डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) – ऋचा १ ते ९
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – १-४ इंद्र; ५-६ उलूखल; ७-८ उलूखल व मुसळ; ९ प्रजापति
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अठ्ठाविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी विविध देवतांना आवाहन केलेले असले तरी हे मुख्यतः सोमवल्लीला उद्देशून आहे. या सोमवल्लीपासूनच सोमरसाची निर्मिती केली जाते. हे सूक्त सोमसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
यत्र॒ ग्रावा॑ पृ॒थुबु॑ध्न ऊ॒र्ध्वः भव॑ति॒ सोत॑वे ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ १ ॥
उखळामध्ये सोमवल्लीवर खलूनिया शक्तीने
जड विशालश्या वरवंट्याने रगडूनी जोराने
अर्पिण्यास तव केले सिद्ध सोमरसा भक्तीने
त्या स्वीकारी देवेंद्रा मोदाने प्रसन्नतेने ||१||
☆
यत्र॒ द्वावि॑व ज॒घना॑धिषव॒ण्या कृ॒ता ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ २ ॥
जघनद्वयासम संनिध असती पाषाणाच्या तळी
सोमरसाला निर्मियले आम्ही त्यातुनी उखळी
उत्सुक होऊनिया शचिनाथा सोमरसा स्वीकारी
शिरावरी अमुच्या देवेंद्रा कृपाछत्र तू धरी ||२||
☆
यत्र॒ नार्य॑पच्य॒वमु॑पच्य॒वं च॒ शिक्ष॑ते ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ३ ॥
पुढे नि मागे हलवूनिया करा घुसळणे शिक्षा
नारीला मिळते या योगे कौशल्याची दीक्षा
उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस
स्वीकारुनि त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||३||
☆
यत्र॒ मन्थां॑ विब॒ध्नते॑ र॒श्मीन्यमि॑त॒वा इ॑व ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ४ ॥
कासऱ्यांनी बांधीयले रविला बंधन घालाया
सोमवल्लीला घुसळून उखळी सोमरसा काढाया
उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस
स्वीकारुनी त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||४||
☆
यच्चि॒द्धि त्वं गृ॒हेगृ॑ह॒ उलू॑खलक यु॒ज्यसे॑ ।
इ॒ह द्यु॒मत्त॑मं वद॒ जय॑तामिव दुन्दु॒भिः ॥ ५ ॥
सोमरसाच्या निर्मितीस्तव वापर तव उखळा
घरोघरी घुसळती सोमवल्ली तुझ्यात उखळा
करी गर्जना विजयदुंदुभीसम रे तू उखळा
सोमरसा तू देशी आम्हा गर्व तुझा उखळा ||५||
☆
उ॒त स्म॑ ते वनस्पते॒ वातो॒ वि वा॒त्यग्र॒मित् ।
अथो॒ इंद्रा॑य॒ पात॑वे सु॒नु सोम॑मुलूखल ॥ ६ ॥
मरूत शीतल मंद वाहतो येथे वनस्पते
देई आम्हाला विपूल उत्तमशा सोमरसाते
सोमपान होईल तयाने देवराज इंद्राचे
प्रसन्न होउनिया कल्याण करील तो अमुचे ||६||
☆
आ॒य॒जी वा॑ज॒सात॑मा॒ ता ह्यु१च्चा वि॑जर्भृ॒तः ।
हरी॑ इ॒वान्धां॑सि॒ बप्स॑ता ॥ ७ ॥
चर्वण करताना गवताचे अश्व करीती ध्वनी
रव करती ही उभय साधने सकलांच्या कानी
तया कारणे आम्हा होतो सामर्थ्याचा लाभ
यज्ञामध्ये त्यांचा आहे अतीव श्रेष्ठ आब ||७||
☆
ता नो॑ अ॒द्य व॑नस्पती ऋ॒ष्वावृ॒ष्वेभिः॑ सो॒तृभिः॑ ।
इंद्रा॑य॒ मधु॑मत्सुतम् ॥ ८ ॥
काष्ठांच्या हे साधनद्वयी श्रेष्ठ तुम्ही हो किती
ऋत्विज कौशल्याने करिती सोमाची निर्मिती
मधूर सोमरसाला अर्पू बलशाली इंद्राला
प्रसन्न व्हावे त्याने आम्हा प्रसाद द्यायला ||८||
☆
उच्छि॒ष्टं च॒म्वोर्भर॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
नि धे॑हि॒ गोरधि॑ त्व॒चि ॥ ९ ॥
भूमीवरती सांडियलेला भरा हो सोमरस
त्यासी भरुनीया ठेवावे सज्ज दोन चमस
पवित्र दर्भातुनिया घेई त्यासी गाळून
चर्मावरती वृषभाच्या देई त्या ठेवून ||९||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 28
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈