सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले –  सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?- आता इथूंपुढे )

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन कॉपने त्याला घरी आणले.  पण कॉपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लॉबद्दल खणखणीत सुनावलं. दंडाची रक्कम वसुल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षल च्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.   तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली,” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसीव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया ,तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो”

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम!”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला,”नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लॉ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली. आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो  अमिताच्या पायात घुटमळत होता.  अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनो बरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.  पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

येईल का ती कधी भरून? 

 – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments