श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण एवं सार्थक कविता “उच्छ्वास मोगऱ्याचा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 11 ☆
उच्छ्वास मोगऱ्याचा तू हा लुटून घ्यावा
प्रीतीत गंध माझ्या त्याचाच हा पुरावा
मेंदी, हळद, सुपारी जातील सोडुनी मज
हातात फक्त माझ्या चेहरा तुझा दिसावा
आकाश चांदण्यांचे मागीतले कुठे मी
तारा बनून माझ्या तू सोबती असावा
मज ओढ सागराची भिजवून टाकते ही
होडीत मासळीवर बरसून मेघ जावा
ही लाट उसळते का मेध उसळतो हा
कोण्या मिठीत कोणी लागेच ना सुगावा
डोळ्यांमधील वादळ बोलून सर्व जाते
ओठांत शब्द नाही हा वाजतोय पावा
मत्सर कशास माझा करतात चांदण्या या
बहुतेक सोबतीला त्यांचा सखा नसावा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८