सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ पावसाची आळवणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(पावसाची वाट पाहून सगळेच थकले आहेत. म्हणून त्याची केलेली आळवणी)
पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे
दिसेना तुला का मयूर नाचणे॥
कितीदा तुझी मी आर्जवे करावी
किती आमिषे मी तुला दाखवावी
बालपणीचा लपंडाव खेळणे
शोभे ना तुला फक्त लपून रहाणे
पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे
दिसेना तुला का मयूर नाचणे॥
असेल जरी काही चुकले माकले
माफ कर झणी होउन आपले
चल दोघे मिळूनी गाऊ प्रित गाणे
हात सरीत तुझ्या लपेटणे
पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे
दिसेना तुला का मयूर नाचणे॥
आसावली सृष्टी आतूर सगळे
वर्षावात लेण्या मोती नी पोवळे
छेड तूच अता संतूरी तराणे
अनुभवूदे ना फक्त चिंब होणे
पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे
दिसेना तुला का मयूर नाचणे॥
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈