श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
तो भुंकण्याचा आवाज आला, आणि घरातली सोडून सगळ्या मोकाट कुत्र्यांना समजलं की आपल्याला एकत्र बोलवलं आहे.
गल्लीत घरांच्या, झाडांच्या आडोश्याला असलेली, कडक उन्हापासून गारवा मिळावा म्हणून गटारीच्या पाण्यात बसलेली, किंवा चारचाकी गाडीच्या सावलीत विसावलेली सगळी कुत्री अंग झटकत, शेपटी, मान, कान हलवून, पुढचे पाय शक्य तेवढे पुढे, आणि मागचे पाय शक्य तितके मागे घेत आळस झटकून तयार झाली.
अस काय झालं? की सगळ्यांना बोलवावं लागतंय याच विचारात ती सगळी आवाजाच्या दिशेने निघाली.
कोणत्याही वेळी सगळ्यांना सहज पळता यावं म्हणून मुद्दामच मोकळ्या पटांगणात झाडाखाली सगळे जमले होते. वेळ सुद्धा भर दुपारची निवडली होती. कारण उन्हामुळे शक्यतो कोणी माणसं बाहेर पडत नाहीत.
जवळपास सगळे आले आहेत याची खात्री झाल्यावर त्यातील वयस्कर कुत्र्याने बोलायला सुरुवात केली.
काल एका कुत्र्याने एका गावात बंगल्यातून बुट पळवल्याच सी.सी.टि.व्ही. मुळे सगळ्यांना समजलं. आणि त्याची बातमी झाली.
एक तरूण कुत्रा – वा मस्त……. त्यामुळे आपली वेगळी बातमी आली…… नाहीतर आजपर्यंतच्या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला मोकाट, भटकी असं म्हणत फक्त भटकतांनाच दाखवलं आहे.
वयस्कर कुत्रा – प्रश्न तो नाहीच. आता आपण बंगल्यातले बुट पळवायला लागलो म्हणून आपलं जगणं अजून कठीण होणार आहे.
आता हि बातमी आणि ते सी.सी.टि.व्ही. मधे झालेलं शुटिंग मोबाईल मुळे गावागावात, गल्ली गल्लीत पसरेल. ज्याने बुट पळवला त्याला तर मारतीलच, पण नाहक इतर कुत्र्यांना सुध्दा मार पडेल.
अरे……. एखादा माणूस चोरी करतांना सापडला तर त्याला लोक बेदम मारतात. वर म्हणतात कुत्र्यासारखं मारलं म्हणून.
आता आपल्याला तसंच मारल्यावर काय म्हणतील ते……… आहे काही बोलायला जागा…….
अरे हि माणसं सुद्धा चोरी करतांना चेहरा दिसू नये म्हणून तोंड झाकून घेतात. आपलं काय?……. आपलं सगळं उघडंच असतं, आणि आपणही उघड्यावर असतो.
मी म्हणतो आपण बंगल्यात जायचंच कशाला? तिथे त्यांची पाळलेली कुत्री असतातच. अजून आपली भर कशाला?… बऱ्याच बंगल्यावर कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी असते. जास्त चांगलं समजावं म्हणून कुत्र्याच्या तोंडाच चित्र सुध्दा असतं. मग आपण समजायला पाहिजे नां…………
बरं बुट पळवायचा तर एखादं साधं घर बघितलं असतं. कुत्रा बुट पळवतोय म्हटल्यावर घरातल्या किंवा आजुबाजूच्या कोणी बघितलं असतं तर कदाचित दुसरा बुट अंगावर भिरकावला असता. आता बंगल्यातूनच बुट पळवला म्हटल्यावर आपल्याला दिसतील तिथून दिसतील तसे पकडण्याचा बुट निघाला तर…… मग काय करणार…
आधीच आपलं जगणं कुत्र्याचं त्यात ही जास्तीची धावपळ कशी करणार……. लोकं उरलं सुरलं आपल्याला खायला टाकतातच. किंवा त्यांनी टाकल्यावर आपण ते खायला जातो. मग बुटाचा हव्यास कशासाठी? एक बुट पळवल्यामुळे लोक आता आपल्याला जोड्याने मारतील.
एरवी आपल्या भागात कोणी अनोळखी आल्यावर आपण भूंकतो, त्यामुळे लोकं सावध होतात. आता आपल्या भूंकण्याने लोक सावध होतील, पण अगोदर काठी हातात घेऊन त्यांचे बुट जागेवर आहेत ना हे बघतील.
आधीच माणसांमध्येच माणसं पळवापळवीच्या बातम्या येत आहेत. त्यात आपण हे बुट पळवापळवीचे उद्योग करायचेच कशाला? आता कोणी इतरांनी बुट पळवला तरी आपलंच नांव येईल. त्यामुळे आता पुढील काही दिवस काळजी घ्या. असे म्हणत सगळे परत आपापल्या आडोशाला जायला निघाले.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈