श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “शितू” — लेखक : श्री गो. नी.दांडेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक  : शितू

लेखक : श्री गो. नी. दांडेकर

प्रथमावृत्ती 1953 

तेरावी आवृत्ती 2016 

पाने 168 

या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक श्री. गो.नी.दांडेकर यांच्याकडे अनेक कसदार साहित्य निर्मितीचं पितृत्व जात असलं तरी “ शितू ‘ चा मानदंड वेगळाच आहे. गोनीदांची ही एक अप्रतिम साहित्यकृती आहे. ‘ गोनीदांच्या मनाच्या गर्भात जन्माला आलेली मानसकन्या म्हणजे शितू ‘ असं उचितपणे म्हणता येईल. 

आता कन्याच मनात जन्माला आली आहे म्हटल्यावर तिचे माहेरही मनातच जन्माला येणार ना. शितूचं माहेर आहे कोकण. नारळासुपारीच्या बागांनी बहरलेलं, दर्यासंगे खडा पहारा देणारं कोकण.

कादंबरीच्या सुरूवातीलाच लेखक मनात शितू कशी आली ते सांगतात. एकदा हा प्रस्तावनेतला परिचय संपला की माणूस शेवटच्या पानापर्यंत शितूसोबतच  प्रवास करतो. 

शितूच्या कथेत पात्रांची फारशी रेलचेल नाही. शितू ,विसू व देवपुरूष आप्पा या तिघांभोवतीच कादंबरी फिरते. बाकी सदू ,भिकू,तान्या,भीमा ,अच्यूतकाका, भाग्या ही सारी पात्रं म्हणजे जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी ताटात मांडलेले पापड लोणचं.

 शितू पुस्तकाचा परिचय करून देताना मला एकाच वाक्यात परिचय संपविणं आवडेल ,अन् ते म्हणजे साखर ,गुळ,बत्तासा,पेढा ,ऊस हे सगळेच पदार्थ गोड आहेत. पण गोड असूनही भिन्न आहेत. मग गोड या शब्दाचा नेमका अर्थ काय ?त्याचा अर्थ एवढाच की स्वतः चव चाखा व गोडी ठरवा. शितू ही कादंबरी अशी देवाघरचा गोडवा प्यालेली.. संजीवनी प्यालेली. शितू ही परिक्षणातून वाचायची गोष्ट नाहीच आहे .. तर शितू मुळातून प्राशन करायचं प्रेमतीर्थ आहे. खरंतर इथंच माझं परिक्षण संपवता आलं असतं. पण वाचकांना अर्ध्या वाटेवर सोडणं माझ्या स्वभावात बसत नाही. म्हणून शितूचा अजून थोडासा परिचय करून देत आहे.

एखाद्या चित्रपटात थोडासा उद्धस्त , पांढरीशूभ्र दाढीवाला म्हातारा आपबीती सांगतो. संपूर्ण कथानक फ्लॕशबॕकमध्ये असतं. फ्लॕशबॕकच्या शेवटी पुन्हा तोच म्हातारा भेटतो. पण यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा गंगा-यमुना झालेल्या असतात. हीच अनुभूती शितू वाचताना येते.

जांभ्या दगडाच्या खडकावर ,खळाळणा-या दर्याजवळच्या खाडीजवळ वसलेलं वेळशी हे एक टुमदार गाव. अर्थात शितूचं गाव. वेळशीकरांना दैवत म्हणून वेळेश्वर प्रिय व माणसांचा विचार करता वेळेश्वराइतकेच  गावातले आप्पा खोत प्रिय. आप्पा म्हणजे वेळशीकरांचा जीव की प्राण. आप्पा देवाचेही लाडके होते बहुतेक. देवानं आप्पांना दो हातानं भरभरून दिलं होतं, आणि आप्पा तेच सारं गावकीला चार चार हाताने वाटत होते. आगीच्या लोळातून एका म्हातारीला वाचविताना आप्पा जीवाची पर्वा करत नाहीत. पण या धाडसामुळे आप्पा दहापंधरा दिवस अंथरूणाला खिळून पडतात. पहिले तीन दिवस तर आप्पांना शुद्धच नसते. या पंधरा दिवसात सगळं गाव ,पंचक्रोशी आप्पांना भेटायला येत होती. चहाची आधणावर आधणं चढत होती. कामाच्या अतिरेकानं व अविश्रांत परिश्रमाने आप्पांची बायको अंथरूण धरते. शिवाय त्या दुस-यांदा आई होणार असतात. श्रम न सोसल्यामुळे काकू आप्पांना, वेळशीला कायमचं सोडून जातात. पण जाताना काकू आप्पांच्या पदरी एक बाळ देऊन जातात.हे बाळ म्हणजेच आप्पांचा लाडका विसू. 

शितू ही सुद्धा वेळशीचीच माहेरवाशिण .नक्षत्रावाणी गोड शितू कादंबरीत भेटते ती एका भयंकर दुःखद प्रसंगात. शितू ही आप्पाचा घरगडी भीमाची लेक. गोरीपान ,नितळ शितू सात वर्षाची असतानाच,   त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे भीमा लेकीचे दोन हात करून देतो. शितूचा दुर्दैवाचा फेरा इथूनच सुरू होतो. लग्नानंतर दोनच महिन्यात तिला वैधव्य येतं. दुःखाचा डोंगर कोसळला असं सगळेजण म्हणतात. पण सात वर्षाच्या शितूला यातलं काहीच कळत नसतं. पण तरीही शितू रडत होती. नवरा मेला म्हणून ? नाही .नवरा तर तिनं नीट पाहिलेलाही नसतो. वैधव्यासाठी रडावं तर तिला त्याचा अर्थही कळत नव्हता.  पण तरीही धायधाय रडत होती. कारण सगळे तिला पांढ-या पायाची म्हणत होते. ती एकांतात आपल्या पायांना न्याहाळत होती. गो-यापान पायावर पांढरटपणा कुठं बिंदुलाही नव्हता. मग पांढ-या पायाची का म्हणत असतील ? पुन्हा ती रडू लागे. आईच्या माघारी वाढविलेल्या शितूचं रांडपण भीमासाठी कड्यावरून कोसळल्यासारखं होतं. गरीबाचं दैव नेहमीच झोपलेलं असतं असं त्याला वाटायचं. फार फार तर ते कूस बदलतं पण पुन्हा फेर धरून नाचायला वापस येतंच. शितू आणि भीमाचं दैव तर चक्रीवादळाप्रमाणे दिशा बदलत होतं. बालवैधव्याच्या अवघ्या सहा महिन्यातच शितूचे दुसरे लग्न तीस वर्षाच्या कालू आजगोलकरशी होतं. हा कालूही एके दिवशी खाडीत बुडून मरतो. आता तर शितूसाठी धरणी खायला उठली होती अन् आभाळ गिळायला उठलं होतं. आधीच पांढ-या पायाची पोर म्हणून हिणवली गेलेली शितू आता सर्वांच्याच नजरेत कुलक्षयी ठरते. लोकांच्या टोमण्यांना कंटाळून भीमा बाप्यालाही वाटतं तिला द्यावं विहिरीत ढकलून अन् व्हावं मोकळं. पण आप्पा शितूला जवळ घेतात.तिचा सांभाळ करतात. डोक्यावर आभाळ ,पायाखाली धरणी अन् पाठीवर आप्पाचा हात एवढंच तिचं जग होतं. 

दहा वर्षाच्या आतबाहेरचा आप्पांचा लाडका विसू व सात वर्षाची शितू  दोघांचं दैवत एकच—आप्पा. दोघांची छान मैत्री जुळते. घरातली सगळी कामं ती दोघं मिळूनच करतात. चौथीत गेल्यावर विसू मामाच्या गावी महाडला शिक्षणासाठी जातो. त्यावेळची शितूच्या बालमनाची घालमेल मूळ कादंबरीतच वाचणं इष्ट आहे. दहावीपर्यंत विसू महाडलाच राहतो. मधल्या काळात दोघांची भेट झालेली नसते. या काळात विसू म्हणजे मिशीवर जवानीची कोवळीक कोरलेला एक नव्या कातणीचा तरूण झालेला असतो. केतकीचं सौंदर्य घेऊन जन्मलेली शितूही तारूण्याच्या खुणा घेऊन उभी राहिलेली असते. खूप वर्षानंतर आलेला विसू तिचा जीव की प्राण असतो. विसूच्या दर्शनाला ती आतुरलेली असते. तिचा तो लाडका तरणाबांड विसू येतो. स्व बदलाच्या जाणिवेने शितू मनातल्या मनात चरकते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं पण शितू विचार करते.. “ मी माझे दोन नवरे गिळलेले आहेत. उद्या विसूच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ? लोक काय म्हणतील ? आश्रयदात्या आप्पांना काय वाटेल ?”..  सळसळतं तारुण्य  आता लहानपणीच्या सहज भेटीतला अडसर बनलं होतं. विसूला शितू हवीच होती. शितूलाही विसू हवाच होता. पण प्रेमाचं सूत कधीच सरळ नसतं. त्याला अनेक गाठी असतात. आता त्या गाठीची परीक्षा घेणं शितूला नको वाटत होतं.

एके रात्री भयानक दुःखद घटना वेळशीत घडली. आप्पांना लालबुंद सापानं डंख मारला होता. सापाच्या जहरानं वेळशीचा जीत्ताजागता वेळेश्वर त्यांच्यातून हिरावून नेला होता. विसू व शितूसाठी आभाळच फाटलं होतं. विसूसाठी सारं गाव होतं ,आप्पांची पुण्याई होती. पण दुर्दैवी शितूसाठी आप्पांच्या जाण्यानं मागं काहीच उरलं नव्हतं. विसूही अक्षरशः वेडापिसा होतो. विसूला शितूच्या आधाराची गरज होती.आप्पानं केलेल्या उपकाराची परतफेड विसूला आधार देऊनच होणार होती. .  . विसूला शितू खरोखरीच सावरते पण त्यामुळे विसू शितूच्या अधिक जवळ जातो. पण शितू सावध असते. तिचंही विसूवर खूप प्रेम असतं पण जगाच्या भीतीपुढं तिचं प्रेम  म्हणजे तिला खुरटं झुडूप वाटते. ती विसूला टाळूही शकत नव्हती व जवळही घेऊ शकत नव्हती.

….  लाघवी भाषेच्या, कोकणी सौंदर्याने नटलेल्या, शितू-विसू प्रेमकथेचा शेवट काय झाला असेल ? 

तो गोडवा ,तो थरार अनुभवण्यासाठी शितू ही कादंबरी स्वतः वाचायला हवी.

पन्नाशीच्या दशकात गोनीदांनी रेखाटलेली शितू काल्पनिक कादंबरी आहे. म्हणायला ती गद्यात्मक कादंबरी आहे पण गद्य वाचताना, तिच्यातला भाव वाचताना असं वाटतं की ही कादंबरी नसून प्रेमकाव्य आहे. दर्याच्या संगतीने शांत खाडीत ती उगम पावते. फेसाळत्या सागराप्रमाणे ती उधाणते. पण मर्यादा ध्यानात येताच स्वतःचं आकुंचन करून घेते. त्या दोन संवेदनाक्षम जीवांचा गोफ गोनीदांनी इतका छान गुंफलाय की वाचक त्यात कसा अडकत जातो ते समजतच नाही. लेखकाच्या दृष्टीने शितू काल्पनिक असेल, पण वाचकाच्या दृष्टीने ती कुठेच घडली नसेल असं मात्र नाही. प्रेम हे सहज असतं ,निरामय असतं– पण त्याची प्रस्तुती खूप भयावह आहे. 

आज अनेक प्रेमकथांचा जन्म मनातच होतो अन् त्या मनातच विरतात. पण विरताना मनाला भावणा-या खुणा सोडून जातात. आणि या खुणा जगण्यासाठी साता जन्माचं बळ देतात. .

ही “ शितू “ नावाची सुंदर हळुवार प्रेमकथा अगदी तशीच —- इतकंच म्हणेन…… 

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments