सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ बिंदूसरोवर … श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : बिंदूसरोवर
लेखक : राजेंद्र खेर.
प्रकाशक : विहंग प्रकाशन, पुणे.
पृष्ठसंख्या : २०७.
काही योग हे विलक्षण आश्चर्यकारक असतात. ध्यानीमनी नसताना एखाद्या पुस्तकाची आपण निवड करणं आणि त्या पुस्तकाने आपल्याला झपाटून टाकणं इतकं की जणू आता तेच आवश्यक होतं असं वाटण्याएवढं… मला वाटतं अशावेळी ते पुस्तक वाचन घडणं ही गोष्ट सहज घडलेली नसून ती नियतीचा एखादा भाग असते.
‘बिंदूसरोवर’ हे राजेंद्र खेर यांच्या पुस्तकाचं वाचन हा असाच एक योग… वाचनालयात जाताना डोक्यात गंभीर, विचारप्रवर्तक असं पुस्तक न घेता, आता एखादं विनोदी हलकंफुलकं असं पुस्तक घ्यावं असा होता. पण तोंडून अचानक राजेंद्र खेर यांचं नाव बाहेर पडलं. तेव्हा हे पुस्तक समोर आलं. वाचून तर बघूया या भावनेतून हे पुस्तक घेऊन मी घरी आले आणि त्या पुस्तकानं मला वाचता वाचता झपाटून टाकलं. आपल्याला आत्ता हे नाव का सुचलं आणि आपण आत्ता अशा स्वरूपाचं पुस्तक का वाचत आहोत हा प्रश्न मला मी ते पुस्तक वाचेस्तोवर पडलेला होता. पण जसं जसं मी ते पुस्तक वाचत गेले तसं मला जाणवलं की आत्ता माझ्या मनाला, विचारांना ज्या प्रकारचं वाचन किंवा बौद्धिक खाद्य हवं होतं, ते हेच पुस्तक देऊ शकतं. आणि उलट आश्चर्य वाटलं की २००८ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजपर्यंत आपण का वाचली नाही?
संपूर्णतः काल्पनिक म्हणावी अशी (अर्थात प्रत्येक कल्पनेची नाळ ही कुठेतरी, कधी ना कधीतरी वास्तवाशी जोडलेली असतेच) ‘बिंदूसरोवर’ ही कादंबरी भारतीय अध्यात्माचं विलोभनीय रूप दाखवते. आणि गंमत म्हणजे कादंबरीचा कालखंड हा २०२५ सालचा घेतलेला आहे. २००८ साली कादंबरी लिहिताना सतरा वर्षानंतर काय परिस्थिती असेल असा विचार करून यात लेखन केलेलं आहे, याचं मला नवल वाटलं. अर्थात सतरा वर्ष हा काळ संख्येच्या दृष्टीने पाहता फार मोठा नाही. पण वैज्ञानिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून आजच्या वेगवान गतीच्या सापेक्ष नक्कीच महत्त्वाचा आहे. तरीही या ‘सतरा’ च संख्येमागे अजून काही कारण असेल का हा विचार मात्र मनात सतत डोकावतो आहे. माझ्यामते याचं उत्तर लेखकच देऊ शकेल.
सबंध जगाला अध्यात्माच्या मार्गाने उन्नत मानवी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणाऱ्या भारतीय संस्कृतीचा कालसुसंगत उत्तम परिचय करून देणारी ही कादंबरी… या कादंबरीत बिंदूसरोवर हे एक अध्यात्मातील उच्च अनुभूती देणारं महत्त्वाचं, पवित्र, अजेय असं ठिकाण असून, त्याचा मुक्ती या संकल्पनेशी घनिष्ठ संबंध आहे. आजकाल मुक्ती वगैरे थोतांड असून मुळात अध्यात्मातल्या अनेक गोष्टी या चुकीच्या आहेत, त्या माणसांमध्ये तेढ, श्रेष्ठ-कनिष्ठ भेद निर्माण करतात असं जोरदारपणे सांगितलं जातं. त्यावर सकस भाष्य करणारं हे कथानक आहे.
यात अत्यंत भिन्न परिस्थितीत असलेल्या चार व्यक्ती या बिंदूसरोवराचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला या सरोवरापाशी पोहोचण्याची आणि आपलं नियोजित कर्तव्य पूर्ण करण्याची ओढ लागलेली असते. फक्त तिलाच या बिंदूसरोवराची महती माहीत असते. पण योगायोगाने काही व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात आणि झपाटल्यासारख्या तिच्याबरोबर या प्रवासात सहभागी होतात. अनेक प्रसंग जीवावर बेतणारे असूनसुद्धा आणि यातून आपल्याला नक्की काय लाभ होणार आहे? हे माहीत नसूनसुद्धा त्या व्यक्ती कसल्या तरी अनामिक ओढीने या सबंध प्रवासात एकत्र राहतात.
विश्वातल्या मुक्तीच्या प्राप्तीसाठीची तीन महत्त्वाची द्वारं … वस्तुनिष्ठ, मनोनिष्ठ आणि आत्मनिष्ठ .. याबाबत फार सुंदर उहापोह यात केला आहे. थेट उल्लेख नसला तरी स्वर्ग, नरक या कल्पना, तसंच पृथ्वीप्रमाणे इतरही विश्व असण्याची कल्पना यात सांगितलेली आहे. काही ठिकाणी पुराणातील घटनांचा आधार घेत या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
या सगळ्यांच्या मुळाशी मानवाची पूर्ण सृष्टीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववृत्ती ही किती संहारक असू शकते आणि ती दिवसेंदिवस किती बळावत चालली आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं.
सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या आपल्यासारख्या या चार व्यक्तींचा बिंदूसरोवरापर्यंतचा उत्कंठावर्धक, रहस्यमय आणि थरारक प्रवास हा अत्यंत वाचनीय तर आहेच. पण त्याहीपेक्षा तो जास्त विचार प्रवर्तक आहे. आणि म्हणूनच सत्य आणि असत्याच्या सीमारेषेवर उभे असलेले हे कथानक वास्तव असावे असा मोह पडणारे आहे.
अज्ञानातून… ज्ञानाकडे
ज्ञानातून… आत्मज्ञानाकडे
विकारातून… विचाराकडे
आणि
अस्विकृतीतून… स्वीकृतीकडे नेणारा हा विचारप्रवाह खरोखरच पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे.
***
एक उत्तम विचार, काल्पनिक आणि एकदम वेगळ्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल लेखक राजेंद्र खेर यांचे मनापासून आभार !
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈