सुश्री हर्षदा बोरकर
(आजची कथा सुश्री हर्षदा बोरकर यांची आहे. त्या लेखिका, नृत्य-नाट्य दिग्दर्शिका कीर्तनकार, समाजसेविका आहेत.)
जीवनरंग
☆ ‘‘आयडेंटिटी ‘…’ ☆ सुश्री हर्षदा बोरकर ☆
पुस्तक : गुंफियेला शेला – कथा ४ : आयडेंटिटी – सुश्री हर्षदा बोरकर
“आयडेंटिटी कार्ड प्लिज!?”
एअरपोर्टवरच्या बोर्डिंगपास देणाऱ्या कर्मचाऱ्यानी मागणी करताच हातात तयारच ठेवलेलं आयकार्ड नीट निरखून,हसून स्टेलानं पुढे केलं. तपासणी प्रक्रिया पूर्ण होऊन स्टेलाचा ‘प्रवास’ सुरू झाला……
नऊ वर्षापूर्वी आरशात पाहताना जेव्हा कपाळावर ,केसांजवळ पांढरा डाग दिसला तेव्हा हादरून गेलेली स्टेला आज निर्धास्तपणे विमानातल्या बिझनेस क्लासमधल्या खूर्चीवर सेफ्टीबेल्ट लावून खिडकीबाहेरचं जग काचेतून न्याहाळत होती.
…..
“कोड…!”
….कपाळावरचा डाग जसा जसा पसरू लागला तसा स्टेलाचं तारुण्यसुलभ मन व्यापू लागला. गोऱ्यारंगाच्या त्या डागासोबत काळी काळजी तिच्या व्यक्तिमत्वाला घेरून टाकू लागली आणि स्वत:ला लपवू लागली स्टेला रंगबिरंगी दुनियेपासून.
पण जसा जसा तो पांढऱ्या रंगाचा डाग चेहराभर पसरला आणि स्वत:चच अर्धगोरं आणि अर्धकाळं शरीर तिला दिसलं तसा एक विलक्षण विचार तिच्या मनात चमकून गेला.
….
… मनमिळाऊ शाळकरी स्टेला स्मिथला जेव्हा मित्र-मैत्रिणी ,शेजारीपाजारी ब्लॅकस्मिथ म्हणून हिणवू लागले होते तेव्हा आपल्याच काळोख्या कोषात गुरफटून राहू लागली स्टेला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या, कुशल आणि महत्वाकांक्षी वृत्तीच्या स्टेलाला पदवी प्राप्त झाल्यावर नोकरी-व्यवसायात डावलले गेले होते ते केवळ ती कृष्णवर्णीय असल्यामुळेच..! कायमच क्षमता पातळीच्या खालच्या दर्जाची कामे स्वीकारावी लागली तिला…
…..
आता मात्र, गोऱ्या रंगाचा डाग शरीरभर पसरत जात असताना एका अनोख्या नियोजनाचा पाठपुरावा करू लागली स्टेला. स्वत:ची छोटेखानी नोकरी सांभाळत, ह्या डागाळलेल्या नऊ वर्षात , तिने अनेक अवघड परिक्षा प्रयत्नांनी व अक्कलहुशारीने पूर्ण करत नव्या पदव्या मिळवून स्वत:चा सीव्ही तगडा बनवला . रंगपरिवर्तन करणारं कोड तिने सकारात्मकतेनी पसरवून घेतलं अंगभर..!!
वकिलामार्फत ॲफेडेव्हीट नावाच्या कागदानी बदलून घेतलं स्वत:चं नाव आणि अस्तित्व! आता नव्या नावानी आणि नव्या रुपानी परदेशातील तिच्या गुणांलायक नोकरीसाठी अर्ज भरू लागली *’मेरी फिनिक्स’*!!
शरीरभर पसरलेलं हे कोड स्टेलासाठी कात टाकणं होतं. वर्ण-रंगावरून माणूस जोखणाऱ्या जगाला स्वत:चा खरा रंग दाखवायला सज्ज झाली मेरी फिनिक्स!!
विमान आकाशात झेपावलं होतं कॅनडाच्या दिशेनी, जिथे नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी त्यांच्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या स्वागतासाठी उत्सुक होती. पहाटेच्या वेळी विमानाच्या छोट्या खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं चराचर उजळवून टाकताना मेरी पहात होती, एअर होस्टेस अदबीनं विचारत होती,” विच कॉफी यू विल प्रिफर मॅम?”
मेरी हसून म्हणाली,”ब्लॅक, प्लिज!”
❤ ❤ ❤ ❤ ❤
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.
चित्र साभार – फेसबुक पेज
©️ सुश्री हर्षदा बोरकर
मो 9867380694
ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈