श्री कचरू चांभारे
इंद्रधनुष्य
☆ कृषिदिन निमित्त – “पोरीयातारा कृषीपुत्र वसंतराव नाईक” ☆ श्री कचरू चांभारे ☆
(आज १ जुलै – हा दिवस ‘कृषिदिन‘ म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त)
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेले महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शेती टिकली तरच देश टिकेल. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, असं आग्रहपूर्वक मांडणारे वसंतराव हे कृषीनिष्ठ कृषीपुत्र होते. महाराष्ट्राचा इतिहास एक यशवंत व दोन वसंत यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ते तिघे नव महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. नाईक साहेबांनी शेती, उद्योग, विद्युतनिर्मिती, तलाव बांधणी, विहिरी खुदाई, रस्ते बांधकाम, सिडको वसाहत निर्मिती, पंचायतराज सत्ता विकेंद्रीकरण, अशा सर्वच क्षेत्रात क्रांतीकारी काम केलेले आहे. त्यांचा कोणताही एक पैलू घेतला तरी त्यावर खूप मोठे लिहिण्यासारखे आहे.
१ जुलै १९१३ रोजी वसंतरावांचा जन्म फुलसिंग नाईक व सौ. होनुबाई मातापित्याच्या पोटी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या छोट्या गावी झाला. गहुली हे गाव त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड (नाईक) यांनीच वसविले आहे. बंजारा समाजात नायकाला प्रतिष्ठेचे व मानाचे स्थान असते. मेहनत, जिद्द, व शिक्षण या जोरावर स्व-संस्कृती, रितीरिवाज जपूनही नागरी संस्कृतीला अंगीकारणारा बंजारा हा बहुधा एकमेव समाज असावा. संत सेवाभायांनी दिलेली शिकवण पाळली की राजयोग येतोच याचं उदाहरण म्हणजे नाईक घराणे होय. १९५२ पासून पुसद तालुक्यातील राजकारणावर नाईक घराण्याचे निर्विवाद वर्चस्व आहे. याच घरातून महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री, दोन मंत्री मिळालेले आहेत.
वसंतरावांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण दरवर्षी वर्गासोबतच गावही बदलत झाले. प्राथमिक चौथीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना रोज चार पाच किमी पायपीट करावी लागत असे. माध्यमिक शिक्षण अमरावतीला व पुढे बीए, वकीलीचे शिक्षण नागपूरला झाले. कुशाग्र बुद्धिमत्ता, संवाद चातुर्य व उच्च शिक्षण यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. शेतक-यांचे कैवारी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या थोर नेत्याच्या सोबत वकिली शिकताना, महात्मा फुलेंच्या विचाराचे पाईक असलेल्या वसंतरावांनी देशसेवेचे धडे गिरवले. इथूनच त्यांच्या राजकारणाची पायाभरणी झाली. चाळीसच्या दशकात त्यांनी राजकारणात पदार्पण केले व पहिल्याच प्रयत्नात ते पुसद नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष झाले. याच पुसद तालुक्याने त्यांना तब्बल पाचवेळा आमदार केले. तसेच पुढे सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांच्या रूपाने पुसद तालुका कायम नाईक घराण्याशी बिलगून राहिला. पुसद तालुका मध्यप्रांतात असताना तिथेही वसंतराव उपमंत्री राहिले.
आज देशपातळीवर नावाजलेली म. न. रे. गा. म्हणजे नाईक साहेबांनी स्थापिलेली रोजगार हमी योजना होय. या योजनेमुळे महाराष्ट्रात अनेक तलाव, विहिरी बांधून झाल्या.
१९६३ ते १९७५ हा साहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ तसा कसोटीचाच होता. अन्नधान्याचे संकट व दुष्काळाचे सावट राज्यावर होतेच. शिवाय पाकिस्तानसोबतचे युद्धही याच काळातले. कोयना भूकंपही याच काळातला. मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तेव्हा दुखावलेले काही मातब्बर आमदारही सोबतीला होतेच. वसंताला ग्रीष्म करण्यासाठी. सरकारच्या बाहेर आचार्य अत्रे, सेनापती बापट, मृणालताई गोरे, जांबुवंतराव धोटे अशी मातब्बर मंडळी सामाजिक प्रश्नावर सरकारशी लढायला होतीच. पण अंगमेहनतीने चातुर्याने वसंत असा फुलला की मुख्यमंत्री निवासाचे नावच वर्षा झाले व ते आजही कायम आहे.
साहेब स्वतः शेतकरी होते. दौ-यावर असताना ते वाटेतल्या शेतक-यांना थेट बांधावरून उतरून शेतात जाऊन मार्गदर्शन करत असत. चार कृषी विद्यापीठे, कोराडी, पारस औष्णिक वीज प्रकल्प, ही साहेबांची देण आहे. एकाचवेळी राहुरी, परभणी, अकोला, दापोली या चार कृषी विद्यापीठांची निर्मिती ही देशपातळीवरची आजपर्यंतची एकमेव घटना आहे. सर्वसामान्य लोकांना वसंतरावांचे सरकार आपले वाटत होते, म्हणूनच १९६७ साली देशात काँग्रेस विरोधी लाटेत काँग्रेसची सरकारं कोसळत असताना, महाराष्ट्रात मात्र २०२ आमदारांसह नाईकसाहेब दुस-यांदा मुख्यमंत्री झाले. व पुन्हा १९७२ साली २२२ आमदारांसह तिस-यांदा मुख्यमंत्री झाले.
१९६६ च्या पुण्यातील शनिवार वाडा सभेत ते बोलताना म्हटले होते की, “ पुरोगामी महाराष्ट्र अन्नधान्यासाठी कुणापुढे हात पसरणार नाही. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी जाहीरपणे फासावर जाईल. ” ही घोषणा काही निवडणुकीतल्या टाळ्यांसाठी नव्हती, तर ही घोषणा म्हणजे हरितक्रांतीची नांदी होती. भूदान चळवळीत योगदान देताना नाईक साहेबांनी लोकसहकार्याने तब्बल पाच हजार एकर जमीन भूदान चळवळीस मिळवून दिली. ते स्वतः एक जमीनदार असल्यामुळे त्यांना भूदानासाठी जमीनदारांचे मन वळविणे सोपे गेले.
अखिल भारतीय स्तरावर त्यांनी भटक्या बंजारा समाजाला संघटित करुन संमेलनही घेतले होते. शिवाजीराव मोघेसारख्या तरुणाला बळ देऊन आदिवासी संघटन मजबूत केले. हरिभाऊ राठोड, मोहन राठोड, राजाराम राठोड यासारख्या नवतरूणांना झेप घ्यायला भाग पाडलं. नाईक साहेब जन्मजातीने बंजारा होते, तरी त्यांचे कार्य पुरोगामी होते. शेती उद्धारक होते. सर्व जातीतील पुढाऱ्यांना व प्रादेशिक प्रांत अस्मिता जोपासणारांना हाताळून त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीचे पंख दिले.
पंडित नेहरू यांनी हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रीला बोलाविले म्हणून यशवंतराव दिल्लीला गेले. मारोतराव कन्नमराव राज्याचे मुख्यमंत्री झाले. जनतेशी नाळ असलेले, स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेले मारोतराव कन्नमवार हे एक लोकप्रिय नेते होते. परंतु दुर्दैवाने अल्पकाळातच त्यांचे निधन झाले. नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक मातब्बर आमदार रांगेत होते. यशवंतरावांनी वसंतराव नाईकांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. वसंतराव नाईक हे सर्वांना सोबत घेवून चालणारे नेते होते. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले व नाईकांच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री असलेले बाळासाहेब देसाई मुंबईतील गिरणी कामगार संबंधित एका घटनेनंतर राजीनामा देऊन पाटणला निघून गेले होते. त्यांच्या पाठिंब्याला समर्थन म्हणून आणखी दोघांनी राजीनामे दिले होते. नैसर्गिक व राजकीय परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायची ती वेळ होती. अशातच कोयना भूकंप झाला. कोयना हे गाव बाळासाहेब देसाई यांच्या मतदारसंघात येत होते. बाळासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. नाईक साहेबांनी मृदू आर्जवाने बाळासाहेबांचे मन वळविले व त्यांना महसूलमंत्री केले. कोयनेतील बेचिराख झालेली घरे उभी केल्याशिवाय आता मुंबई नाहीच, ही खुणगाठ बांधून बाळासाहेब कोयनेत ठाण मांडून बसले. वसंतराव बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सत्तर हजार घरांचे पुनर्वसित बांधकाम झाल्यावरच बाळासाहेब देसाई मुंबईला परतले.
बंजारा समाजात संत सेवाभाया, पोहरादेवी व फुलसिंग नायकेर छोरा वसंतराव यांना परमोच्च स्थान आहे. या स्थानाची कारणं बंजारा समाजाच्या उत्कर्ष वाढीच्या प्रवासात दडलेली आहेत.
” पोरीयातारा “ या शब्दाचा अर्थ होतो उच्च मार्गदर्शक, अढळ तारा. वसंतरावांचे महाराष्ट्रातील स्थान पोरीयातारा असेच आहे. बुद्धी, परिश्रम, निष्ठा या बळावर ते दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आजन्म शेतीशी व शेतीव्यवस्थेशी एकनिष्ठ असलेल्या कृषीपुत्राचा जन्मदिन ‘ कृषी दिन ‘ म्हणून साजरा व्हावा, ही घटना कृषी संस्कृतीला संजीवनी देणारी आहे.
अन्नदात्या नाईक साहेबांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
© श्री कचरू चांभारे
संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड
मो – 9421384434 ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈