श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ पाणी… – भाग -२ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं. – आता इथून पुढे)
“आबा पाणी” नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला
” दादू आता घोट घोट पाणी पी रे भाऊ.नंतर कुठंबी पाणी मिळायचं नाही”
नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली.घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली.त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली.देवबाने कपाळावर हात मारुन घेतला.खरं म्हणजे त्यांना पाणी पितांना पाहून त्यालासुध्दा पाणी प्यायची तिव्र इच्छा होत होती.पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.
शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला.”गरमागरम कचोरी,दसमें तीन,दसमे तीन” त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला.पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चुप बसला.
” आबा मले कचोरी “नात म्हणाली.आता नातू चुप थोडीच बसणार होता.
“आबा मलेबी कचोरी”
कचोरीवाला आला तसं देवबाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या .तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या.तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.
“आबा कचोरी” तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं.त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.
” दादूला देजो बेटा.नाहीतर तुमी दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा” कचोरी परत करत देवबा म्हणाला.पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं.नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतांना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.
गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला.खुमगांव बुर्ती गेलं तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली.एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता.त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.
“देरे दादा थोडं पाणी,पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं.देरे दादा,देवं माय.लई पुण्य मिळेल दादा”
भिकारीण गयावया करत होती.लोकांसमोर हात पसरत होती.
देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं,कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना.उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते.आणि तेही चुकीचं नव्हतं.या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतांना कोणं त्या भिकारणीला पाणी देणार होतं?
” बाबा दे रे पाणी पोऱ्याले” ती भिकारीण देवबाकडे पहात म्हणाली.देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना.न रहावून त्याने पिशवीतली बाटली काढली.पण हाय रे दैवा.बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती.ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात “पानी बोतल”चा आवाज डब्यात घुमला.आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.
“कित्येकी है बोतल?”देवबाने विचारलं
” पच्चीसकी”
“बाहर तो बीस की मिलती”
” स्टेशनपे मिलती होगी,गाडीमें पच्चीसकी है.दू?”
देवबा अडखळला.पंचवीस रुपये जास्तच होते.लोकांना लुटणाऱ्या पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला.भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं.तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं.भिकारणीच्या उजव्या बाजुला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती.तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता.त्याने निर्णय घेतला.
” दो.एक दो”खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली.पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली.तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली.तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं.देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.
” आबा आपल्यालेबी बाटली घेजो” नात म्हणाली तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला
“और एक बोतल दे दो”
भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं.मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.
” अजून एक बोटल दे रे बाबा.मलेबी लई तहान लागलीये”
देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली
” बाबा कहाँ जा रहे हो”पाणीवाल्याने देवबाला विचारलं
“भुसावल”
“तो और एक ले लो ना.भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी.साथमे बच्चे है,एक बोतलसे थोडेही काम चलेगा!”
तो बरोबर म्हणतोय हे देवबाच्या लक्षात आलं पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं.पण पुढे पाणी नाही मिळालं तर?
“दे दू बाबा?”
देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.
” हां देऊन टाका”नात मध्येच म्हणाली तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला.देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले.फक्त नव्वद रुपये उरले होते.पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना.पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन त्रुप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली.
मलकापूर गेलं.गाडीतली गर्दी आता कमी झाली होती.सहा वाजत आले होते.जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता.देवबा विचार करत होता.आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं.जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते.जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता.’ ठिक आहे मनाला पटत नसलं तरी मागू.आजपर्यंत कधी मागितले नव्हते आता मागू.पोरीला शरमल्यासारखं होईल.तिला समजावून सांगता येईल.आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत.घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे.पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं?’
“बाबा हे घे तुह्ये पैसे”
त्याने चमकून वर पाहिलं.मघाची भिकारीण समोर उभी होती.तिच्या समोर पसरलेल्या हातात एक,दोन,पाच रुपयाची नाणी होती.देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला.भिकाऱ्याने दिलेली भिक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.
” नको नको.राहू दे”
” बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये.घे.भीक मागून जमा केलेत”
देवबाला काय करावं सुचेना.पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते.पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते.त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला
” राहू दे बेटा.नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का?”
” लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू.देव भलं करो तुह्यं”
ती निघून गेली तसा देवबा हसला.भिकाऱ्याच्या आशिर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहित होतं.पण त्या आशिर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.
रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला.स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं.तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली.रिक्षावाल्याला पत्ता सांगितला
” चाळीस रुपये”रिक्षावाला म्हणाला.
देवबा हसला.थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता. पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञतेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरुन गेलं होतं.
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈