श्री विश्वास विष्णु देशपांडे
मनमंजुषेतून
☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
अशी कल्पना करू या की बाजारात आपण फेरफटका मारायला गेलो आहोत. एका दुकानात तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे विक्रीस ठेवले आहेत. काहींचा चेहरा हसरा आहे, काही रागट आहेत, काही रडके आहेत, काही उदास दीनवाणे आहेत तर काही भयंकर किंवा भेसूर वाटताहेत. असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. आपल्याला सांगितले की तुम्ही यातून तुम्हाला जो आवडेल तो चेहरा निवडा. आपण सगळे कोणता चेहरा किंवा मुखवटा पसंत करू ? तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. हसतमुख असलेला मुखवटा कोणीही हसत हसत पसंत करील. आपल्या जीवनातही असेच आहे. हसतमुख, सुहास्य मुखावर विलसत असलेली व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. काही काही लोक अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहतात तर सगळे काही अनुकूल असूनही काहींच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले असतात.
आमचे एक नातेवाईक होते. त्यांचा चेहरा नेहमी गंभीर असे. त्यांच्या शेतात आमचाही वाटा असणारी काही आंब्याची सामाईक झाडे होती. वर्षातून एकदा आंबे आल्यानंतर ते माणसं लावून उतरवावे लागत. असे आंबे उतरवून ते त्यांच्या घरी बैलगाडीने घेऊन येत. मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना उतरवण्याचा आणि आणण्याचा जो काही खर्च आला असेल तो देऊन आंबे घरी आणत असू. आंबे कधी येतात आणि काकांचा निरोप कधी येतो याची आम्ही वाटच पाहत असू. तर आंबे उतरवले की काका आमच्या घरी ते सांगायला येत असत. अर्थात ते कशासाठी आले आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नसायची. ते माझ्या वडिलांपेक्षा वयाने मोठे असल्याने त्यांना नावाने हाक मारत. हाश हुश्श करीत घरात प्रवेश करीत. आधी मला हाक मारून, ‘ विश्वास, पाणी आण. ‘ असे म्हणत. मी पाणी दिले की, ‘ विष्णू कुठे आहे ? ‘ अशी माझ्या बाबांच्या संदर्भात विचारणा करीत असत. मग वडील समोर आले की, ‘ विष्णू, अरे आंबे आले आहेत खेड्यावरून. ते घेऊन जा बाबा. ‘ तोपर्यंत आम्ही सगळे मानसिक तणावात असायचो. आम्हाला वाटायचे की काका काहीतरी गंभीर बातमी घेऊन आले आहेत. पण आंबे आले आहेत ही तर आनंदाची बातमी असायची. पण एवढी आनंदाची बातमी देखील ते अत्यंत गंभीरपणे सांगायचे. मग लक्षात आले की अरे हा तर यांचा स्वभावच आहे. मग मनातल्या मनात त्यांचे नाव गंभीरराव ठेवले होते.
Smile and the world smiles with you असे एक छान इंग्रजी वाक्य आहे. तुम्ही हसलात तर जग हसेल. तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वाटेल. लहान मुलं किती आनंदी असतात ! त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाही आनंद वाटतो. आनंदही एखाद्या व्हायरस सारखा असतो. तो सभोवताली पसरत जातो. भोवतालच्या माणसांना आपल्या आनंदात सामील करून घेतो. अशा वेळी चेहऱ्यावर गंभीरतेचा मास्क लावायचा नसतो. त्यात सामील व्हायचे असते. लहान मुलं खूप आनंदी का असतात यामागील कारणाचा आपण कधी विचार केला आहे का ? त्याचे कारण आहे ती दिवसातून अनेक वेळा खळखळून हसतात. त्यांना काही कारण लागत नाही. ते हसतात म्हणून आनंदी असतात. आणि आनंदी असतात म्हणून हसत राहतात.
जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले हसणे कमी होत जाते. पण हे तितकेसे खरे नाही. आपले हसणे कमी होत जाते म्हणून आपले वय वाढत जाते. सदैव हसतमुख असणारी माणसे वयाला पराभूत करतात. वय ही त्यांच्यासाठी फक्त एक संख्या असते. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा तेथील देवाच्या मुद्रेवरचे प्रसन्न भाव पाहून आपलेही मन आनंदित होते. परमेश्वर आनंदस्वरूप आहे. म्हणूनच परमेश्वराच्या मूर्ती कायम प्रसन्न असतात. श्रीकृष्णाचे वागणे बोलणे कसे होते हे आपण प्रत्यक्ष तर पाहिले नाही पण आतापर्यंत त्याच्याबद्दल जे काही वाचले, मालिकांमध्ये पाहिले, त्या सगळ्यात त्याच्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो. संकटांना सुद्धा हसतमुखाने सामोरे जा ही आपल्या राम कृष्ण आदी देवांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे. आपण नेमकी तीच विसरतो.
साधना, तपश्चर्या करणाऱ्या मंडळींच्या, साधू संतांच्या मुखावर एक विलक्षण तेज आणि प्रसन्नता विलसत असते. त्यांची मुद्रा कायम आनंदी असते. कारण हा आनंद आतून एखाद्या फुलासारखा उमलून आलेला असतो. वृत्ती आनंदी असली की आपला चेहरा ती आपोआपच दर्शवतो. चेहरा हा मनाचा आरसा आहे. मन स्वच्छ तर चेहरा स्वच्छ. चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरणारांची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण शरीराच्या स्वच्छतेसाठी जसा साबण आवश्यक तसाच मनाच्या निर्मळतेसाठी हास्ययोग आवश्यक. परमेश्वराने हास्य ही मानवाला बहाल केलेली देणगी आहे. इतर कोणत्याही प्राण्याला ती नाही. गोष्टीतले प्राणीच फक्त हसतात.
समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहून तर आपण स्मितहास्य करतोच पण अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरही आपण जर सुहास्य मुद्रेने त्यांना सामोरे जाऊ शकलो तर संबंधात एक मोकळेपणा, नैसर्गिकपणा येतो. काही व्यक्ती हसण्यातही काटकसर करतात. मोजून मापून हसतात. कोणी कोणी तर चेहऱ्यावरची गंभीरतेची इस्त्री मोडू देत नाहीत.
— म्हणून ‘ एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते.
– क्रमशः भाग पहिला.
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈