सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गौरव गाथा श्वानांची… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अनादी ,अनंत काळापासून कुत्रा हा प्राणी ज्याला माणसाने सर्वप्रथम पाळीव प्राणी बनविले. तो माणसाळला आणि माणसाचा उपकार कर्ता झाला .कुत्रा हा इमानदार आणि स्वामिनिष्ठ असा प्राणी आहे .माणसाच्या प्रेमाच्या मोबदल्यात, तो आपले सारे इमान आणि निष्ठा आपल्या मालकाला अर्पण करतो. त्याच्या इमानदार आणि प्रामाणिक स्वभावामुळे तो माणसाच्या जास्त जवळ आला. कुत्रा, ज्याला आपण श्वान असेही म्हणतो. त्याला माणसाच्या डोळ्यांकडे पाहून माणसाचे हावभाव ओळखता येतात. त्याची वासाची क्षमता माणसाच्या 1000 पट आणि ऐकण्याची क्षमता माणसाच्या पाचपट जास्त असते. त्यामुळे गुन्हे शोधून काढण्यासाठी ,कुत्र्यांना शिकवून तयार केले जाते. श्वानांची हुशारी, कर्तृत्व , पराक्रम आणि त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीची उदाहरणे किती सांगू तितकी कमीच ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातले , आणखी इतरही ठिकाणचे पराक्रम ऐकून त्या श्वानांना खरोखरच मनोमन सलाम करावासा वाटतो. सलाम.

अमेरिकन नाविक सैनिक “डिन मार्क” हा अडीच वर्षानंतर घरी परतला. त्याने आनंदाने आणि गहिवरत आईला मिठी मारली .आईला म्हणाला, ” आज मी तुझ्यासमोर दिसतोय तो केवळ परमेश्वरी कृपा .म्हणजे मूर्तीमंत परमेश्वरी कुत्र्यामुळे. आईला उलगडा होईना . तेव्हा त्याने घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. अमेरिकन नाविक सैनिकांनी जपानने जिंकलेल्या न्यू गीनीतील एका बेटावर पाय ठेवला .तो “सिझर ” या अल्सेशियन कुत्र्याला सोबत घेऊनच .एका पायवाटेवर शत्रूने भूसुरुंग पेरून ठेवलेले होते .त्याच वाटेने  “सिझर ” पुढे आणि सैनिक मागे असे चालू लागले. सुरुंग ठेवलेल्या जागा सीझर नाकपुड्या फुगवून पुन्हा, पुन्हा  हुंगायला लागला. तत्परतेने असे सुरुंग काढून टाकून सैनिकांना पुढे जाणे सोपे झाले. एका ठिकाणी एका  झुडूपात दबा धरून बसलेल्या जपानी सैनिकाची ” सिझरला” चाहूल लागली. गुरगुरत त्या बाजूला तो पाहायला लागला. अमेरिकन सैनिकांनी मशीन गन आणि हँड ग्रेनेडचा, त्या दिशेने भडीमार केला .नंतर पाहतात तो कितीतरी जपानी सैनिक शस्त्रांसह मरून पडलेले दिसले. एक आश्चर्य सांगायचे म्हणजे, एक जपानी सैनिक हातातील मशीन गन टाकून शरण आला. ( जपानी सैनिक शरण येत नाहीत, तर हाराकिरी करतात .) शरण येण्याचे कारण त्याला विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले ,”तुमचा हा इतका देखणा आणि सुंदर कुत्रा कदाचित मरेल. म्हणून मी गोळीबार केला नाही. यालाच म्हणतात श्वानप्रेम .! ‘डिन मार्क’ ने “माझे प्राण कुत्र्यामुळे , ‘ सीझर’ मुळे वाचले .तोच खरा  माझा प्राण दाता असे उद्गार काढले .

‘ चिप्स ‘ नावाचा हा असाच एक कुत्रा . दुसऱ्या महायुद्धात असामान्य कामगिरी आणि धीटपणाबद्दल खूप गाजला. अमेरिकेच्या तिसऱ्या पायदळ तुकडी बरोबर उत्तर आफ्रिकेत  ‘कैसा ब्लांका ‘ या बंदरावर उतरला. पुढे दोस्त सैन्य जर्मनीने व्यापलेल्या, इटली देशाच्या दक्षिण प्रांतातील , सिसेलीत उतरले. जर्मन सैन्या बरोबर झालेल्या लढाईत, ‘ चिप्स ‘ चे काम अत्यंत महत्त्वाचे होते. रणधुमाळीत एका जर्मन सैनिकाला ,त्याने मशीनगन सह पकडून आणले .आणि त्याच्या संपूर्ण  प्लॅटूनला शरण येण्यास भाग पाडले .रात्रीच्या काळोखात पुढे येणाऱ्या जर्मन सैनिकांची चाहूल घेऊन ,त्याच्या मूक भाषेत तो इशारा देत असे .आणि अनेक जर्मन सैनिक पकडले जात असत. पुढे 1943 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांची ‘कैसाब्लांका ‘येथे बैठक झाली. तेव्हा हाच  ‘ चिप्स ‘, बाहेर इतर सैनिकांच्या बरोबर खडा पहारा देत होता .आणि आपले काम चोख बजावत होता.

‘ डिक’ हा असाच एक गाजलेला कुत्रा. पॅसिफिक मधील एका बेटावर ,अमेरिकन सैन्याबरोबर उतरला. 53 दिवसांच्या लढाईत , 48 दिवस त्याच्या कामगिरीची लष्करात प्रशंसा केली गेली. दाट जंगलात लपून असलेल्या जपानी चौक्या त्याने दाखवून दिल्यामुळे, त्या नष्ट करणे अमेरिकन सैन्याला शक्य आणि सोपे झाले. विशेष म्हणजे या लढाईत ,एकही अमेरिकन सैनिक जखमी सुद्धा झाला नाही. त्याचं श्रेय  ‘ डिकला ‘नक्कीच जातं.

‘अँड्री ‘  हा डॉबरमॅन कुत्रा, ‘ओकिनावा’  च्या लढाईत अमेरिकन सैन्याबरोबर दाखल होता .या लढाईत बरेच अमेरिकन सैनिक मारले गेले .पण  ‘अँड्री ‘न घाबरता ,न डगमगता सर्वात पुढे जाऊन धोका हेरत असे . तीक्ष्ण नाकामुळे त्याला शत्रूची चाहूल हल्ला होण्यापूर्वीच लागत असे. त्यामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले .अनेक सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या त्याच लढाईत एका गोळीने वीर मरण आले. सलाम त्या रणवीराला ! सलाम.

   ‘ फिप्का ‘ , हा एक जवान ( कुत्रा ) दुसऱ्या महायुद्धात, पाचव्या अमेरिकन दलाबरोबर, फ्रान्सच्या रणांगणावर उतरला. शत्रूची धोक्याची हालचाल नाकाच्या साहाय्याने दर्शविण्यात तो निष्णात होता. मातीत लपवून ठेवलेली विजेचे तार त्याला दिसताच ,त्याने दुरूनच भुंकून भुंकून धोका नजरेस आणून दिला. लगेच तो धोका नष्ट करण्यात आला. नंतर असे आढळून आले की, त्या तारेला जोडलेले तीन सुरूंग एकदम उडवून अनेक सैनिक गारद झाले असते .पण शेकडो सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या, ‘फिप्का” ला एका हात बॉम्ब मुळे प्राण गमवावा लागला . तो शहीद झाला .सलाम त्याच्या कर्तव्य पुर्तीला .नुकतंच वाचनात आलं करटणी बडझिन (अमेरिका ) नावाच्या महिलेचा ‘ टकर ‘ नावाच्या गोल्डन रिट्रीवर जातीच्या कुत्र्याची वार्षिक कमाई, आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे .तो एका जाहिरात कंपनीसाठी मॉडेलिंग करतो. त्यासाठी त्याला एक लाख डॉलर मिळतात. त्याला एका जाहिरातीसाठी पोज देण्याचे 6656 ते अकरा हजार 94 डॉलर (अंदाजे 55 ते 92) लाख रुपये मिळतात .इतके प्रचंड कमाई करणारा हा जगातील एकमेव कुत्रा आहे. तो आठ महिन्याचा असल्यापासून जाहिरात कंपनीसाठी मॉडेलिंग करतो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments