सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ बहर… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
हिरव्या हिरव्या कुरणावरती
तृणपुष्पे डोलती
सौंदर्याने नटली सृष्टी
पक्षीगण विहरती
रिमझिम आल्या वर्षा सरी
गंधयुक्त ही कुंद हवा
चल ना सखया चिंब व्हावया
सोबतीस मज तूच हवा
दर्यावरती जाऊ आपण
पाहू सागराचे उधाण
जलबिंदुंच्या शीतल स्पर्ष्ये
विसरू आपण देहभान
पुळणीत चालूया स्वैरपणे
उमटतील ती प्रीत पाऊले
सहवासातच दोघांच्या
पावसात ही प्रीत फुले
चाफ्याचा दरवळ प्रीतिस अपुल्या
सुगंधात त्या होऊ धुंद
जिवाशिवाचे मिलन होई
मिलनात नाचू बेधुंद
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈