श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

बंड्या काळे त्याच्या मित्राकडे – क्राईम रिपोर्टर रजत सरदेसाईकडे आला होता. रजतच्या टेबलावर त्याने लिहिलेल्या एका लेखाचा मसूदा पडला होता – शीर्षक होतं – “आणखी एक कोयता गँग !”.

 “आता ही कुठली बाबा कोयता गँग ? पुणे परिसरातील वेगवेगळ्या कोयता गँगबद्दल तू स्वत:च तर गेले सहा महिने लिहीत आहेस की.” 

“बंडोपंत, हा लेख हातात कोयते घेऊन वार करणाऱ्या गुंडांबद्दल नाहीये. हा लेख सिकल सेल ॲनिमिया या रोगाबद्दल आहे – थॅलेसेमियाबद्दल. सिकल म्हणजे कोयता. जशी कोयता गँग धोकादायक आहे तसेच हा रोगही तसाच आणि तितकाच धोकादायक आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच.” रजत निरगाठ उकल तंत्राने समजावून सांगत होता.

 “ॲनिमिया ? पण तो तर रक्तातील हिमो का काहीतरी कमी झाल्याने होतो ना ?”

“हिमोग्लोबिन.”

 “हां, तेच ते.”

 “पण मग त्याचा कोयत्याशी काय संबंध ?” बंड्या पूर्णपणे out of depth होता.

 “तुला हिमोग्लोबिन म्हणजे काय ते ठाऊक आहे का ? रेड ब्लड सेल्स ?”

 बंड्याचा चेहरा कोराच आहे हे पाहून रजतने समजावण्यास सुरुवात केली. — “रक्तात रेड ब्लड सेल्स असतात. यांचा नॉर्मल आकार मेदुवड्यासारखा असतो. त्यात हिमोग्लोबिन प्रोटीन असतात. ही प्रोटीन्स फुफ्फुसांमधून आलेला ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पोचवतात आणि तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून फुफ्फुसांपर्यंत पोचवतात.”

बंड्याला फारसा काही अर्थबोध झालेला दिसत नव्हते. 

“थोडक्यात सांगायचं तर हिमोग्लोबिनशिवाय ना प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळेल, ना प्रत्येक अवयवातून कार्बन डाय ऑक्साईड गोळा केला जाईल.”

 “पण मग यात कोयता कुठे आला ?” बंड्याचा हैराण प्रश्न.

“काही अनुवांशिक बदलांमुळे या मेदुवड्यासारख्या असणाऱ्या रेड ब्लड सेल्स कोयत्यासारख्या (sickle) किंवा चंद्रकोरीसारख्या (crescent moon) होतात. त्यांचे ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड वहनाचे काम ते करू शकत नाहीत, शिवाय टोकेरी आकारामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते ती वेगळीच. ऑक्सिजन न मिळाल्याने अशा पेशंटसना धाप लागते, गुदमरल्यासारखं होतं, सतत अशक्तपणा राहू शकतो.”

 “अरे बाप रे, असं लफडं आहे होय ?” लेखाची पानं चाळता चाळता बंडू म्हणाला. “पण हा रोग होतो कशाने ? चौरस आहार न घेतल्याने, अस्वच्छतेमुळे का संसर्गाने ?”  

 “नाही. यापैकी कशानेच हा रोग होत नाही. हा रोग आई वडिलांतील अनुवंशीय (genetic) बदलांमुळे होतो. ज्यांना थॅलेसेमिया झाला आहे अथवा जे थॅलेसेमियाचे वाहक (carrier) आहेत अशा आईवडिलांच्या मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता खूप जास्त असते. सिंधी, लोहाणा आणि पंजाबी समाजांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडली, पत्रिका जुळवून बघण्यापेक्षा आपण थॅलेसेमियाच्या दृष्टीने कोणत्या गटात – थॅलेसेमिया मुक्त, वाहक का रोगी – कोणत्या गटात मोडतो ते तपासून बघण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. आपण थॅलेसेमियाचे रोगी वा वाहक असलो तर दुसऱ्या थॅलेसेमिया रोगी वा वाहकाशी लग्नच करू नये अथवा केलेच तर मुलं होण्याचा चान्स न घेतलेलाच बरा.  डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग हे गोंड समाजामध्ये कार्यरत आहेत. या समाजात ‘एक देव’, ‘दोन देव’ अशा उपजाती आहेत आणि वर वधू दोघंही एकाच उपजातीचे असलेले त्यांना चालत नाही. या समाजातही थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे. म्हणून मग डॉ. बंग यांनी त्यांच्या धार्मिक भावनांचा आधार घेत त्यांना सांगितलं, की आता समाजात आणखी एक नवी उप-जात आली आहे – सिकल देव. ही उप-जात रक्त तपासणीतून ओळखता येते, आणि नवरा बायको दोघेही ‘सिकल देव’ उप-जातीचे असले तर तेही चालत नाही.”

 “व्वा ! त्या बिचाऱ्यांना हे वाहक, रोगी प्रकरण कळणार नाही. पण त्यांच्या धार्मिक श्रद्धांना जोडल्याने हे काम सोप्पं होऊन गेलं,” बंड्याला हे पटलं…..  “पण मग या रोगावर उपाय काय ? हा रोग कशाने बरा होतो ?” 

 “आजच्या घडीला तरी हा रोग पूर्णपणे बरा कधीच होत नाही. Prevention is better than cure हे इथं अगदी चपखलपणे लागू पडतं. बाळ आईच्या गर्भात असताना नाळ किंवा गर्भजलाची तपासणी करून बाळाला थॅलेसेमिया आहे का नाही हे सुनिश्चित करता येते. दुर्दैवाने जर बाळाला थॅलेसेमिया झालाच तर या रोगाच्या तीव्रतेनुसार विविध उपाययोजना करता येतात. चौरस आहार व व्हिटॅमिन यांनी पेशंटची प्रकृती चांगली रहाण्यास मदत होते. नियमितपणे हात धुणे, संसर्ग टाळणे यानेही पेशंटची आजारी पडण्याची वारंवारिता frequency कमी करता येते. अनेकदा गरजेनुसार महिन्यातून एकदा पेशंटला चांगले रक्त देणे – blood transfusion – हा उपाय प्रामुख्याने केला जातो. पूर्वी रक्तदात्याच्या आरोग्याबद्दल ठोस माहिती नसायची. व दात्याकडून मिळालेल्या रक्तामुळे कावीळ, HIV असे रोग पेशंटला होण्याची भीती असायची. पण आता मिळणाऱ्या रक्ताची सखोल परीक्षा होते, व हे रक्त निर्धोक आहे याची खात्री पटल्यानंतरच ते पेशंटला दिले जाते, त्यामुळे हा धोका आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच, रक्त स्वीकारतानाच्या सुया व अन्य वैद्यकीय अवजारे आता one time use असतात किंवा व्यवस्थित निर्जंतुक केली असतात, त्यामुळे त्यातून अन्य संसर्गाचे वा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता आता खूप कमी झाली आहे. (करोना काळात मात्र या पेशंटना रक्त मिळवण्यास खूप अडचणी आल्या.)

 सारखे रक्त स्वीकारल्याने पेशंटच्या रक्तातील लोहाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढू शकते. त्यामुळे हे प्रमाण कमी करणारी औषधे पेशंटला घ्यावी लागतात. सुदृढ बाळाच्या नाळेतील पेशी वापरणे (stem cell therapy), bone marrow transplant असेही उपचार केले जातात. आयुर्वेद, होमिओपथी यांच्याही काही औषध पद्धती आहेत, परंतु आजच्या घडीला तरी, या जनुकीय आजारावर (genetic disease) १००% खात्रीलायक, १००% परिणामकारक उपाय नाही. 

 पाच दहा वर्षांपूर्वी, या रोगाची प्राणघातकता खूप भयावह होती. आजच्या घडीला हा इतका जीवघेणा रोग नाही, परंतु पेशंटला जपावे खूप लागते. जसं कोयता गँग बाबतीत वेळीच आणि नियमित सावधगिरी घेणं गरजेचं आहे, तसंच या रोगाचं आहे, आणि म्हणूनच या अशा सिकल सेल ॲनेमियाच्या कोयता गँगपासून सावध राहिलं पाहिजे,” रजतने सांगितले आणि तो समेवर आला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments