इंद्रधनुष्य
☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
गेली काही वर्षे आपल्याकडेही वादळांना नावे देण्याचा आणि त्यांच्या ‘प्रवासा’चे निरीक्षण करण्याचा प्रघात पडला आहे.
सध्या ‘बिपरजॉय’ या नावाचे वादळ अरबी समुद्रात तयार होऊन पश्चिम किनाऱ्यापाशी कच्छच्या दिशेने कूच करीत आहे.
याच्या ‘प्रवासा’चे वार्तांकन टेलिव्हिजनवरील वृत्तांमध्ये लक्षणीय मात्रेत होत आहे.
त्यामुळे ‘बिपरजॉय’ हा शब्द वारंवार कानी पडला.
वृत्तनिवेदकांसाठी हा शब्द नेहमीचा नसल्याने प्रत्येकाने / प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने त्याचे उच्चारण केले –
काहींनी त्याचा उच्चार ‘बीपर जॉय’ असा केला. त्यामुळेच की काय त्या नावाकडे लक्ष वेधले गेले.
चक्रीवादळाच्या नावात ‘जाॅय’ कसा काय? असा प्रश्नही पडला.
जरा लक्ष देऊन चक्रीवादळाचे वृत्त ऐकले, तेव्हा समजले की या नावाचे मूळ ‘बंगाली’ आहे.
मग मात्र ‘ट्यूबलाईट’ पेटली आणि उलगडा झाला ! नाव समर्पक कसे तेही पटले !
तेच तुम्हांलाही सांगण्यासाठी हा प्रपंच.
या शब्दाचा प्रवास ‘संस्कृत –> बंगाली –> रोमन लिपी –> ‘बीपर जॉय असा झाला आहे.
या प्रवासात, मूळ शब्दातून जो अर्थ सहज समजू शकतो तो झाकला गेला, आणि ‘जॉय’ अवतरला !
मूळ संस्कृत शब्द आहे – विपर्यय !
बंगालीत ‘वि’चा ‘बि’ झाला.
‘पाणिनि’ने म्हटलेच आहे –
‘बवयोः अभेदः ।
(ब आणि व यांत भेद नाही. )
आणि शब्दाच्या शेवटी असलेल्या दोन ‘य’ पैकी पहिल्या ‘य’चा ‘ज’ आणि बंगाली धाटणीप्रमाणे ‘जॉ’ झाला.
अशा तऱ्हेने ‘विपर्यय’चा उच्चार ‘बीपर जॉय’ होऊन त्याचा अर्थविपर्यासही झाला !
‘विपर्यय’ शब्दाचे गीर्वाणलघुकोशात (रचयिते कै. ज.वि.ओक) जे अर्थ दिले आहेत, त्यांतील बरेच ‘चक्रीवादळास’ लागू पडणारे आहेत – जसे
विरुद्ध, अडथळा, आपत्ती,प्रलयंकाळ…
हा विपर्यय शब्द किती प्राचीन आहे ?
हा शब्द पतंजलिच्या ‘योगसूत्रां’तही येतो.
विपर्ययोमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठितम् । (१-८)
म्हणजे हा अडीच हजार वर्षे तरी जुना आहे !
लेखक – श्री प्रदीप देशपांडे
नाशिक
संग्राहिका – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈