सुश्री सुलू साबणे जोशी
☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा पाली हिल इथे एका अत्याधुनिक इमारतीत “सशुल्क पाहुणा” (पेईंग गेस्ट) म्हणून राहू लागलो. खरं तर माझी ऐपत नव्हती. पण मी नशिबवानच म्हणायचो, म्हणून काही हळव्या भावनेतून ही जागा मला मिळून गेली. घरमालक पती-पत्नी दोघेही वयस्कर होते आणि त्यांच्या मानाने ती जागा फारच ऐसपैस होती. त्यांना एकाकी वाटण्याचं कारण म्हणजे त्यांची मुले परदेशात होती. म्हणून त्यांना अशी मोठी भीति वाटत होती की, दोघांपैकी कुणाला काही झालं, तर त्यांना इस्पितळात कोण घेऊन जाईल?
त्यांनी त्या सदनिकेतील एक लहानशी खोली मला भाड्याने दिली. त्या माझ्या तरूणपणाच्या काळात मी जगण्याच्या, स्थिरावण्याच्या धडपडीत होतो. जेवणाखाण्यासाठी खर्चायला फार पैसे नसायचे. मग मी लिंकिंग रोडवरील टप-या किंवा हातगाडीवर मिळणारे भेळपुरी, वडापाव असे स्वस्तातले पदार्थ आणत असे, कधी मालकांच्या मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेत असे आणि माझ्या खोलीत बसून खात असे.
एके दिवशी मावशींनी त्यांच्या स्वयंपाकघरात मला जेवायला बोलावलं. मग दुस-या दिवशी मी थोडी जास्तच भेळपुरी घेऊन गेलो आणि त्यांनाही खाण्याचा आग्रह केला. थोडंसं कां कूं करत त्यांनी ती खाल्ली. काका तर म्हणाले की, त्यांना वीसेक वर्षं तरी झाली असतील असं चटकमटक टपरीवरचं खाणं खाऊन ! त्यांच्या मुलांनी असं उघड्यावरचं खायला बंदी केली होती ना .
हलके हलके हा मुळी पायंडाच पडून गेला. ते दोघेही माझी घरी परतण्याची वाट पाहू लागले. मी आणत असलेल्या चटकदार खाण्यामुळे त्यांच्या आयुष्यातला आनंद वाढला होता. आता, मलाही कौटुंबिक वातावरणात असल्यासारखे वाटू लागले. मग त्यांनी माझ्याकडून वचनच घेतले की, ही गोष्ट म्हणजे आमच्यातलं गुपित राहील आणि यदाकदाचित त्यांच्या मुलांची आणि माझी गाठ पडलीच, तर हे मी त्यांना अजिबात कळू देता कामा नये. दर आठवडाअखेर नियमितपणे त्यांच्या मुलांचा चौकशीचा फोन येई, पण आमचे हे गुपित त्यांनी कधीच उघड केलं नाही.
मग मात्र मी मुंबईतील खाऊगल्ल्यांचा धांडोळा घेऊ लागलो. लांब अंतरावरची ठिकाणे लोकलमधून, तर मैलोन् मैल चालत जाऊन मुंबईचे कानेकोपरे पालथे घालून गाजलेली खास खाऊठिकाणे शोधून काढली – क्रॉफर्ड मार्केटजवळच्या ‘गुलशन- ए-इराण’ चा खिमापाव, विलेपार्लेमधील ‘आनंद’चा डोसा, किंवा ग्रँट रोडवरच्या ‘मेरवान’चा बनमस्का आणि मावा सामोसा, किंवा शीवच्या ‘गुरूकृपा’तील छोले सामोसा, कधी स्वाती स्नॅक्समधून खिचडी, तर कधी चेंबूरच्या ‘सदगुरू पावभाजी’तील पावभाजी.
या प्रकाराने मला जगण्याचा हेतु सापडला, तर वृद्ध दांपत्याला मिळाली जगण्याची आशा. जेवणाच्या टेबलावरच्या त्या क्षणांनी आमच्या तिघांचे एक छोटेसे घट्ट कुटुंब बनून गेले. नव्वदीच्या आसपासचे हे वृद्ध काका मला रोज काही ना काही किस्से त्या वेळी ऐकवत असत. पुढे कधी तरी एकदा मावशींशी बोलता बोलता मला कळलं की, दिवसभर ते अगदी गप्प गप्प असत, चुकूनही बोलत नसत. जेवणाच्या टेबलावरच्या या क्षणी मात्र त्यांच्यात एकदम चैतन्य संचारे.
वयोपरत्वे त्यांची तब्येत ढासळू लागली. त्यांचा विसराळूपणा वाढू लागला आणि एक दिवस विसरण्याचा कडेलोट झाला. मी त्यांचा मुलगा नाही, हे ते विसरूनच गेले. त्यांच्या वाढदिवशी, व्ही.टी. स्टेशनजवळच्या ‘पंचम पुरीवाल्या’कडून मी पु-या आणि बटाट्याची भाजी घेऊन गेलो. खूप वेळ त्यांनी स्वादाचा सुगंध घेतला आणि अचानक त्यांच्या मुलाच्या नावाने मला हाक मारली. मावशी म्हणाल्या की, त्यांचं ऑफिस ‘पंचम’जवळ असल्याने ते बरेचदा तिथे बटाटा भाजी, पुरीचं जेवण घेत असत. पण ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या मुलाने ‘तिथं खायचं नाही’ असं निक्षून बजावलं होतं. तासभर होऊन गेला. काकांनी मजेमजेत पुरी भाजीचा आस्वाद घेतला. मग उठले, वॉकर घेऊन सावकाश चालत त्यांच्या खोलीत गेले आणि एक खोकं घेऊन परत आले. पुन्हा एकदा त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या नावाने हाक मारली आणि ते खोकं माझ्याकडे सुपूर्द केलं. म्हणाले, ” तू तुझं मुलाचं कर्तव्य बजावण्याइतका मोठा होशील, तेव्हा तुला देण्यासाठी हे राखून ठेवलं होतं. आज तू तसं वागलास. आता हे तुझं ! “
… मी खोकं उघडलं. त्यात एक “हिरो” – शाईचे पेन होते. मग मावशींनी खुलासा केला की, त्या पेनाने त्यांनी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेली ती ‘भेट’ होती.
त्या रात्री मला ‘हिरो पेन’ नव्हतं मिळालं, तर मला एक वडील मिळून गेले. ते पेन मी जपून ठेवलं आहे. ते मलाही माझ्या मुलाकडे एक दिवस असंच सोपवायचं आहे, जेव्हा मी म्हातारा आणि दुबळा झालेला असेन आणि माझा मुलगा मला माझं आवडतं खाणं आणून देईल ..
आपला जन्मदाता पिता एकच असतो. तरीही, आपण अनेक पित्यांचा पुत्र होऊ शकतो.
हा पितृदिन आनंदात जावो !
मूळ इंग्रजी लेखक – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री
मराठी रूपांतर व प्रस्तुती : सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर