुंकर मारून पुन्हा चालू करायची. ते चालू करत असताना त्यामागच्या प्लास्टिकच्या नळीतून अचानक जास्त शाई बाहेर यायची आणि पुन्हा हात निळे करणे आलेच. या अशा सर्व प्रवासातून आता बऱ्यापैकी बॉलपेन आलेली आहेत. बॉलपेन रिफिल बदलणे हा प्रकार बंद झाला आहे. आता पेन बिघडले की पेनच फेकून द्यायचे आणि दुसरे घ्यायचे.
तरीसुद्धा आता मला वाटते पेनचा वापर सुद्धा हळूहळू बंद होत जाणार. आता मी सुद्धा हा लेख लिहिलेला आहे तो पेनच्या मदतीशिवाय लिहिलेला आहे. येथून पुढे मोबाईल, कॉम्प्युटर यावरील टायपिंग या प्रकाराने पेनचे संपूर्ण उच्चाटन होईल असे वाटते. आता आमची नातवंडेसुद्धा ऑनलाइन शिक्षणाला सरावत आहेत. बहुतेक काही वर्षातच परीक्षागृहांमध्ये कॉम्प्युटरच असतील, आणि त्यावर बोलून टायपिंग करून उत्तरे लिहिता येतील. अशा तऱ्हेच्या परीक्षाही सुरू होतील. सध्या मोबाईलवर आपण बोलून टायपिंग करू शकतो. पण नंतर चुका सुधारत बसावे लागते. त्यात बर्याच सुधारणा नजीकच्या काळात होतीलच.
… आपण बोलून बरोबर अक्षरे टाईप होत राहतील.
याच पद्धतीने नजीकच्या काळात अक्षर लेखनाचे संपूर्ण उच्चाटन होईल हे नक्कीच. पण तरीसुद्धा अक्षर लेखनाचा आमचा भूतकाळ आठवून खूप खूप मज्जा येते हे सांगायला हवे का ?
श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈